आज सुरुवात थोडं पूर्वसूत्र सांगून करू. आपण सध्या वापरतो त्या कॅलेंडरला अनेक जण ‘इंग्लिश कॅलेंडर’, ‘ख्रिस्ती कॅलेंडर’ वगैरे नावांनी संबोधतात. पण त्याचं अधिकृत नाव आहे ‘ग्रेगरीयन कॅलेंडर’. पोप ग्रेगरी — तेरावे यांनी सन १५८२ मध्ये ते अमलात आणलं. पोप ग्रेगरींनी अमलात आणलं म्हणून ‘ग्रेगरीयन’. पण पोप ग्रेगरींनी काही नवं कॅलेंडर अमलात आणलं असं नव्हे. त्याकाळी प्रचलित असलेल्या जूलियन कॅलेंडरमध्ये त्यांनी काही बदल केले एवढंच.

या बदलांचा एक भाग दहा दिवस नाहीसे करणे हा होता. ४ ऑक्टोबर १५८२ या दिवसानंतर सरळ १५ ऑक्टोबर १५८२ हा दिवस उजाडला! म्हणजे ४ ऑक्टोबर १५८२ पर्यंत जूलियन कॅलेंडर वापरात होतं. त्याच्या पुढच्या दिवसापासून ग्रेगरीयन कॅलेंडर अमलात आलं आणि त्या दिवसाची तारीख जूलियन कालगणनेप्रमाणे ५ ऑक्टोबर १५८२ असायची ती ग्रेगरीयन कालगणनेनुसार १५ ऑक्टोबर १५८२ झाली.

पण हा बदल ‘मागिलांनी केलेल्या चुका निस्तरणे’ अशा प्रकारचा होता. जूलियन कॅलेंडरमधल्या गडबड-घोटाळ्यांमुळे ज्या त्रुटी निर्माण झाल्या होत्या त्यांचा प्रभाव नाहीसा करण्यासाठी हे दहा दिवस गायब करणं गरजेचं होतं. पण मुळात अशा त्रुटी पुन्हा निर्माणच होऊ नयेत यासाठी काही उपाययोजना करायला हवीच होती आणि पोप ग्रेगरी यांनी तीही केली. ती नेमकी काय होती हे आपण आज पाहणार आहोत आणि यासाठी बरीच आकडेमोड करावी लागणार.

जूलियन कॅलेंडरमध्ये दर चौथं वर्ष लीप वर्ष असतं. म्हणजे सनाच्या संख्येला चारने नि:शेष भाग जात असेल तर ते वर्ष लीप वर्ष असतं. वरवर पाहता असं वाटतं की हल्लीदेखील दर चौथं वर्ष लीप वर्ष असतंच की. उदाहरणार्थ मागचं वर्ष, सन २०२४, हे लीप वर्ष होतं. कारण २०२४ ला चारने नि:शेष भाग जातो. पण सध्याचं वर्ष, सन २०२५, हे लीप वर्ष नाही कारण २०२५ ला चारने नि:शेष भाग जात नाही.

बरोबर. पण या दोन कालगणनांमधला फरक ज्या वर्षांना १०० ने नि:शेष भाग जातो अशा वर्षांमध्ये पडतो. एक लक्षात घ्या, ज्या वर्षांना १०० ने नि:शेष भाग जातो त्यांना चारनेही नि:शेष भाग जातो. त्यामुळे जूलियन कालगणनेनुसार १०० ने नि:शेष भाग जाणारं प्रत्येक वर्ष लीप वर्ष असतं आणि म्हणून सन १९००, सन २१००, वगैरे वर्ष जूलियन कालगणनेनुसार लीप वर्ष ठरतात.

पण ग्रेगरीयन कालगणनेनुसार ज्या वर्षांना १०० ने नि:शेष भाग जातो ती सगळी वर्ष लीप वर्ष नसतात. अशा वर्षांना जर ४०० ने नि:शेष भाग जात असेल तरच ते लीप वर्ष धरतात. म्हणजे ग्रेगरीयन कालगणनेनुसार सन १९००, सन २१०० ही वर्ष लीप वर्ष नाहीत. पण सन २००० हे मात्र लीप वर्ष होतं.

दुसऱ्या दृष्टिकोनातून विचार करू. सन २००१ ते सन २४०० असा ४०० वर्षांचा कालखंड घ्या. जूलियन कालगणनेनुसार यात एकूण १०० लीप वर्ष असतील आणि बाकीची ३०० साधी वर्षं असतील. म्हणजे दिवस किती झाले? १०० × ३६६ + ३०० × ३६५ = १,४६,१०० दिवस.

पण ग्रेगरीयन कालगणनेनुसार याच कालावधीत ९७ लीप वर्ष असतील. हा तीन वर्षांचा फरक पडला कारण सन २१००, सन २२०० आणि सन २३०० ही तीन वर्ष! यांना चारने नि:शेष भाग जातो खरा, पण ४०० ने नाही. त्यामुळे ग्रेगरीयन कालगणनेत ही साधी वर्ष होतात. तेव्हा, ९७ लीप वर्ष आणि बाकीची ३०३ साधी वर्ष. म्हणजे दिवस किती झाले? ९७ × ३६६ + ३०३ × ३६५ = १,४६,०९७ दिवस.

म्हणजे पोप ग्रेगरींनी काय केलं एवढं मोठं तर ४०० वर्षांतून अवघे तीन दिवस कमी केले! वरवर पाहता अगदी क्षुल्लक गोष्ट. पण त्याचा परिणाम काय झाला पाहा. आधुनिक विज्ञान सांगतं की वर्षाची लांबी ३६५.२४२२ दिवस असते. म्हणजे ४०० वर्षांत झाले ३६५.२४२२ × ४०० = १,४६,०९६.८८ दिवस. जूलियन कालगणनेनुसार ही संख्या येते १,४६,१०० दिवस आणि ग्रेगरीयन कालगणनेनुसार १,४६,०९७ दिवस.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

आतादेखील वर्षाची लांबी ही अगदी बिनचूक नाही. पण आता फरक ४०० वर्षांत ०.१२ दिवस एवढाच आहे. दुसऱ्या शब्दांत सांगायचं तर कालगणनेमध्ये चार हजार वर्षांनंतर एक दिवसाचा फरक पडेल. आता इतक्या वर्षांनंतर पडणाऱ्या इतक्या क्षुल्लक फरकाकरता आतापासून कशाला विचार करायचा! तेव्हा, पुढचा प्रदीर्घ कालखंड हा निर्विवादपणे ग्रेगरीयन कॅलेंडरचा आहे. ‘मरावे परी कीर्तीरूपे उरावे’ म्हणतात ते हे असं.