भारत-पाकिस्तान फाळणी झाली तेव्हा उसळलेल्या हिंसाचारात हजारोंनी जीव गमावले. पाकिस्तानातून काही लाख हिंदू आणि शीख भारतात आले. भारतातून मोठ्या संख्येत मुस्लीम पाकिस्तानात गेले. हिंसा, भीती व द्वेषाचं वातावरण निर्माण झालं होतं. जम्मू-काश्मीरचे महाराजा हरी सिंग भारतात सामील होण्याचा निर्णय घेत नव्हते. त्यांना जम्मू-काश्मीर हे स्वतंत्र राष्ट्र हवं होतं. पाकिस्तानच्या कबाईलींनी आणि लष्कराच्या अधिकाऱ्यांनी २२ ऑक्टोबर १९४७ रोजी काश्मीरवर हल्ला (‘ऑपरेशन गुलमर्ग’) केला, त्यानंतर हरी सिंग यांनी भारतात विलीन होण्याच्या करारावर स्वाक्षऱ्या केल्या. पुढे १९४८मध्ये पाकिस्तानने केलेल्या हल्ल्यात काश्मीरची भारताच्या ताब्यातील भूमी राखण्यासाठी ब्रिगेडियर मोहम्मद उस्मान यांनी निकराचा लढा दिला आणि त्यात ते शहीद झाले. त्यांना ‘नौशेरा का शेर’ ही उपाधी बहाल करण्यात आली. त्यांच्या रणनीतीमुळे सामरिक दृष्टीने अतिशय महत्त्वाच्या असलेल्या नौशेरा आणि जांगडवर भारताने कब्जा मिळवला. या हल्ल्याचे आणि ब्रिगेडियर उस्मान यांच्या कामगिरीचे वर्णन ‘द लायन ऑफ नौशेरा: द लाइफ अँड टाइम्स ऑफ ब्रिगेडियर मोहम्मद उस्मान’ या पुस्तकात करण्यात आले आहे. झिया उस सलाम आणि आनंद मिश्रा या ज्येष्ठ पत्रकारांनी हे पुस्तक लिहिले आहे.
ब्रिगेडियर उस्मान यांच्या अंत्यविधीला भारताचे पहिले राष्ट्रपती डॉ. राजेंद्र प्रसाद, पंतप्रधान जवाहरलाल नेहरू, गव्हर्नर-जनरल सी. राजगोपालाचारी यांच्यासह संपूर्ण मंत्रिमंडळ आणि तिन्ही संरक्षण दलांचे प्रमुख उपस्थित होते. स्वतंत्र भारतात कदाचित हा एकमेव प्रसंग असेल जिथे संपूर्ण भारताच्या नेतृत्वाने उपस्थित राहून लष्कराच्या अधिकाऱ्याला श्रद्धांजली वाहिली. भारत सरकारने त्यांना मरणोत्तर महावीर चक्र जाहीर केले. लष्करातील अन्य मुस्लीम अधिकाऱ्यांप्रमाणे उस्मान यांनाही भारत सोडून पाकिस्तानी लष्करात जाण्याचा पर्याय देण्यात आला होता. पण उस्मान यांनी त्यास नकार दिला. ब्रिगेडियर हबिबुल्लाह यांनीही भारतात राहण्याचा निर्णय घेतला. भारताचे पहिले मुख्य माहिती आयुक्त वजाहत हबिबुल्लाह यांचे ते वडील.
