k Science without conscience is but the ruin of the soul.l — Franç ois Rabelais
‘आमचा काळ म्हणजे अंधारयुग. त्या खिन्नतेच्या वातावरणात ज्ञानशत्रूंचा बोलबाला होता. ज्ञानपरंपरा उद्ध्वस्त करण्यात आल्या होत्या. आता मात्र प्राचीन ज्ञानपरंपरांचं पुनरुत्थान होऊन ज्ञानाचा प्रकाश पसरू लागला आहे. ज्ञानाला पुन्हा प्रतिष्ठा प्राप्त होत आहे. त्यामुळे, जग इतक्या झपाट्यानं बदलत आहे की आज मला शाळकरी मुलांची बरोबरी करणं अवघड होईल. खरं तर, मी माझ्या काळी सगळ्यात बुद्धिमान तरुण समजला जात होतो!… तू आता शिक्षणासाठी पॅरिसला आहेस. मला जी संधी आणि सुविधा मिळाल्या नाहीत त्या तुला मिळताहेत, तर तू तुझं तारुण्य ज्ञानवृद्धीसाठी आणि चरित्राच्या ( virtu) सर्वांगीण विकासासाठी खर्ची कर!…’
– हा मजकूर एका पालकानं पॅरिसमध्ये शिकायला गेलेल्या आपल्या मुलासाठी लिहिलेल्या पत्राचा अंश आहे. हे दीर्घ पत्र फ्रॉन्स्वॉ राब्लेच्या ‘पॉन्ताग्रुएल’ या साहित्यकृतीचा भाग आहे. पत्राच्या सुरुवातीलाच राब्ले रनेसॉन्समुळे फ्रान्समध्ये होणारी स्थित्यंतरं टिपतो. आधुनितेविषयी आशावाद व्यक्त करतो. या पत्राचा गाभा म्हणजे ‘ Homo sum, humani nihil a me alienum puto’ — अर्थात ‘मी माणूस आहे, त्यामुळे जे काही मानवी आहे ते माझ्यासाठी परकं नाही’— हे मानवतावादी तत्त्वज्ञान आहे. हे पत्र मानवतावादाचा जाहीरनामा म्हणूनही अभ्यासलं जातं.
फ्रॉन्स्वॉ राब्ले (१४९४ – १५५३) हा १६व्या शतकातला फ्रेंच मानवतावादाचा आक्रमक प्रणेता समजला जात असल्यानं प्रस्तुत लेखाकांत त्यानं अभिव्यक्त केलेल्या मानवतावादाचं स्वरूप समजून घेण्याचा प्रयत्न करू. खरं तर, आजघडीला राब्लेजियन म्हणजे असा माणूस ज्याला जगण्याची, खाण्याची, पिण्याची, हसण्याची, सौंदर्याची, ज्ञानाची प्रचंड भूक असते. जणूकाही त्याला शतकानुशतकं उपाशी ठेवण्यात आलं असावं. तो ज्ञानोत्सवासोबत इंद्रियोत्सवालासुद्धा तितकंच प्राधान्य देतो. कधी कधी त्याचा इंद्रियोत्सव धक्का देणारा वाटू शकतो. सगळं मानवी असल्यानं सगळ्या गोष्टींविषयी बोलता, लिहिता आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे मुक्तपणे हसता आलं पाहिजे, अशा अभिव्यक्तिस्वातंत्र्याचा आग्रह धरणारा तो अस्सल हाडामासाचा फ्रेंच माणूस आहे. राब्लेजियन हे विशेषण फ्रेंच संस्कृतीतल्या ‘ joie de vivre ’ (जीवन-आनंद) या संकल्पनेचं द्याोतकसुद्धा समजलं जातं. फ्रॉन्स्वॉ राब्ले या कलंदर व्यक्तिमत्त्वाच्या नावापासूनच राब्लेजियन हा शब्द बनलेला असल्यानं त्याच्याविषयी आधी थोडं जाणून घेऊ.
