एल.के.कुलकर्णी
‘इंग्लंडमध्ये लंडनच्या पश्चिमेस ९० मैलांवर ‘स्टोनहेंज’ हे ठिकाण आहे. ही प्रचंड शिळांची वर्तुळाकार मांडणी असून तिची सांगड सूर्याच्या विशिष्ट खगोलीय स्थानांशी घातलेली आहे. ही इ.स.पूर्व ३१०० ते १६०० या काळातील म्हणजे उत्तर अश्मयुगीन वेधशाळा असावी, असे मानले जाते. याचा अर्थ मानव किमान पाच हजार वर्षांपासून चंद्र- सूर्याचे वेध घेत आलेला आहे. अशा प्रकारच्या प्राचीन वेधशाळांचे अवशेष मेक्सिको, चीन, उझबेकिस्तान, कोरिया, जर्मनी, इ. अनेक देशांत आढळले आहेत.
इजिप्तमध्ये कफ्र अल शेख येथील इ. स.पूर्व सहाव्या शतकातील स्वतंत्र वेधशाळा ही १० हजार चौरस फुटांत पसरलेली होती. इ. स. पूर्व तिसऱ्या शतकातील अलेक्झांड्रियाचे ग्रंथालय हे एक जागतिक ज्ञानकेंद्र असून तेथील वेधशाळा प्रसिद्ध होती. जगाचा पहिला अॅटलास तयार करणारे टॉलेमी, पहिला ग्लोब तयार करणारे स्ट्राबो, इ. संशोधक या ग्रंथालयाशी संबंधित होते. दोन हजार वर्षांपूर्वी पृथ्वीचा परीघ मोजणारे ते एरटोस्थेनिस हे याच ग्रंथालयाचे प्रमुख होते.
भारतात गुप्त काळात व नंतर आर्यभट, वराहमिहीर, ब्रह्मगुप्त, इ.नी महत्त्वपूर्ण शोध लावून अमूल्य ग्रंथसंपदा निर्माण केली. यापैकी बरेच संशोधन नालंदा विद्यापीठातील वेधशाळेतून करण्यात आले असावे, असे मानले जाते. इराकमध्ये आठव्या शतकात बगदाद येथील ग्रंथालय हेही नालंदा किंवा अलेक्झांड्रियाप्रमाणे एक मोठे ज्ञानकेंद्र होते. इ.स. ८२८ मध्ये अल मामुन या खलिफाच्या आज्ञेनुसार या परिसरात एक वेधशाळा उभारण्यात आली. पुढील दोन शतके तेथे भाषांतराची मोठी मोहीम राबविण्यात आली. त्यात अॅरिस्टॉटल, प्लेटो, युक्लिड या ग्रीक व भारतातील सुश्रुत, चरक, आर्यभट्ट, ब्रह्मगुप्त यांच्या ग्रंथांची भाषांतरे करण्यात आली.
पंधराव्या शतकाच्या पूर्वार्धात पोर्तुगालचा राजपुत्र ‘हेन्री द नेव्हिगेटर’ याने नौकानयनाला प्रोत्साहन देण्यासाठी मोठे प्रयत्न केले, नकाशे मिळवणे व बनवणे, भूगोलाचे ज्ञान वाढवणे, नौकानयनशास्त्र विकसित करणे यासोबत सॅग्रेस येथे त्याने वेधशाळाही उभारली.
१४५३ मध्ये बायझेंटाइन साम्राज्याची राजधानी असलेले कॉन्स्टंटिनोपल या मोक्याच्या जागी असणाऱ्या शहरावर तुर्कांनी विजय मिळवला व त्याची नाकेबंदी केली. त्यामुळे आता भारत व आशियाकडे जाणारा पर्यायी सागरी मार्ग शोधणे युरोपीयांना भाग पडले. त्यातून युरोपात नौकानयन, भौगोलिक माहिती, नकाशे व वेधशाळा यांचे महत्त्व वाढू लागले. इटलीत गॅलेलियो गॅलिली यांनी पदुआ विद्यापीठात काम करताना सतराव्या शतकाच्या सुरुवातीस दुर्बिणीच्या साहाय्याने गुरूचे चंद्र, चंद्रावरील विवरे, आकाशगंगेतील तारे, शुक्राच्या कला असे अनेक शोध लावून खगोलशास्त्रात क्रांतीच केली. यानंतर दुर्बिणी व इतर उपकरणांचा विकास होऊन त्याच्या मदतीने वेधशाळा सुसज्ज होऊ लागल्या.
या सर्व पार्श्वभूमीवर इंग्लंडने एक स्वतंत्र वेधशाळा उभारावी असा आग्रह गणितज्ञ व सर्व्हेयर जोनास मूर यांनी राजे चार्ल्स दुसरे यांच्याकडे धरला. लंडनजवळ ग्रीनीच येथील टेकडीवर राजाचा एक महाल होता. १० ऑगस्ट १६७५ मध्ये दुसरे चार्ल्स यांच्या हस्ते त्या टेकडीवर वेधशाळेची पायाभरणी झाली व वर्षाच्या आत तिचे कार्य सुरूही झाले. तीच ‘रॉयल ग्रीनीच ऑब्झर्व्हेटरी’ किंवा ‘ग्रीनीचची वेधशाळा’ होय. ही वेधशाळा पुढे जागतिक भूगोलात अतिशय महत्त्वाची ठरली.