मोहम्मद उस्मान अविवाहित होते. ब्रिगेडियर गुफरान आणि मोहम्मद शुभन त्यांचे भाऊ. शुभन प्रसिद्ध पत्रकार होते. जवाहरलाल नेहरूंशी त्यांचे जवळचे संबंध होते. १९८२ मध्ये त्यांचा मृत्यू झाला तेव्हा पंतप्रधान इंदिरा गांधींनी त्यांच्या घरी जाऊन श्रद्धांजली वाहिली. राजेंद्र प्रसाद यांच्या कार्यालयात गुफरान यांनी उपलष्करी सचिवपदाची जबाबदारी सांभाळली. उस्मान यांचा जन्म १५ जुलै १९१२ला उत्तर प्रदेशच्या आझमगड विभागातील मऊ जिल्ह्यातील बिबिपूर या गावात झाला. त्यांचे वडील मोहम्मद फारूख बनारस येथे वरिष्ठ पोलीस अधिकारी होते. उस्मान इंग्लिश, हिंदी, उर्दू आणि पश्तु भाषा अस्खलित बोलत. उस्मान यांना ‘नौशेरा का शेर’ का म्हणतात हे जाणून घेण्यासाठी आणि तेव्हाची एकूण परिस्थिती समजून घेण्यासाठी हे पुस्तक उपयुक्त ठरते. २५ डिसेंबर १९४७ला पाकिस्तानने जांगड या अतिशय महत्त्वाच्या गावावर ताबा मिळवला. प्रचंड थंडीचे ते दिवस होते. ‘जोपर्यंत आपण जांगड परत मिळवणार नाही तोपर्यंत मी गादीवर झोपणार नाही’ असा संकल्प ब्रिगेडियर उस्मान यांनी केला होता. तीन महिन्यांनंतर उस्मान यांच्या नेतृत्वात भारताने जांगड परत मिळवले. काश्मीर खोऱ्याकडे जाण्यासाठी रजोरी जिल्ह्यातील जांगड आणि नौशेरा महत्त्वाचे होते. १९४८च्या ६ फेब्रुवारीला नौशेरावर मोठा हल्ला करण्यात आला होता. भारतीय लष्कराने या महत्त्वाच्या लढाईत पाकिस्तानी लष्कराला मागे सारले. त्यात जवळपास दोन हजार पाकिस्तानी मारले गेले आणि नौशेरा भारताचा अविभाज्य भाग झाला.
पाकिस्तानकडून नौशेरावर मोठा हल्ला होण्याचा अंदाज उस्मान यांना होता. त्यासाठी ते आपल्या सहकाऱ्यांना तयार करत होते. रोज सायंकाळी ते जवानांशी चर्चा करत. नौशेराचं महत्त्व सर्वांना समजून सांगत. कुठल्याही परिस्थितीत नौशेरा सोडणार नाही, असा निर्धार त्यांनी केला होता. जनरल के. एम. करिअप्पा जानेवारीअखेरीस नौशेरा आले होते. त्यांनी ब्रिगेडियर उस्मान यांना नौशेराच्या रक्षणासाठी ईशान्येकडील पर्वताच्या रांगेतील सर्वांत उंचावरील कोट परिसरचा ताबा मिळवण्यास सांगितलं होतं. त्याप्रमाणे त्यांनी १ फेब्रुवारीला हल्ला करून कोटवर विजय मिळवला. त्याला ‘ऑपरेशन कीपर’ नाव देण्यात आलं, कारण करिअप्पा यांना कीपर म्हटलं जात असे.
