scorecardresearch

खेळ, खेळी खेळिया : आशियाई तंबूत रशियन उंट!

अनेक रशियन बुद्धिबळपटूंना सामावून घेण्याचे प्रामाणिक प्रयत्न युरोपीय बुद्धिबळ संघटनांनी सुरू केले आहेत.

chess

सिद्धार्थ खांडेकर

अनेक रशियन बुद्धिबळपटूंना सामावून घेण्याचे प्रामाणिक प्रयत्न युरोपीय बुद्धिबळ संघटनांनी सुरू केले आहेत. आशियाई बुद्धिबळ संघटना मात्र, तसा प्रयत्न करण्याच्या फंदातही पडली नाही. उलट रशियन संघटनेला आवतण देण्यात मात्र आशियाई संघटना पहिली होती.

युक्रेनमध्ये रशियाने केलेल्या अन्याय्य आक्रमणाला नुकतेच २४ फेब्रुवारी रोजी एक वर्ष पूर्ण झाले. राजनैतिक आणि आर्थिक पातळीवर व्लादिमीर पुतिन यांच्या आक्रमक रशियाचे विलगीकरण करण्याचे प्रयत्न जारी आहेत. पण क्रीडा क्षेत्रातील परिस्थिती थोडी वेगळी आहे. त्यातही विशेषत: बुद्धिबळाच्या पटावर रशियाचे ‘शुद्धीकरण’ करण्याचे जोरदार प्रयत्न सुरू होते. युरोपीय बुद्धिबळ संघटनेने प्रयत्नपूर्वक हुसकावून लावल्यानंतरही या संघटनेला आता आशियाई बुद्धिबळ संघटनेने आश्रय दिला आहे. यापूर्वी आशियाई ऑलिम्पिक संघटनेने रशियन खेळाडूंसाठी कवाडे खुली करण्याची घोषणा केली होती. परंतु अधिकृतपणे ही कवाडे प्रथम उघडली, ती आशियाई बुद्धिबळ संघटनेने.

अबूधाबीत अलीकडेच याविषयीचा ठराव २९ विरुद्ध १ मताधिक्याने संमत झाला. याचा अर्थ युरोपीय बुद्धिबळ संघटनेतर्फे आयोजित स्पर्धामध्ये खेळता आले नाही, तरी रशियन बुद्धिबळपटू यापुढे आशियाई संघटनेअंतर्गत स्पर्धामध्ये खेळू शकतात. त्यामुळे विशेषत: भारत आणि चीन या आशियाई बुद्धिबळ महासत्तांसमोर पेचात्मक परिस्थिती उभी राहू शकते. कारण जगज्जेतेपदासाठीच्या विभागीय किंवा खंडीय स्पर्धामध्ये त्यांच्यासमोर अनेक निष्णात रशियन बुद्धिबळपटूंना मात देण्याचे आव्हान राहील. रशियन बुद्धिबळपटूंमुळे येथील स्पर्धाचा दर्जा उंचावेल, अधिक तीव्र स्पर्धा निर्माण होईल, असे चित्र उभे केले जात आहे. वास्तविक जगज्जेतेपदासाठीच्या विभागीय स्पर्धा सोडल्यास इतक्या मोठय़ा संख्येने त्या स्वरूपाच्या स्पर्धाच होत नाहीत. आशियाई सांघिक स्पर्धा, वैयक्तिक स्पर्धामध्ये रशियाचे अस्तित्व समतोल बिघडवणारे ठरू शकते. परंतु या स्पर्धाचे स्वरूप कालसुसंगत असते आणि त्यापेक्षा खासगी निमंत्रितांच्या स्पर्धाचे प्रमाण अधिक आहे.

पुतिन यांच्या युद्धखोरीचा फटका बसलेल्या अनेक रशियन बुद्धिबळपटूंविषयी सहानुभूती वाटणे काहीसे स्वाभाविक आहे. त्यांच्यातील बहुधा कोणासही युक्रेनचा भूभाग रशियाने बळकवावा, असे वाटत नसेल. सर्गेई कार्याकिनसारखे काही मूर्ख सोडले, तर बहुतांनी पुतिन यांची बाजू घेण्याचे टाळले. शिवाय किमान ४० बुद्धिबळपटूंनी जाहीरपणे विरोधही केला. ही संख्या फार नसली, तरी रशियाचे सर्वच बुद्धिबळपटू आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक समितीच्या निर्देशानुसार फिडे किंवा आंतरराष्ट्रीय बुद्धिबळ संघटनेच्या ध्वजाखाली खेळतात. रशियाचे जवळपास २०० ग्रँडमास्टर आहेत आणि सर्वाधिक नोंदणीधारक व मानांकनधारक बुद्धिबळपटू याच देशात आहेत.

