डॉ. उज्ज्वला दळवी
ध्यानामुळे भौतिक फायदेसुद्धा कुठल्याही धर्माच्या किंवा निधर्मी लोकांना मिळतात, हे प्रयोग-चाचण्यांतून सिद्ध झालंय..
‘‘माझं जगणं निर्थक आहे ग!’’ विमलाकाकूंनी संजीताकडे मन उघडं केलं. मुलं परदेशी; मैत्रीण नाही; छंद नाही. एकटेपणा काकूंना छळत होता. संजीतानं ध्यान (मेडिटेशन) शिकवायचा कोर्स करून मोठी परीक्षाही दिली होती. तिने काकूंच्या कलानं घेत त्यांना ध्यान शिकवलं. सुरुवातीला फारसा फरक जाणवला नाही. पण हळूहळू दु:ख, एकलेपणा, नैराश्य यांची पुटं निघत गेली. परिस्थिती बदलली नव्हती. पण तिचा सल घटत गेला. साध्या गोष्टींचा आनंद घेणं जमायला लागलं. संजीताने मैत्रिणी मिळवून दिल्या. आयुष्य बदललं.पी. व्ही. सिंधूनं नेमकं हेच म्हटलं, ‘‘ध्यानानं माझं आयुष्य बदललं. आंतरराष्ट्रीय स्पर्धाचा ताण न घेता खेळणं जमलं.’’ बिल गेट्सदेखील आठवडय़ातून दोन-तीनदा तरी ध्यान करतात.
‘‘आजी, आज आम्हाला शाळेत मेडिटेशन शिकवलं!’’ नऊ वर्षांच्या अनन्याने उडय़ा मारत मारत ओरडून सांगितलं.अलीकडे कुणालाही ध्यान शिकायची संधी असते. गेली काही हजार वर्ष ध्यान हा मुक्तीसाठी करायच्या तपाचरणाचा भाग होता. मठांत, तपोवनांत संन्यासी-तपस्वी- भिक्षू लोकांना ती दीक्षा मिळे. नंतर सर्वसामान्यांनाही ते शिक्षण आणि आध्यात्मिक लाभ मिळाला. १९६०-७०च्या सुमाराला काही मानसोपचारतज्ज्ञ ध्यान शिकले. त्यांनी आपल्या पेशंटांनाही ते शिकवलं आणि त्यांना मानसिक फायदा झाला. हळूहळू ध्यानाचे वेगवेगळे प्रकार समाजापर्यंत पोहोचले. बौद्ध भिक्षूंचं ध्यान वेगळं, ब्रह्मकुमारींचं वेगळं. कुणी श्वासावर लक्ष ठेवतात, कुणी हृदयावर, कुणी मंत्र जपतात तर कुणी ओम्!
त्यांच्यापैकी ‘माइंडफुलनेस मेडिटेशन’ या, वर्तमानाच्या सध्याच्या क्षणावर लक्ष्य केंद्रित करणाऱ्या, ‘क्षणलक्ष्यी’ ध्यान प्रकाराचा गेल्या ३० वर्षांत बराच अभ्यास झाला आहे.एकटेपणाशी झुंजणारे वयोवृद्ध लोक, अटीतटीच्या आंतरराष्ट्रीय क्रीडा स्पर्धातले खेळाडू आणि दरक्षणी अनंत समस्यांना तोंड देणारे मोठय़ा कंपन्यांतले उच्चपदस्थ व्यावसायिक अशा तीनही गटांना रीतसर ध्यान केल्यानं फायदाच होतो असं संशोधनात दिसून आलं. व्यसनांपासून सुटका व्हायला, दुर्धर वेदनांपासून आराम मिळवायला किंवा आघाडीवरचे सैनिक, अटीतटीच्या स्पर्धातले परीक्षार्थी यांची क्षमता वाढवायला ध्यानाची मदत होते हे आता संशोधनानं सिद्ध झालं आहे. चिवट, त्रासदायक पोटदुखी कह्यात आणायलाही तो उपाय केला गेला. तशा प्रत्येक वापराचा हार्वर्ड, कार्नेगी मेलन वगैरे बडय़ा विद्यापीठांत आखीव तौलनिक अभ्यास झाला. जीवनातल्या ताणतणावामुळे उद्भवणाऱ्या दुखण्यांवर ध्यान हा ‘पूरक इलाज’ ठरला. तो आधुनिक वैद्यकशास्त्राचा भाग झाला.