पाकिस्तानने २४ डिसेंबर १९४७ ला जांगडवर मोठा हल्ला केला होता. त्यात भारताचे काही जवान शहीद झाले. दुसऱ्या दिवशी जांगड शहरावर पाकिस्तानने ताबा मिळवला, त्यासाठी ‘ऑपरेशन विजय’ची आखणी करण्यात आली होती. १४ मार्च १९८४ला ‘ऑपरेशन विजय’ सुरू झाले. उस्मान यांनी त्यांच्या ५० पॅराशूट ब्रिगेडच्या जवानांना ‘जांगड ताब्यात घेण्याची वेळ आली असून हे काम सोपं नसलं, तरी आपण आपलं श्रेष्ठत्व सिद्ध करूच. भारताची आपल्याकडून हीच अपेक्षा आहे, ‘जय हिंद,’ असा संदेश दिला. १८ मार्चला जांगड शहरावर भारताने परत ताबा मिळवला. भारतीय जवान उत्साहात होते. नौशेरा आणि जांगड येथे विजय मिळाला होता. पुढच्या तीन महिन्यांत पाकिस्तानने बऱ्याचदा जांगडवर हल्ले केले. ३ जुलैला ब्रिगेडियर उस्मान यांनी सायंकाळी जवानांशी चर्चा केली. त्यानंतर साधारण ५.४५ वाजता अचानक दुसऱ्या बाजूने गोळीबार आणि तोफगोळ्यांचा वर्षाव सुरू झाला. उस्मान यांनी मेजर भगवान सिंग यांना जशास तसे उत्तर देण्याचा आदेश दिला. थोड्याच वेळात दुसरी बाजू शांत झाली. ब्रिगेडियर उस्मान, भगवान सिंग आणि कॅप्टन एस. सी. सिन्हा ब्रिगेड कमांड पॉइंटच्या दिशेने चालू लागले आणि पाकिस्तानकडून पुन्हा हल्ला सुरू झाला. ब्रिगेडियर जिथे सूचना देत उभे होते, त्या कमांड पोस्टच्या जवळ असलेल्या एका मोठ्या दगडावर एक तोफगोळा आदळला. त्यात त्यांचा मृत्यू झाला. शेवटच्या क्षणी ब्रिगेडियर म्हणाले, ‘हा परिसर कुठल्याही परिस्थितीत शत्रूंकडे जाता कामा नये.’ अन्य पाच जवानही या हल्ल्यात शहीद झाले. पुढे तिथेच त्यांचे स्मारक उभारण्यात आले.
युद्ध आणि माध्यमे
त्या काळात माध्यमे मर्यादित होती. त्यांच्या हाती साधनंदेखील कमी होती. काश्मिरात जे काही घडत होतं ते तात्काळ वाचकांपर्यंत पोहोचवणं सोपं नव्हतं. ६ जुलैला ‘द हिंदू’ या दैनिकाने ‘ब्रिगेडियर उस्मान’ हा अग्रलेख लिहिला. ‘जवानांना आणि स्थानिक रहिवाशांना प्रोत्साहित करून अतिशय प्रतिकूल परिस्थितीत नौशेरा वाचविणारे उस्मान शत्रूंच्या तोफगोळ्याच्या हल्ल्यात शहीद झाले,’ असं त्यात म्हटलं होतं. पंजाब आणि काश्मिरात मोठ्या प्रमाणात वाचल्या जाणाऱ्या ‘द ट्रिब्युन’ने ८ जुलैच्या अंबाला आवृत्तीत उस्मान यांच्या अंत्यविधीची दोन छायाचित्रं प्रसिद्ध केली. पहिलं छायाचित्र साऊथ ब्लॉक येथे जवाहरलाल नेहरू, सरदार बलदेव सिंग, जगजीवन राम आणि नरहर विष्णू गाडगीळ श्रद्धांजली वाहत असल्याचं होतं, तर दुसरं छायाचित्र उस्मान यांचं पार्थिव जीपमधून जामिया मिलिया इथल्या कब्रस्तानात नेतानाचं होतं. सर्वच माध्यमांनी ब्रिगेडियर उस्मान शहीद झाल्याचं सविस्तर वार्तांकन केलं.
लेखक म्हणतात स्वातंत्र्य आंदोलनाच्या काळात हिंदी, उर्दू, बंगाली आणि मराठी वर्तमानपत्रं ब्रिटिशांच्या विरोधात निर्भीड वार्तांकन करत. अनेक संपादकांनी तुरुंगवास भोगला. अनेक वर्तमानपत्रं बंद झाली. प्रादेशिक भाषांतील दैनिकांनी वातावरणनिर्मिती केली आणि इंग्रजी वर्तमानपत्रांनी त्यांचं नंतर अनुकरण केलं. काश्मीर युद्धाच्या बातम्या इंग्रजी वर्तमानपत्रांत आतल्या पानावर येत आणि क्वचित एक कॉलमपेक्षा मोठी बातमी असे. त्याला अपवाद होता उस्मान यांच्या हौतात्म्यचा. बहुतेक इंग्रजी वर्तमानपत्रांनी पहिल्या पानावर ती बातमी दिली.