फ्रॉन्स्वॉ राब्लेचा जन्म कधी झाला याविषयी निश्चितपणे सांगता येत नसलं तरी काही अभ्यासकांच्या मते त्याचा आणि त्याचा आश्रयदाता, फ्रान्सचा राजा पहिला फ्रॉन्स्वॉ या दोघांचा जन्म एकाच वर्षी – १४९४ मध्ये – झाला असावा. फ्रान्सच्या ग्रामीण भागातल्या सधन कुटुंबातून आलेल्या राब्लेला शिक्षणासाठी पॅरिस, ओर्लेआँ, मोंपेलिए, लिआँ अशा अनेक शहरांत वास्तव्य करावं लागलं. ग्रीक, लॅटिन, हिब्रू या प्राचीन अभिजात भाषांमध्ये प्रावीण्य मिळवून त्याने धर्मशास्त्रांचं सखोल अध्ययन केलं. फ्रान्सिसकन मोनॅस्टरीची दीक्षा घेऊन तो मंक झाला. तिथं भ्रमनिरास झाल्यावर बेनेडिक्टन मोनॅस्टरीची दिक्षा घेतली. पण काही वर्षांनंतर गुप्तपणे लग्न करून त्यानं धार्मिक जीवनाचा त्याग केला. ओर्लेआँ शहरात कायद्याचं शिक्षण घेतलं. नंतर मोंपेलिए इथं मेडिसिनमध्ये पदवी मिळवून जाँ दु बेले या प्रभावशाली कार्डिनलचा खासगी डॉक्टर म्हणून युरोपात भटकंती केली.
शिक्षण आणि व्यवसायांच्या निमित्ताने संपूर्ण फ्रान्स पिंजून काढल्यावर कुशल डॉक्टराप्रमाणे राब्लेला तत्कालीन समाजाची ऑटोप्सी करण्याचं सामर्थ्य मिळालं. ऑटोप्सी या ग्रीक शब्दाचा शब्दश: अर्थ ‘स्वत:च्या डोळ्यांनी पाहणं’ ( autos- opsis) असा होतो. १५३२ पासून मृत्यूपर्यंत राब्लेनं पाच पुस्तकं लिहिली. ही पुस्तकं म्हणजे ग्राँगुजिए, गारगॉन्तुआ आणि पॉन्ताग्रुएल या तीन काल्पनिक पिढ्यांचा विनोदी वृतान्त. सर्वसामान्य माणसांमध्ये अतिसामान्य आकार आणि क्षमता असलेली महाकाय पात्रं निर्माण करून राब्लेनं तत्कालीन समाजाच्या ऑटोप्सीसोबतच भविष्यातील मानवतेचा वेध घेतला. ‘पॉन्ताग्रुएल’ आणि ‘गारगॉन्तुआ’ ही पहिली दोन पुस्तकं राब्लेनं काल्पनिक नावानं प्रकाशित केली. ताबडतोब सोर्बोन धर्मपीठाकडून कारवाई करण्यात आली. त्यानंतर चर्चनं त्याच्या अश्लील आणि धर्मनिंदक पुस्तकांचा समावेश ‘वर्जित पुस्तकांच्या यादी’त केला. पण त्यादरम्यान, एका बाजूला फ्रेंच राजा पहिला फ्रॉन्स्वॉने राब्लेला संरक्षण दिलं आणि दुसऱ्या बाजूला लोक त्याची पुस्तकं चोरून वाचत होते.