बुद्धिबळ जगज्जेते आणि जगज्जेत्या, रशियातून उद्भवणे तूर्त थांबलेले असले तरी अजूनही हा देश या ६४ चौरसांच्या खेळातली महासत्ता म्हणवला जाऊ शकतो. २००८मध्ये रशियाच्या व्लादिमीर क्रॅमनिकला आपल्या विश्वनाथन आनंदने पराभूत केले. तो रशियाचा आतापर्यंतचा शेवटचा जगज्जेता. पुढे सर्गेई कार्याकिन आणि इयन नेपोम्नियाशी हे रशियन बुद्धिबळपटू जगज्जेतेपदाच्या लढतींमध्ये जगज्जेत्या मॅग्नस कार्लसनसमोर आव्हानवीर म्हणून खेळले. कार्लसनने जगज्जेतेपदाच्या लढतीमध्ये खेळणेच सोडून दिल्याचे मध्यंतरी जाहीर केल्यामुळे आता पुढील महिन्यात नेपोम्नियाशी आणि चीनचा डिंग लिरेन यांच्यात ही लढत होईल. ती जिंकून नेपोम्नियाशी जगज्जेता होणे अशक्य नाही. तसे झाल्यास १५ वर्षांनी रशियाचा जगज्जेता (नेपोम्नियाशी फिडेच्या ध्वजाखाली खेळणार असला, तरी) बुद्धिबळ जगताला लाभेल. फिडेच्या वतीने फेब्रुवारी महिन्यातील आधारित मानांकन क्रमवारी जारी करण्यात आली. तीत पुरुषांमध्ये पहिल्या शंभरात सर्वाधिक १७ जण आहेत, तर महिलांमध्ये पहिल्या शंभरीत १३ जणी. फ्रान्सचा अलीरझा फिरूझा, भारताचे प्रज्ञानंद-गुकेश-एरिगेसी, उझबेकिस्तानचा नॉदिरबेक अब्दुससत्तारॉव या युवा गुणवान, संभाव्य जगज्जेत्यांमध्ये दानिल दुबॉव, आंद्रेई एसिपेन्को या रशियन बुद्धिबळपटूंचाही विचार केला जातो. सबब, जगज्जेते मिळत नसले तरी रशियाचे बुद्धिबळ साम्राज्य लयाला गेलेले नाही.

किंबहुना, या खेळातील प्रशासन नियंत्रण आजही प्राधान्याने रशियन मंडळींच्या हातात आहे. रशियन बुद्धिबळ संघटनेतील प्रशासक मंडळी पुतिन यांच्या नजीकच्या वर्तुळातली आहेत, हा त्यांच्याविषयीचा युरोपीय बुद्धिबळ संघटनेचा आक्षेप मात्र रास्त आहे. रशियन बुद्धिबळ संघटनेच्या विश्वस्त मंडळात त्या देशाचे संरक्षणमंत्री सर्गेई शोइगु आणि पुतिन यांचे माध्यम सचिव दिमित्री पेसकॉव यांचा समावेश आहे. रशियाच्या सुरक्षा मंडळातील आणखीही काही जण बुद्धिबळ संघटनेशी संलग्न आहेत. या संघटनेविषयी फिडेने म्हणावा तितका कठोरपणा दाखवलेला नाही. फिडेचे विद्यमान अध्यक्ष अर्कादी द्वोर्कोविच हे एके काळी रशियाचे उपपंतप्रधान होते. रशियन बुद्धिबळ संघटनेच्या छत्राखाली क्रिमियाचा समावेश करण्यात आला त्याला युरोपीय संघटनेने तीव्र विरोध दर्शवला, पण फिडेने त्याविषयी भाष्य केलेले नाही.