त्यासाठी, ध्यान करणाऱ्यांच्या वेगवेगळय़ा चाचण्या झाल्या. आपल्या मेंदूतलं संदेशवहन विजेमार्फत चालतं. त्या वीजलहरींचा अभ्यास झाला. गाढ ध्यानात दिसणाऱ्या संथ लहरी झोपेतल्या लहरींहून वेगळय़ा असतात. म्हणजे जेव्हा अगदी ब्रह्मानंदी टाळी लागते तेव्हाही मन सजग असतं. दैनंदिन ताणामुळे, म्हातारपणीच्या वा एरवीच्याही एकाकीपणामुळे काही हानीकारक पदार्थाचं प्रमाण रक्तात वाढतं- प्रतिकारशक्ती भडकते; आत्मघातकी होते. काही दुष्ट जनुकही चाळवले जातात. त्यामुळे हृदयविकार, कॅन्सर, पोटाचे आत्मघातकी विकार, अल्झायमर्स यांची शक्यता वाढते. ध्यानामुळे त्या हानीकारक पदार्थाचं रक्तातलं प्रमाण घटतं आणि त्या दुर्धर आजारांपासून थोडं का होईना, संरक्षण लाभतं.
मेंदूच्या करडय़ा भागातल्या केंद्रांचा आणि त्यांना जोडणाऱ्या पांढऱ्या रस्त्यांचा- संपर्कपुलांचा आकार आता एमआरआय आणि ट्रॅक्टोग्राफी या आधुनिक प्रतिमातंत्रांनी मोजता येतो. त्या केंद्रांचं कामकाज एफएमआरआयने मापता येतं. ध्यानाचा मेंदूवरचा परिणाम शोधायला शास्त्रज्ञांनी तीच प्रतिमातंत्रं वापरली.हार्वर्ड विद्यापीठाच्या विद्यार्थ्यांनी ध्यान न करणाऱ्या लोकांचा अभ्यास केला. त्यांच्या मेंदूच्या एमआरआय प्रतिमांची नोंद केली. मग त्यांच्यातून अडमतडम करून निवडलेल्या अध्र्या लोकांना रोज ‘क्षणलक्ष्यी’ ध्यान करायला लावलं. त्यांच्या मेंदूवर नव्याने सुरू केलेल्या ध्यानाचा काही आठवडय़ांनी होणारा परिणाम नोंदला आणि त्याची तुलना त्यांच्याच ध्यानापूर्वीच्या अवस्थेशी आणि ध्यान न करणाऱ्या दुसऱ्या गटाच्या मेंदूशीही केली. तशाच प्रकारचा आखीव, तौलनिक अभ्यास मग इतरही जगप्रसिद्ध विद्यापीठांत झाला.
संशोधकांनी त्या सगळय़ा अभ्यासांचं आणि त्या काळात इतरत्रही झालेल्या तशाच तौलनिक संशोधनांचं एकत्रित विश्लेषण केलं. ठिकठिकाणच्या अनेक भिन्न निरीक्षणांचं एकत्रित सार काढलं गेलं.
मेंदूमधलं तारतम्यकेंद्र, सहानुभूतिकेंद्र, आठवणकेंद्र, मेंदूच्या अगदी पुढच्या भागातली निर्णयकेंद्रं वगैरे महत्त्वाच्या केंद्रांचा आकार अगदी काही आठवडे जरी नियमितपणे ध्यान केलं तरी वाढतो; त्यांच्यामधले संपर्कपूल जाडजूड होतात. मेंदूतलं परिणामकारक संगनमत वाढतं.शोधीपारधी आदिमानवावर समोरून हत्ती, मागून वाघ, वरून गरुड, खालून साप अशी चौफेर संकटं चालून येत. तेव्हा त्याला संकटांच्या शक्यतेची टोचणी सतत लावून सजग ठेवायचं काम करणारं, एक बदामाच्या आकाराचं केंद्र मेंदूच्या बुडाशी असतं. विसाव्या-एकविसाव्या शतकातला माणूस पुष्कळच सुरक्षित आहे. तरी रिकामटेकडं बदामकेंद्र उगाचच बोंबाबोंब करत राहातं. भय, चीड वगैरे उद्रेकी भावना, एखाद्या गोष्टीच्या हव्यासाने हपापणं, कुठल्याही घटनेविषयी सतत नकारात्मक विचार करणं, सूडवृत्ती हेदेखील बदामकेंद्राचंच काम. तसल्या भडिमारामुळे त्याचे निर्णयकेंद्राकडे जाणारे संपर्कपूल जाडजूड होतात. भंडावलेल्या निर्णयकेंद्रांची बाकीची महत्त्वाची कामं होत नाहीत. विचारशक्ती बोथटते.