याआधी आपण पाहिलं की त्याकाळी फ्रेंच भाषेला ज्ञानव्यवहाराची भाषा म्हणून मान्यता नव्हती. प्रस्थापित भाषेत लिहिणाऱ्यांची संख्या नेहमीच जास्त असते कारण त्या भाषेच्या प्रतिष्ठेचा लाभ ती भाषा वापरणाऱ्यांना आपोआप होत असतो. पण फ्रॉन्स्वॉ राब्लेनं प्रस्थापित लॅटिनला बाजूला सारून फ्रेंचमध्ये लिखाण केलं. शून्यातून वैश्विक दर्जाचं साहित्य निर्माण केल्यामुळे त्याच्या लिखाणात फ्रेंच भाषेचं गुणसूत्र आणि सौंदर्यशास्त्र दडलेलं आहे. राब्लेच्या या साहित्यिक प्रकल्पाला फ्रेंच भाषेत पूर्वसुरी नसल्यानं त्याचा उल्लेख ‘आधुनिक फ्रेंच भाषा आणि साहित्याचा जनक’ म्हणून केला जातो. मिलान कुंदेरा (१९२९-२०२३) हा प्रख्यात लेखक समीक्षक राब्लेचं वर्णन ‘कादंबरीचा जनक’ म्हणून करतो.
राब्ले : ‘कादंबरीचा जनक’!
आधुनिकतेला पेलण्याची क्षमता कादंबरीत असल्याने मिलान कुंदेराने कादंबरीच्या जन्माचा आंतरिक संबंध आधुनिकतेशी जोडला आहे. आधुनिकपूर्व काळात काव्य गायलं जात असे आणि नाटक दाखवलं जातं असे. या दोन्ही साहित्य प्रकारांसाठी श्रोत्यांच्या आणि प्रेक्षकांच्या साक्षरतेची आवश्यकता नव्हती. सार्वजनिकपणे अनुभवल्या जाणाऱ्या या एकतर्फी साहित्य प्रकारांचा मध्ययुगीन काळात धर्मसत्तेनं वापर गर्दीचं नियमन आणि नियंत्रण करण्यासाठी केला. पण रनेसॉन्सच्या काळात व्यक्तिवादाचा उदय होऊन अशी विचारशील व्यक्ती आकार घेऊ लागली, जिला स्वायत्तपणे अर्थ लावण्यासाठी गर्दीपासून लांब एकांताची गरज भासू लागली. त्याअनुषंगानं कांदबरी हा नवीन साहित्य प्रकार अस्तित्वात आला. कारण कांदबरी हा खासगी अवकाशात एकांतात अनुभवायचा साहित्य प्रकार आहे.
मिलान कुंदेरा लिहतो की, चांगलं आणि वाईट यांतील भेद अतिशय स्पष्ट असेल अशा जगाची मनुष्य सतत इच्छा बाळगून आहे. त्यामुळे समजण्याआधीच गोष्टींना चांगलं- वाईट ठरवणं, ही मनुष्याची सहजप्रवृत्ती आहे. ही अदम्य सहजप्रवृत्ती सगळ्या धर्मांच्या आणि विचारसरणींच्या मुळाशी काम करते. या आदिम सवयीमुळे मनुष्याला जीवनाची सापेक्षता सहन करणं अवघड जातं. राब्लेसारख्या मानवतावादी लेखकांना आधुनिकतेतल्या सापेक्षताधारित वादाची प्रखर जाणीव होती. त्यासाठी त्यानं कांदबरी या साहित्य प्रकाराचा आविष्कार केला. कारण कादंबरी असा प्रांत आहे जिथं नैतिक- अनैतिकतेचा न्यायनिवाडा अनाठायी ठरतो. कुंदेरा नमूद करतो की, हा न्यायनिवाडा अनाठायी ठरवणं म्हणजे अनैतिकता नसून कादंबरीची सर्वोच्च नैतिकता असते!
