‘एक मुलगा बारीक डोळ्यांचा, चीनमधून दत्तक घेतलेला. दुसरा केनियाचा कृष्णवर्णीय आणि तिसरा पाकिस्तानचा. ॲना नावाच्या अमेरिकेतील एका महिलेने चौथी मुलगी दत्तक घेतली ती ‘साकार’ मधून,’ स्वत:ची दोन मुले असताना जगभरातील मुले दत्तक घेऊन सांभाळणाऱ्या ॲना यांचे कौतुक करताना डॉ. सविता पानट यांचा चेहरा खुलला होता.

‘वसुधैव कुटुंबकम्’ असे नुसते म्हणून कसे चालेल? कोणी तरी काम करावे लागेल त्यासाठी. अशा कामात आवश्यक असणारे मनुष्यबळ संवेदनशीलपणे उभे करणाऱ्या सजग कार्यकर्त्या म्हणजे डॉ. सविता पानट. त्यांचे नुकतेच निधन झाले. छत्रपती संभाजीनगर शहरात त्यांनी १९९४ साली अनाथ, कुमारी माता आणि रस्त्यावर सोडून दिलेल्या मुलांचा सांभाळ करणारी संस्था उभी केली. आज ‘साकार’ या संस्थेत १२ मुलांचा सांभाळ होतो. आजवर दत्तक प्रक्रियेतून ४३५ मुलांना आई-वडील मिळाले आहेत.

मुळात एखाद्या मुलाला कोणत्याही सामाजिक कारणाने फेकून द्यावे लागणे हे समाजाचे एक प्रकारचे आजारपणच. त्यामुळे हे काम बंद व्हावे अशी समाजरचना तयार व्हावी अशी विचार करणारी मंडळी ‘ साकार’ संस्थेतून पुढे आली. त्या संस्थेच्या अध्यक्ष म्हणून पानट यांनी २५ वर्षे काम केले. वडील ‘दैनिक मराठवाडा’चे संपादक अनंत भालेराव यांच्या विचारांचा वारसा सामाजिक अर्थाने पुढे नेणाऱ्या सविता यांचे मन मात्र कवीचे. अभ्यासात उत्तम गती असल्याने त्यांनी शासकीय वैद्याकीय महाविद्यालयातून प्रसूतिशास्त्र विषयाचे शिक्षण पूर्ण केले.

पुढे पुणे, नागपूर, छत्रपती संभाजीनगर येथे वैद्याकीय महाविद्यालयात अध्यापन केले. ५५ वर्षांचा प्रसूतिशास्त्राचा त्यांना अनुभव होता. तेव्हा सोनोग्राफी यंत्र नव्हते. पोट हाताने दाबून गर्भाची वाढ आणि आईची प्रकृती किती चांगली आहे किंवा प्रसूतिमध्ये किती अडचणी येऊ शकतात, याचा अंदाज त्या घेऊ शकत. या क्षेत्रात सोनोग्राफी यंत्र आल्यानंतर आणि येण्यापूर्वी असा वैद्याकीय आलेखाचा पट माहीत असणाऱ्या निष्णात डॉक्टर म्हणून त्यांनी काम केले. या तपासणीदरम्यान महिलांचे प्रश्न समजून घेण्याची, त्याच्या सोडवणुकीची त्यांची अशी एक पद्धत होती. स्पष्ट आणि थेट संवादामुळे कोणाला मन मोकळं करायचं आहे, हे त्यांना समजत असे. त्यामुळे रुग्ण आणि डॉक्टर यांचा एक बंध त्यांनी जपला.

या संवादातून समस्यांकडे पाहण्याचा त्यांचा दृष्टिकोन त्यांच्या व्याखानातून, लिखाणातून जाणवत राहिला. त्यातूनच त्यांनी वयात येणाऱ्या मुला-मुलींसाठी ‘क्षितिज’ हा प्रकल्प सुरू केला. दीड लाख मुलांपर्यंत लैंगिक शिक्षणाचा विषय पोहोचू शकला. त्यांनी महिलांच्या आरोग्यावरची १०० हून अधिक व्याखानेही दिली. स्त्रीभ्रूण हत्येच्या विरोधातही त्यांनी केलेल्या कामाची आवर्जून दखल घेतली जाते. ‘मेनोपॉज’, ‘आई होताना’, ‘चाळिशी- एक चिंतन’, ‘भरारीपूर्वी’ ही पुस्तके त्यांनी लिहिली.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

वाचन – लेखन आणि गिर्यारोहण ही त्यांची आवड होती. थेट आणि स्पष्ट बोलताना माणूस दुखावला जाणार नाही याची काळजी घेत लोकसंग्रह करणाऱ्या डॉक्टर कार्यकर्त्या अशी ओळख त्यांनी आयुष्यभर जपली. अनंत भालेराव प्रतिष्ठाच्या वतीने गेली ३३ वर्षे कर्तृत्ववान व्यक्तींना गौरविण्यात सातत्य राखले जावे यात त्यांचे योगदान होते. वयाच्या ८० वर्षांपर्यंत कामात असणाऱ्या पानट यांना अनेक पुरस्कारही मिळाले. आपला मृत्यूही सन्मानपूर्वक व्हावा म्हणून एका मर्यादेनंतर उपचार नकोत असे त्यांनी ठरवले होते. मृत्यूनंतर कोणतेही धार्मिक विधी करू नका, असेही त्यांनी कुटुंबीयांना आवर्जून सांगितले होते.