ग्रेगरीयन (आणि एकूणच रोमन) कॅलेंडर सांगोपांग पाहून झालं. पण एका दृष्टीने विचार करता हे अतिशय भोंगळ कॅलेंडर आहे. कसं?
काळ मोजायचा म्हणजे नेमकं काय मोजायचं? कोणती तरी पुनरावर्ती घटना मोजायची. पुरातन काळी इजिप्शियन लोकांनी ‘नाईल नदीला येणारा पूर’ ही पुनरावर्ती घटना वापरून ‘वर्ष’ या संकल्पनेची व्याख्या केली होती. पण एखादी खगोलीय घटना पुनरावर्ती घटना म्हणून वापरली तर ते अधिक अचूक ठरतं आणि म्हणून, ते अधिक श्रेयस्कर. ग्रेगरीयन कॅलेंडरमध्ये वर्षाची व्याख्या ‘पृथ्वीसापेक्ष सूर्याचं स्थान’ या खगोलीय घटनेवर आधारित आहे. पण त्याच ग्रेगरीयन कॅलेंडरमध्ये महिन्याची व्याख्या काय आहे? कोणती पुनरावर्ती खगोलीय घटना घडली की महिना संपला असं म्हणायचं? अशी कोणतीही घटना दाखवता येत नाही!
महिने हे त्या वर्षाचे मन:पूत पाडलेले भाग आहेत. ते बाराच का, याचं उत्तर देता येणार नाही. विशिष्ट महिना विशिष्ट दिवसांचाच का, याचंही उत्तर देता येणार नाही. केवळ संकेत, केवळ ‘आम्ही म्हणतो म्हणून’ हेच त्याचं उत्तर आहे.
हे तरी ठीक. ग्रेगरीयन कॅलेंडरनुसार दिवसाची व्याख्या काय? तर म्हणे मध्यरात्री बारा वाजता नवा दिवस सुरू होतो. यात दोन गोष्टी खटकण्याजोग्या. एक तर ज्याप्रमाणे दिवसा बारा वाजले म्हणजे मध्यान्ह झालीच असं नाही त्याचप्रमाणे रात्री बारा वाजले म्हणजे मध्यरात्र झालीच असंही नाही आणि दुसरं म्हणजे रात्री बारा वाजता अशी कोणती खगोलीय घटना घडते की ज्यामुळे आपण नवा दिवस सुरू झाला असं म्हणायचं? कोणातीही नाही! त्यामुळे रात्री बारा वाजता नवा दिवस हा केवळ एक संकेत झाला. आम्ही म्हणतो म्हणून तेव्हापासून नवा दिवस सुरू, एवढंच काय ते.
थोडक्यात, महिन्याची किंवा दिवसाची ग्रेगरीयन कॅलेंडरमधली व्याख्या ही कोणत्याही खगोलीय घटनेवर आधारित नाही! आता याला भोंगळपणा नाही म्हणायचं तर काय म्हणायचं?
या तुलनेत हिजरी कालगणना पाहा. तिथे दिवसाची व्याख्या खगोलीय घटनेवर आधारित आहे – सूर्य अस्ताला गेला, नवा दिवस सुरू झाला. महिन्याची व्याख्यादेखील खगोलीय घटनेवर आधारित आहे – नवा चंद्र दिसू लागला, नवा महिना सुरू झाला. पण असे बारा महिने झाले म्हणजे एक वर्ष झालं ही वर्षाची व्याख्या मात्र कोणत्याही खगोलीय घटनेवर आधारित नाही.
मग अशी कोणती कालगणना आहे का की जिच्यात कालमापनाची सर्व एककं कोणत्या ना कोणत्या खगोलीय घटनेवर आधारित आहेत? अलबत! शालिवाहन शक (आणि, अर्थातच, विक्रम संवत) ही अशी कालगणना आहे. या कालगणनेत वापरलेल्या प्रत्येक एककाच्या मागे एखाद्या खगोलीय घटनेचा भरभक्कम आधार आहे. तिथी, दिन, मास आणि वर्ष ही चारही एककं खगोलीय घटनांशी निबद्ध आहेत.
सूर्य आणि चंद्र यांच्या भासमान स्थितींमध्ये १२ किंवा त्या पटीत अंतर ही झाली तिथीची व्याख्या. या सूर्योदयापासून ते पुढच्या सूर्योदयापर्यंत ही झाली दिवसाची व्याख्या. या नव्या चंद्रापासून ते पुढच्या नव्या चंद्रापर्यंत ही झाली महिन्याची व्याख्या आणि त्याच तारकासमूहाच्या पार्श्वभूमीवर, नेमक्या त्याच जागी सूर्य पुन्हा दिसू लागण्यासाठी जितका कालावधी जावा लागतो ते झालं वर्ष.
पण यात एक बारकीशी अडचण आहे. ती म्हणजे बारा महिने झाले तरी वर्ष पूर्ण झालेलं नसतं! कारण बारा चांद्र महिने म्हणजे सुमारे ३५४-३५५ दिवस आणि एक वर्ष म्हणजे सुमारे ३६५ दिवस. हे दहा-अकरा दिवस भरून कसे काढायचे? अर्थात, ही अडचण सगळ्या चांद्र मास आणि सौर वर्ष मानणाऱ्या कालगणनांची असते. आणि बहुतेक सगळ्या कालगणना यासाठी अधिक महिना घेतात. पण त्यासाठीचे नियम तितकेसे शास्त्रशुद्ध नसतात. शालिवाहन शकाची खासियत ही आहे की हा अधिक महिना कधी घ्यायचा आणि कोणता महिना अधिक म्हणायचा हे कोणाच्या मर्जीवर ठरत नाही. त्यासाठी खगोलीय घटनांवर आधारित सुस्पष्ट नियम आहे. त्यामुळे यात कोणत्याही प्रकारची ढवळाढवळ संभवत नाही!
वास्तविक हा नियम ‘अधिक महिना कोणता असावा’, ‘अधिक महिना कधी असावा’ या प्रश्नांकरता नाहीच आहे! हा नियम कोणत्याही महिन्याचं नाव काय असावं हे सांगतो. आणि मग हा नियम पाळला की योग्य त्या वेळी योग्य तो महिना अधिक महिना म्हणून आपोआप निष्पन्न होतो. केवळ तेवढंच नाही, योग्य त्या वेळी, गरजेनुसार एखाद्या महिन्याचा क्षयही होतो! आणि हे सगळं खगोलीय घटनांवर आधारित. कोणत्याही मानवी हस्तक्षेपाची गरज नाही. कोणाच्याही ढवळाढवळीला काही स्थान नाही.
आता हे सगळं नेमकं कसं घडतं ते आपण पाहणार आहोतच. पण ते पुढच्या भागात.
@KalacheGanit
kalache.ganit@gmail.com