‘सर्वोच्च न्यायदेवते’च्या अनुपस्थितीत धर्मसत्तेनं लावलेले अर्थ फसवे सिद्ध झाल्यावर लुथरनं मध्यस्थी करणाऱ्यांना बाजूला सारून ‘व्यक्तीच्या सदसद्विवेकबुद्धी’ला आधारभूत मानलं. मात्र लुथरपेक्षा एक पाऊल पुढे जाऊन राब्लेला व्यक्तीच्या स्वातंत्र्यासाठी धार्मिक अधिष्ठानची गरज भासली नाही. ‘तुमच्या अस्तित्वाचे तुम्ही स्वत: अनुवादक व्हा!’ या ब्रीदवाक्याची घोषणा करून त्यानं निखळ मानवतावादाचा पुरस्कार केला.
भाषेचं मानवीकरण
दान्ते, लुथरसारख्यांच्या दृष्टीनं भाषा ( logos) ही ईश्वरीय देणगी आहे. पण देवभाषा ही पवित्र संकल्पना फक्त धर्मग्रंथांच्या भाषांना लागू होत असे. त्यामुळे, धर्मग्रंथांची भाषा अवगत असणारेच ईश्वराच्या सान्निध्यात राहतात असं समजलं जात असे. सर्वसामान्यांची भाषा ही ‘देवभाषेची पतित आणि भ्रष्ट सावली’ असल्यानं त्यांचा वापर करणाऱ्यांना ईश्वराच्या सहवासाची अनुभूती होत नाही, ही मध्ययुगीन धारणा होती. या धारणेला राब्लेच्या लिखाणात तडा गेला. त्यानं भाषांचं ईश्वरी नातं तोडून सगळ्या भाषांना मानवी पातळीवर आणलं आणि त्यांना मानवी स्वातंत्र्याचं वाहक बनवलं.
ईश्वराशी जवळीक असलेल्या ज्ञानी लोकांचं वर्तन चर्चनं सन्मानित केलं होतं. मध्ययुगीन ज्ञानव्यवहारात कमालीचं गांभीर्य आणि खिन्नता असे. ईश्वरी ज्ञानापासून लांब समजल्या जाणाऱ्या लोकांविषयी तुच्छतेचा भाव असे. हास्य तर सैतानाचं लक्षण समजलं जात असे. त्यामुळे ज्ञानी लोकांच्या चेहऱ्यावर सतत गांभीर्य, खिन्नता आणि माणूसघाणेपण असे. राब्लेने हा दांभिकपणा ओळखून हास्यालाच प्रभावी हत्यार म्हणून वापरलं. राब्ले लिहितो की, हास्य माणूसपणाची खूण आहे.
वरवर पाहता राब्लेचं लिखाण विनोदी, विडंबनपर, टोकाचं अश्लील आणि शिवराळ आहे. पण प्रतीकात्मक पातळीवर वाचल्यावर लक्षात येतं की त्याचा मानवतावादी गाभा ‘ bone marrow’ सारखा सकस आहे. त्यामुळे प्रसिद्ध लेखिका जॉर्ज सॉन्द (१८०४-१८७६) म्हणते, ‘ Oh divine Master! You are such an atrocious pig!’ अश्लील लेखक म्हणून राब्लेला १९व्या शतकापर्यंत वाळीत टाकण्यात आलं होतं. व्हिक्टर ह्युगो, बाल्झाक, फ्लोबेर, जॉर्ज सॉन्दसारख्या कादंबरीकारांनी त्याच्या लिखाणातले अभिजात विचार समोर आणले. थोडक्यात, राब्लेच्या स्फोटक मानवतावादात ‘सर्वोच्च न्यायदेवते’च्या अनुपस्थितीतला फक्त मानवी स्वैराचार नसून, मानवी जबाबदारीच्या तत्त्वालासुद्धा अधोरेखित करण्यात आलं आहे. उदाहरणार्थ, पॉन्ताग्रुएलला लिहिलेल्या पत्रात गारगॉन्तुआ शेवटी स्वातंत्र्याच्या लाटेवर स्वार झालेल्या आधुनिक माणसाला सर्वकालिक इशारा देतो,‘Science without conscience is but the ruin of the soul.’ – विवेकाविना विज्ञान हा आत्म-नाश!