चित्रपटकार वेर्नर हर्त्झॉग यांना पुरस्कार नवे नाहीत. ‘ऑस्कर’ने त्यांच्या लघुपटास हुलकावणी दिली; तरी अन्य अनेक महत्त्वाचे पुरस्कार त्यांना मिळाले आहेत. पण ‘व्हेनिस चित्रपट महोत्सवा’मध्ये त्यांना कारकीर्द गौरव म्हणून नुकत्याच (२८ ऑगस्ट रोजी) मिळालेल्या ‘गोल्डन लायन’चा मान आगळा- कारण इथे खुद्द फ्रान्सिस फोर्ड कोपोला यांच्यासारख्या ‘गॉडफादर’ दिग्दर्शकाने हर्त्झॉग यांच्याबद्दल प्रशस्तिपर भाषण केले. ‘हर्त्झॉग हे चित्रपट क्षेत्रातले विश्वकोश आहेत… त्यांच्या मर्यादा समजा काही असतील, तर त्या मला माहीत नाहीत’ अशा शब्दांत कोपोला यांनी वेर्नर हर्त्झॉग यांचा अमर्यादपणा अधोरेखित केला.
वेर्नर हर्त्झॉग यांची कारकीर्द या प्रशंसेला शोभणारीच आहे. कथेतर चित्रपट (हे सारेच लघुपट नाहीत किंवा माहितीपट/अनुबोधपटही नाहीत) हे त्यांचे खरे बलस्थान. अर्थात त्यांनी कथापटही (फीचर फिल्म) दिग्दर्शित केले आणि त्यापैकी अॅग्वायर- द रॅथ ऑफ गॉड (१९७२), द एनिग्मा ऑफ कॅस्पर हाउसर (१९७४) आणि नोस्फरातु द व्हॅम्पायर (१९७९) यांना पुरस्कारही मिळाले. मात्र ८२ वर्षांचे, अर्धशतकाहून अधिक काळ चित्रपट करणारे हर्त्झॉग जिवंतपणीच कालातीत ठरले, ते त्यांच्या कथेतर चित्रपटांमुळे.
या कथेतर चित्रपटांनीही अर्थातच, मानवी क्षमता किती ताणता येतात आणि निसर्ग आजदेखील कितपत अनाकलनीय असू शकतो, याच्या गोष्टी सांगितल्या आहेत. इराण-इराक युद्धानंतरच्या जळत्या तेलविहिरींची कथाच ‘लेसन्स ऑफ डार्कनेस’मध्ये येते. वज्रयान तंत्रमार्गात लामांना स्थान देण्याच्या ‘कालचक्र’ सोहळयाचे चित्रण करणारा ‘व्हील ऑफ टाइम’, फ्रान्समधल्या आदिम चित्रांच्या लास्कॉ गुंफांमध्ये खास सरकारी परवानगीने जाऊन चित्रित केलेला ‘केव्ह ऑफ फरगॉटन ड्रीम्स’, अलास्कात अस्वलांचा सांभाळ व अभ्यास करणे हेच जीवनकार्य मानणाऱ्या टिमथी ट्रेडवेल यांच्या ध्यासाचा ठाव घेणारा ‘द ग्रिझली मॅन’ , अंटार्क्टिका खंडातला ‘एन्काउण्टर्स अॅट द एण्ड ऑफ द वर्ल्ड’ किंवा तैगा प्रदेशातला ‘हॅपी पीपल- अ इयर इन तैगा’, ‘‘इंटरनेट स्वत:बद्दल स्वप्ने पाहू शकते का?’’ हा वरवर विचित्र वाटणारा गहन प्रश्न इलॉन मस्कसह अनेकांना विचारून नवतंत्रज्ञान- मानव संबंधांचे भवितव्य कोण ठरवणार हा मुद्दा मांडणारा ‘लो अॅण्ड बिहोल्ड’… अलीकडला- अंगोलातल्या आफ्रिकी हत्तींचा माग काढणारा ‘घोस्ट एलिफंट्स’ (हा यंदा व्हेनिस महोत्सवात दाखवला गेला व ‘नॅशनल जिऑग्राफिक’ने खरेदी केला)… असे एकंदर ३५ कथेतर चित्रपट, शिवाय आठ लघुपट हर्त्झॉग यांनी दिग्दर्शित केले, बहुतेकांचे लेखन व सुमारे ३० चित्रपटांत स्वत: निवेदनही केले.
म्युनिकमध्ये शिकलेले, १७व्या वर्षापर्यंत जगाशी फारसा संपर्क न आलेले वेर्नर ‘एका प्रेयसीसाठी इंग्लंडला जाऊन’ इंग्रजी शिकले. याहून अचाट गोष्टी त्यांनी केल्या. स्वत:चा बूट शिजवून खाण्याची पैज हरले म्हणून ‘वेर्नर हर्त्झॉग ईट्स हिज शू’ हा लघुपट (१९८०) तयार करून त्यात खरोखर बूट खाल्ला हा यापैकी सर्वांत उत्तुंग अचाटपणा. कुणाला तो आचरटही वाटेल, पण मर्यादा न मानणे हीच कलेची ताकद असते हे कलावंताने ओळखत राहायला हवे, हा संदेश यातून मिळत राहिला!