रशियाच्या आक्रमणानंतर फिडेने सुरुवातीस रशियात होणारे बुद्धिबळ ऑलिम्पियाड भारतात चेन्नई येथे भरवण्याचा निर्णय झाला. त्यानंतर रशिया आणि बेलारूसच्या बुद्धिबळ संघटनांवर बंदी घालण्यात आली. रशिया किंवा या युद्धात सुरुवातीपासून आजतागायत त्या देशाचा समर्थक बेलारूसमधील कोणत्याही कंपन्यांचे प्रायोजकत्व फिडेच्या स्पर्धामध्ये स्वीकारणार नाही, असेही जाहीर झाले. परंतु मध्यंतरी प्राधान्याने रशियन खेळाडू सहभागी झालेल्या एका स्पर्धेत रशियन पुरस्कर्त्यांचे लोगो वापरले गेल्याची छायाचित्रेच समाजमाध्यमांवर काही आजी-माजी बुद्धिबळपटूंनी प्रसृत केली. गेल्या महिन्यात सर्बियात झालेल्या पहिल्यावहिल्या अपंगांसाठीच्या ऑलिम्पियाडचा एक पुरस्कर्ता गाझप्रॉम या रशियन गॅस कंपनीशी संबंधित आहे. रशियातून बाहेर पडून युरोपातील इतर देशांसाठी खेळू इच्छिणाऱ्या बुद्धिबळपटूंसाठी रशियन संघटनेला द्याव्या लागणाऱ्या शुल्कातून सूट देण्याचा निर्णय फिडेने एकीकडे घेतला. पण दुसरीकडे आख्खी रशियन संघटनाच आशियाई संघटनेत विलीन करून दाखवण्याची अनाकलनीय तत्परताही फिडेने दाखवली.           

राजकीय मुद्दे आणि खेळ यांची सरमिसळ होऊ द्यायची नाही, विशिष्ट देशांच्या सरकारांच्या धोरणांचा व कृतीचा विपरीत परिणाम त्या देशांतील खेळाडूंवर होऊ नये व ते संधींपासून वंचित राहू नयेत, या सद्भावनेने ऑलिम्पिक समिती आणि फिडे रशियन खेळाडूंसाठी स्पर्धेच्या वाटा धुंडाळत आहे. हे जरी खरे मानले, तरी संघटनांचे पाईक-पालक राजकीय विचारांनी प्रेरित असतील आणि त्यांच्याकडून अभिप्रेत तटस्थपणाच दाखवत नसतील, तर सहानुभूती तरी किती काळ दाखवत राहायची हा प्रश्न यानिमित्ताने उपस्थित होतो. या सहानुभूतीदारांना युक्रेनच्या बुद्धिबळपटूंच्या यातना कळाल्यास वास्तवाचे अधिक भान येऊ शकेल.

‘चेस डॉट कॉम’ या संकेतस्थळाने, गेल्या वर्षभरात रशियन बॉम्बवर्षांवाला वैतागून राहते घर सोडून देशाबाहेर पडावे लागणाऱ्या मोजक्या युक्रेनियन बुद्धिबळपटूंच्या कहाण्या युद्धाच्या वर्षपूर्तीनिमित्त प्रसिद्ध केल्या आहेत. त्या मनद्रावक आहेत. यांतील काही परत आले असून अजूनही भयाच्या छताखाली वावरत आहेत. काहींनी इतर देशांचा आश्रय घेतला आहे. अनेक रशियन बुद्धिबळपटूंनीही पुतिन यांचा निषेध करून देशत्याग केला आहे. त्यांपैकी अनेकांना सामावून घेण्याचे प्रामाणिक प्रयत्न अनेक युरोपीय बुद्धिबळ संघटनांनी सुरू केले आहेत. त्यांना यशही येत आहे.

 तसा कोणताही प्रयत्न करण्याच्या फंदातही  आशियाई बुद्धिबळ संघटना पडली नाही. उलट रशियन संघटनेला आवतण देण्यात मात्र ही संघटना पहिली होती. रशियन बुद्धिबळपटू आणि रशियन बुद्धिबळ संघटना हे वेगवेगळे विषय आहेत. एका घटकाविषयी सहानुभूती दुसऱ्याला लागू होत नाही. संघटनेत पुतिनसमर्थक आहेत. त्यांच्याशी सौदा करण्याचीही काही गरज नव्हती. आखातातील अनेक श्रीमंत संघटनांना गरजू युक्रेनियन आणि रशियन बुद्धिबळपटूंना आश्रय आणि इतर मदत सहज करता आली असती. तसे न करता, संघटनात्मक पातळीवर मैत्री आणि मदतीचे खेळ झाले. त्याला नाव दिले गेले बुद्धिबळपटूंच्या कल्याणाचे. आशियाई तंबूतला हा रशियन उंट यजमानांना डोईजड ठरणारच नाही याची हमी कोण देईल?

मराठीतील सर्व स्तंभ ( Columns ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 04-03-2023 at 00:02 IST