नियमित ध्यानाचा परिणाम झाला की त्या बदामकेंद्राचा आकार घटतो. त्याचा इतर केंद्रांशी संपर्क जोडणारे संपर्कपूलही रोडावतात. भावनेच्या भरात अविचाराने होणाऱ्या कामांचं प्रमाण कमी होतं. रोजच्या घडामोडींची नकारात्मक आवर्तनं शमतात. चिंता, नैराश्य घटतात.गंमत म्हणजे, त्याच वेळी, एखाद्या मोठय़ा भावाने व्रात्य धाकटय़ाचा हात पकडावा तसा निर्णयकेंद्राकडून बदामकेंद्राकडे जाणारा संपर्कपूल मात्र जाडजूड होतो. अविचार घटतो, संयम वाढतो.दुखापतीने, संधिवाताने वेदना होतातच. आपल्या मेंदूच्या मधल्या पृष्ठभागावरचं एक केंद्र सतत वेदनासंदेश पाठवून निर्णयकेंद्राला भंडावून सोडतं. तो संपर्कपूलही ध्यान करणाऱ्या लोकांत रोडावतो. त्यामुळे वेदना सोसूनही शांत डोक्यानं विचार करायची त्यांची ताकद वाढते.ध्यानामुळे आतडय़ातलं मित्रजंतूंचं प्रमाण वाढतं; आतडय़ाचा चिडचिडेपणा घटतो. शरीरातल्या रसायनांचं संतुलन सुधारतं. त्यामुळे रक्तदाब, रक्तातली साखर घटतात. रोगप्रतिकारशक्ती वाढते. हे झालं नव्यानंच ध्यान करणाऱ्यांमध्ये.
साठी-सत्तरीच्या काही लोकांनी नियमितपणे ध्यान करून एकूण काही हजार तास ध्यानात घालवले होते. त्यांच्या मेंदूवरही नंतर संशोधन झालं. वयपरत्वे मेंदूचा आकार घटतो. पण प्रदीर्घ काळ ध्यान करणाऱ्यांच्या मेंदूचा आकार साठी-सत्तरीलासुद्धा पंचविशीतल्या मुलांच्या मेंदूएवढाच होता. मुद्दाम चिडवलं तरी ते रागावत-त्रासत नव्हते. त्यांच्या निर्णयकेंद्राचा आणि बदामकेंद्राचा आकारही सर्वसामान्यांसारखाच होता. ध्यान त्यांची सहजस्थिती होती.
इतकं फायदेशीर ध्यान करायचं कसं?
सद्गुरुवाचोनी सापडेना सोय! ध्यानाची पद्धत योग्य गुरूकडूनच शिकून घ्यावी. सध्या माइंडफुलनेस, हार्टफुलनेस, बौद्ध ध्यान पद्धती वगैरेंचे जाणकार शिक्षक त्यांच्या केंद्रांतून विनामूल्य शिकवतात.
आपल्याला मानवेल ती पद्धत विचारपूर्वक स्वीकारावी. मग धरसोड वृत्तीने ती लगेच सोडून दुसरीच्या मागे लागू नये. सुरुवातीला फायदा दिसला नाही तरी ध्यान करणं सोडू नये. ते सातत्याने दीर्घकाळ केलं तर मोठा फायदा होतो.
ध्यानाला सुरुवात करण्यापूर्वी शरीराचा प्रत्येक भाग जाणीवपूर्वक सैलावून घ्यावा. म्हणजे कुठल्याही ताणाचा एकाग्रतेवर परिणाम होणार नाही. ध्यान बसून करावं; आडवं पडून केलं तर झोप लागू शकते.
आगगाडीतून जाताना, खिडकीतून दिसणाऱ्या धावत्या खांबांत नजर गुंतू न देता क्षितिजावर खिळवली की डोळे स्थिर राहतात. तसंच, ध्यान करताना, येत्याजात्या विचारांमागे न जाता, उद्दिष्टावर मन स्थिर ठेवावं. त्यातच कधी तरी आतल्या ऊर्जेशी लय जमते.
ध्यानानंतरची मन:स्थिती लिमलेटच्या गोळीसारखी मनाने चघळावी; नोंदावी. मग पुढच्या वेळची प्रगती तिथून पुढे सुरू होते.
ध्यानामुळे आध्यात्मिक फायदे होतातच. शिवाय भौतिक फायदे तर कुठल्याही धर्माच्या किंवा निधर्मी लोकांनाही मिळतात. ते सर्वानी घ्यावे. त्यायोगे चिंता-नैराश्य- अविवेक- क्रोध यांच्यापासून मुक्ती मिळेल. तशा अलांच्छन-तापहीन सज्जनांची जगात मांदियाळी होईल. मग मानव्यधर्माचं पसायदान आपसूकच लाभेल.