तीन लाटांमध्ये ग्रेगरीयन कॅलेंडरने जग व्यापलं. पहिली लाट धर्म-पंथाधारित होती, दुसरी विज्ञानाधारित होती आणि तिसरीचा आधार होता व्यापार. ग्रेगरीयन कॅलेंडरचा व्हॅटिकन ते जग हा प्रवास आज आपण पाहू.

अगस्ती दर्शन करून झालं. आता आपण परत ग्रेगरीयन कॅलेंडरकडे वळू. कोणी म्हणेल त्या कॅलेंडरवर एवढे लेख कशाला? याची दोन कारणं आहेत.

एक तर हे कॅलेंडर आहे कमालीचं अचूक. कोणताही बदल न करता आहे त्या स्वरूपात ते पुढची अनेक सहस्राकं चालू शकेल. आणि दुसरं असं की हे अक्षरश: जगभर सर्वत्र वापरलं जातं.

आता प्रश्न असा आहे की, हे एवढं विश्वव्यापक कसं झालं? ते अचूक आहे, सुलभ आहे म्हणून सगळ्या जगाने त्याचा चटकन स्वीकार केला असं झालं का? मुळीच नाही. या कॅलेंडरच्या प्रसारामध्येदेखील अनेक अडथळे आले, अनेक अडचणी आल्या. आणि व्हॅटिकन ते जग हा प्रवास करायला याला थोडीथोडकी नाही, सुमारे तीनशे-साडेतीनशे वर्षं लागली. हा प्रवास तीन टप्प्यांमध्ये झाला आणि हे पाहणं रंजक तर आहेच, शिवाय त्यातून शिकण्यासारखं पुष्कळ आहे.

आज तेच पाहू.

ख्रिास्ती धर्मातल्या कॅथलिक पंथाच्या प्रमुखाने रोममध्ये या कॅलेंडरबाबतचा आदेश २४ फेब्रुवारी १५८२ रोजी जारी केला. त्या पंथाच्या लोकांना धार्मिक बाबींसाठी तो निश्चितच बंधनकारक होता. पण नागरी बाबींसाठी कोणतं कॅलेंडर वापरायचं हा निर्णय घेण्याचा अधिकार ज्या त्या ठिकाणच्या शासकाचा. तेव्हा, जोपर्यंत एखादा राजा असं फर्मान काढत नाही तोपर्यंत त्या राज्यात हे कॅलेंडर नागरी बाबींसाठी वापरता येणार नाही. आणि म्हणूनच पोप ग्रेगरी यांनी हा आदेश विविध राजवटींकडे १ मार्च १५८२ रोजीच पाठवून दिला.

प्रतिसाद काही फारसा उत्साहवर्धक नव्हता. स्पेन आणि फ्रान्स या त्याकाळच्या युरोपातल्या प्रबळ कॅथलिक सत्ता. पण ‘आपल्या राज्यात ग्रेगरीयन कॅलेंडर वापरावं’ असा आदेश स्पेनच्या राजाने काढला तो प्रत्यक्ष अंमलबजावणीच्या जेमतेम आठवडाभर आधी म्हणजे २९ सप्टेंबर १५८२ रोजी! फ्रान्समध्ये तर या कॅलेंडरची अंमलबजावणी २० डिसेंबरपासून झाली! त्याखेरीज पूर्व युरोपातल्या काही कॅथलिक सत्तादेखील हे कॅलेंडर १५ ऑक्टोबरपासून वापरू लागल्या.

ग्रेगरीयन कॅलेंडरच्या प्रसाराची पहिली लाट धर्माधारित-पंथाधारित होती. पण त्याच्या पुढच्या प्रवासाला धर्म-पंथ हाच अडसर ठरत होता. कारण बिगर-कॅथलिक राजवटींनी या आदेशाकडे चक्क दुर्लक्ष केलं. ‘दुसऱ्या पंथप्रमुखाने जारी केलेला आदेश आम्ही का पाळावा’ असा त्यांचा प्रश्न होता.

कॅलेंडर स्वीकारण्यातला धर्माचा, श्रद्धेचा अडसर दूर झाला तो विज्ञान आणि वैज्ञानिक दृष्टिकोन विकसित झाल्यामुळे. अनेक वैज्ञानिकांनी, खगोलशास्त्रज्ञांनी ग्रेगरीयन कॅलेंडर हे जूलियन कॅलेंडरपेक्षा अधिक अचूक आणि म्हणून अधिक उपयुक्त आहे हे सप्रमाण दाखवून दिलं. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे ‘कॅथलिक धर्मगुरूंनी सुचवलेलं कॅलेंडर वापरणं म्हणजे त्या पंथाचे अनुयायी बनणं नव्हे’ हा विचार समाजमनात रुजला होता. या रेट्यामुळे पुढच्या शे-दीडशे वर्षांत युरोपातल्या बिगर-कॅथलिक राजवटींनीदेखील हे कॅलेंडर स्वीकारलं. सन १७०० मध्ये डेन्मार्क, नॉर्वे, नेदरलँड वगैरे आणि पुढे १७५२ मध्ये ब्रिटननेदेखील या कॅलेंडरचा अंगीकार केला.

ही ग्रेगरीयन कॅलेंडरच्या प्रसाराची दुसरी लाट होती – विज्ञानाधारित, विचाराधारित. या लाटेमुळे या कॅलेंडरने पंथाच्या सीमा ओलांडल्या. आता ख्रिास्ती धर्मातले विविध पंथांचे अनुयायी देश हे कॅलेंडर वापरू लागले. पण यानंतरदेखील हे कॅलेंडर युरोपपुरतंच मर्यादित राहिलं. हे कॅलेंडर विश्वव्यापक होण्याकरता कारणीभूत ठरला व्यापार.

सन १७६० मध्ये वाफेच्या इंजिनाच्या शोधामुळे औद्याोगिक क्रांतीची मुहूर्तमेढ रोवली गेली. हा जमाना होता अधिक उत्पादन आणि पर्यायाने अधिक व्यापाराचा. पण व्यापार तर करायचा आणि कालगणना तर वेगवेगळ्या पद्धतीने करायची म्हणजे गोंधळाला निमंत्रण. व्यापारी लोकांना व्यापार महत्त्वाचा होता. त्यासाठी लागतील त्या तडजोडी करायची त्यांची तयारी होती. त्यामुळे हळूहळू जगभरातले विविध देश हे कॅलेंडर वापरू लागले.

ही या कॅलेंडरच्या प्रसाराची तिसरी लाट होती. या लाटेत त्याने अखेर धर्माच्या आणि युरोपच्या सीमा ओलांडल्या. हे कॅलेंडर अंगीकारणारा पहिला बिगर-ख्रिास्ती आणि बिगर-युरोपीय देश होता जपान. सन १८७२ मध्ये जपान हे कॅलेंडर वापरू लागला. आणि हे कॅलेंडर अमलात आणणारा पहिला इस्लामी देश होता इजिप्त – सन १८७५. १८९५ साली कोरियाने, १९११ साली चीनने, १९१७ साली तुर्कस्थानने आणि १९१८ साली रशियाने हे कॅलेंडर वापरायला सुरुवात केली.

काय गंमत आहे पाहा. कॅलेंडरच्या प्रसारासाठी आधी धर्म कामी आला, मग विज्ञान. पण त्याच्या प्रसाराला खरा रेटा मिळाला व्यापारामुळे. ‘अर्थस्य पुरुषो दास: अर्थ एव प्रधान:’ म्हणतात ते उगीच नाही.