हैदराबाद संस्थानात असलेले आणि आताच्या धाराशिव (उस्मानाबाद) जिल्ह्यातलं तेर हे गाव आंतरराष्ट्रीय व्यापार केंद्र होते याचा मागमूस बरीच शतके स्थानिक लोकांनाही नव्हता. तेरचा व्यापार अगदी रोमपर्यंत चालायचा; हे पुराव्यानिशी सिद्ध झालेले आहे. तेर गावाने अनेक राजवटी पाहिलेल्या आहेत, धार्मिक स्थित्यंतरे पाहिलेली आहेत. तेर हे बौद्ध धर्मीयांचे सार्थवाहांच्या मार्गावरील एक मुख्य स्थान होते.

ऐतिहासिक कागदपत्रांमध्ये धार्मिक ग्रंथांमध्ये तेरचे उल्लेख आढळायचे, पण तेरची स्थाननिश्चिती होत नव्हती; कारण त्यावर पुरातत्त्व विद्वानांची मतमतांतरे होती. विसाव्या शतकाच्या सुरुवातीला तेरची एकदाची स्थाननिश्चिती झाली. स्कॉटिश पुरातत्त्वशास्त्रज्ञ आणि छायाचित्रकार हेन्री कझिन्स यांनी दि.२१ नोव्हेंबर १९०१ रोजी तेरला भेट दिली आणि तेर पुरातत्त्वाच्या जागतिक नकाशात सामील झाले. तेरवर प्रकाश टाकण्याचा दुसरा प्रयत्न निजाम सरकारच्या पुरातत्त्व खात्यामार्फत १९३० साली करण्यात आला होता. मराठीमध्ये तेर आणि तेरबद्दल काही पुस्तके आहेत, तसेच तेरचे उल्लेख इंग्रजीमधून पुरातत्त्व संशोधकांच्या पुस्तकांमध्ये आहेत; पण तेरविषयी स्वतंत्र असे इंग्रजी पुस्तक नाही, ती उणीव डॉ. माया शहापूरकर पाटील यांनी ‘रेमिनिसन्सेस ऑफ तेर (तगर)’ हे पुस्तक लिहून भरून काढली आहे.

या पुस्तकामध्ये ऐतिहासिक, पौराणिक माहिती कमी आणि पुरातत्त्वीय अंगाने दिलेली माहिती जास्त आहे. तसेच उत्खननात सापडलेल्या अनेक वस्तूंची उत्तम छायाचित्रांसह सविस्तर माहिती दिलेली आहे. स्वातंत्र्योत्तर काळातच तेरमध्ये आतापर्यंत १९५८ साली, १९६५-६६ साली, १९७५ साली, १९८७-८८ साली उत्खनन झाले होते. सर्वांत अलीकडचे उत्खनन २०१५ मध्ये झाले. दहा वर्षांपूर्वीच्या या उत्खननाचे वैशिष्ट्य म्हणजे स्वत: लेखिकेच्या मार्गदर्शनाखाली हे उत्खनन झाले होते.

तब्बल २६-२७ वर्षांनंतर डॉ. माया पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली झालेल्या उत्खननात नव्याने सातवाहनकालीन नगरीभोवती असलेल्या लाकडी तटबंदीचे अवशेष मिळाले. तसेच विटांनी बांधलेले हौद, वेगवेगळ्या आकाराची मातीची भांडी, प्राण्यांची हाडे, परदेशाशी- ग्रीस आणि रोमशी- व्यापार असल्याचे सिद्ध करणारी रोलेटेड वेअर आणि मेगॅरियल वेअर या प्रकारांमधली मातीची भांडी, धातूची भांडी, मणी, खेळणी, तांब्याची नाणी, लोखंडी खिळे, कौल, लाल खापरे, शंखाच्या वस्तू, मूर्ती, विटांचे बांधीव कुंड, खापराचा आड, काचेच्या बांगड्यांचे तुकडे मिळाले आहेत. विशेष म्हणजे एका भांड्यामध्ये जळालेल्या अवस्थेतील एकत्र केलेला तांदूळ आणि डाळ सापडली. तसेच जळालेल्या अवस्थेतील मूगडाळ, तूरडाळ, ज्वारी, बाजरी, गहू मिळाले. पाण्यावर तरंगणाऱ्या विटा आणि लज्जागौरीच्या मूर्ती हे एक तेर येथील उत्खननाचे वैशिष्ट्य आहे. तेरमध्ये अनेक पुरातन मंदिरे असून बौद्ध, जैन धर्मीयांचे अनेक अवशेष आजही आहेत.

पुरातत्त्व खात्यातर्फे तेर येथे सुरुवातीला झालेल्या १९६५-६६ आणि ६७-६८ च्या उत्खननांत खऱ्या अर्थाने तेरच्या विस्ताराची कल्पना आली होती. त्या उत्खननात इसवीसनाच्या दुसऱ्या शतकातील २६ मीटर व्यासाच्या एका प्रचंड मोठ्या बौद्धस्तूपाचे अवशेष सापडले होते. ते अवशेष सापडल्यानंतर ज्याची शेती होती त्या शेतकऱ्याने ते अवशेष शेत नांगरून नष्ट केले, गावकऱ्यांनी विटा नेल्या. आजही त्या शेताला ‘इटाचे अर्थात विटांचे शेत’ म्हणतात. या पुस्तकात स्तूपाबद्दल माहिती आहे; पण स्तूप नष्ट कसा झाला; हे सांगण्याचे लेखिकेने का टाळले असावे, हे कळत नाही. या निमित्ताने भारतीय लोकांची ऐतिहासिक वस्तू आणि वास्तूंबद्दलची अनास्था कोणत्या टोकाची असू शकते हे लोकांसमोर आले असते.

‘रेमिनिसन्सेस ऑफ तेर (तगर)’

लेखिका : डॉ. माया जे. पाटील (शहापूरकर)

प्रकाशक : अपरान्त प्रकाशन, पुणे</strong>

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

पृष्टे : २९९ किंमत : ४०० रु.