पुढे नौकानयनाचे नकाशे, कालमापन इत्यादींसाठी पृथ्वीवरील एक रेखावृत्त हे मूळ रेखावृत्त म्हणून निश्चित करणे आवश्यक ठरू लागले. त्यासाठी १८८४ मध्ये वॉशिंग्टन येथे एक ‘आंतरराष्ट्रीय मध्यमंडल परिषद’ (इंटरनॅशनल मेरिडियन कॉन्फरन्स) घेण्यात आली. ग्रीनीचवरून जाणारे रेखावृत्त हे शून्य अंश मानून त्या अनुषंगाने इतर रेखावृत्ते निश्चित करण्याचे या परिषदेत ठरले. तेव्हापासून ग्रीनीच येथील वेळ ही ‘ग्रीनीच प्रमाणवेळ’ किंवा ‘जागतिक प्रमाण वेळ’ मानली जाते. तिच्या आधारे मग सर्व देशांनी आपल्या प्रमाण वेळा ठरवल्या. तीच आता जीएसटी (ग्रीनीच स्टँडर्ड टाइम) किंवा असा वैश्विक प्रमाण वेळ (यूटीसी- कोऑर्डिनेटेड युनिव्हर्सल टाइम) म्हणून ओळखली जाते.
लंडन शहराच्या प्रकाशामुळे होणारे प्रकाश प्रदूषण टाळण्यासाठी १९५३ मध्ये प्रत्यक्ष वेधशाळा मूळ ठिकाणच्या पूर्वेस ९७ कि. मी. अंतरावर हर्ट मोंसेक्स येथे स्थलांतरित करण्यात आली. पण वेधशाळेच्या मूळ इमारतीत आता एक संग्रहालय उभारण्यात आलेले आहे. शून्य अंश रेखावृत्त दर्शवणारी एक पट्टी आजही त्या इमारतीच्या प्रांगणात आहे.
अनेकांचा असा समज आहे, की इंग्लंडचे राज्य जगभर पसरलेले असल्यामुळे मूळ रेखावृत्त म्हणून ग्रीनीचला मान्यता मिळाली. वस्तुस्थिती मात्र वेगळी आहे. १८८४ मध्ये त्यासाठी वॉशिंग्टन येथे जी आंतरराष्ट्रीय परिषद बोलावण्यात आली होती, तिचे निमंत्रक अमेरिकेचे तत्कालीन अध्यक्ष चेस्टर ए. आर्थर हे होते. आणि तिच्या आयोजनात सर सँडफोर्ड फ्लेमिंग या कॅनेडियन इंजिनीअरची भूमिका महत्त्वाची होती. या परिषदेत युरोप, अमेरिका व आशिया खंडातील जे २५ देश उपस्थित होते, त्यात फ्रान्स जर्मनी, इटली, रशिया, जपान, मेक्सिको, नेदरलँड्स, स्पेन, ऑटोमन तुर्क साम्राज्य, ब्राझील, स्वित्झर्लंड, इ. देशही होते. हे देश इंग्लंडचे गुलाम तर नव्हतेच पण यापैकी काही देश इंग्लंडचे स्पर्धक आणि काही तर विरोधक होते. तरीही ग्रीनीचची निवड होण्यात महत्त्वाचा घटक ठरला, तो तेथील वेधशाळेचे शतकभरातील कार्य व अचूकता. ४७५ वर्षांपूर्वी स्थापनेच्या वेळी वेधशाळेत उभारण्यात आलेली दोन घड्याळे ही त्या काळात सर्वात अचूक असून त्यांच्या १३ फुटी लंबकाचा आंदोलन काळ चार सेकंद होता. पुढे १८५२ मध्ये शेफर्ड गेट क्लॉक हे घड्याळ तिथे स्थापन करण्यात आले. त्यात १२ ऐवजी २४ आकडे दर्शवलेले आहेत. हे अतिशय अचूक घड्याळ असून आता ते अणुघड्याळांशी जुळवलेले आहे. नंतरही तेथील घड्याळे, दुर्बिणी व यंत्रे अद्यायावत व निर्दोष ठेवून त्या आधारे काटेकोर, अचूक निरीक्षणे व नोंदी केल्या जात. अर्थातच ग्रीनीच वेधशाळेच्या नोंदी व त्यावर आधारित नकाशे अचूक असल्याने जगभर नौकानयनात वापरले जात होते. अमेरिकेने तर त्यापूर्वीच ग्रीनीच हे आपल्यासाठी प्रमाण रेखावृत्त म्हणून स्वीकारले होते. दुसरे, त्या वेळी जगातले ७२ टक्के सागरी दळणवळण इंग्लंडने तयार केलेल्या नकाशांच्या आधारे चाले. अर्थात यामुळे ग्रीनीचवरून जाणारे काल्पनिक रेखावृत्त हे शून्य अंश मानण्याचा ठराव २२ विरुद्ध एक अशा बहुमताने मान्य होऊ शकला.
पुढे काळाने कुस बदलली. ज्याच्यावर सूर्य मावळत नसे ते ब्रिटिश साम्राज्य लयाला गेले. अनेक देश स्वतंत्र झाले. पण तरीही आज जगाच्या नकाशात ग्रीनीच रेखावृत्तच प्रमाण मानलेले असते. ग्रीनीचचे घड्याळ जणू जगाचे हृदय बनले आहे व जगभरातली घड्याळे आजही त्या घड्याळानुसार मागेपुढे होतात. त्यासाठी ना सैन्य वापरले गेले, ना रक्त सांडले, ना लढाया, ना लष्करी वा व्यापारी डावपेच. त्याला कारणीभूत ठरला फक्त अचूक भौगोलिक अभ्यास, नोंदी व नकाशे. असे असते भौगोलिक ज्ञानाचे सामर्थ्य.