२०२० च्या डिसेंबरमध्ये दिल्लीतील जामिया मिलिया येथील ब्रिगेडियर उस्मान यांच्या कबरीचं काही समाजकंटकांनी नुकसान केलं. त्यांचं ‘उस्मान’ हे नाव या द्वेषामागचं कारण होतं. ज्यांनी नुकसान केलं त्यांना उस्मान कोण होते, हे कदाचित माहीतही नसेल. पाकिस्तानने केलेल्या हल्ल्यात भारताची भूमी वाचविण्यासाठी एका मुस्लीम लढवय्याने आपले प्राण पणास लावले, यावर कदाचित त्यांचा विश्वास नसेल. त्यांना हेदेखील माहीत नसेल की या उस्मान यांच्यावर पाकिस्तानने तेव्हा ५० हजार रुपयांचे इनाम जाहीर केलं होतं. लष्कराने तात्काळ पावलं उचलली आणि व्यवस्थित दुरुस्ती केली.
दरवर्षी तीन जुलैला ब्रिगेडियर उस्मान यांची आठवण म्हणून लष्कराकडून विविध कार्यक्रम आयोजित केले जातात. आज द्वेष वाढत आहे. धार्मिक ध्रुवीकरण करून त्याचं राजकीय भांडवल करण्याचा प्रयत्न केला जात आहे. २०२१ च्या ४ जुलैला राजोरी भागात गेलेल्या पंतप्रधान नरेंद्र मोदींनी त्यांच्या भाषणात देशाच्या संरक्षणासाठी लष्कराचे आभार मानले होते. त्या भाषणात ब्रिगेडियर उस्मान यांचा त्यांनी विशेष उल्लेख केला होता.
ब्रिगेडियर आणि बॉलीवूड
बॉलीवूडमध्ये अनेक चरित्रपटांची निर्मिती करण्यात आली आहे, पण उस्मान यांच्या प्रेरणादायी आयुष्यावर एकही चित्रपट नाही. या विषयावर चित्रपटनिर्मितीच्या दृष्टीने प्रयत्न झाले पण अद्याप एकही चित्रपट प्रत्यक्षात येऊ शकला नाही. १९८० च्या दशकाच्या अखेरीस दिग्दर्शक रजत चंडोक यांनी ‘उस्मान’ नावाचा चित्रपट काढण्याची घोषणा केली होती. विनोद खन्ना आणि श्रीदेवी त्यात अभिनय करणार होते. आपल्याला त्यात फार मोठी भूमिका असणार नाही, हे लक्षात आल्याने श्रीदेवीने काम करण्यास नकार दिला. उटी येथे विनोद खन्नाचे शूटिंग सुरू झाले होते, मात्र चित्रपटात चार-पाच प्रेमगीतं आणि अभिनेत्री असायलाच हवी, याविषयी डिस्ट्रिब्युटर आग्रही होता. त्याच सुमारास काश्मीरमध्ये पुन्हा दहशतवादाने डोकं वर काढलं. आशा परिस्थितीत मुस्लीम लष्करी अधिकाऱ्याच्या जीवनावरचा आणि काश्मीरविषयीचा चित्रपट फारसा चालणार नाही, असं वाटल्यामुळे काम थांबवण्यात आलं. ३० वर्षांनंतर २०२० मध्ये दिग्दर्शक संजय खान यांनी उस्मान यांच्या जीवनावर चित्रपट बनवण्याची घोषणा केली. त्यांचा मुलगा झायेद खान त्यात अभिनय करणार होता. हा चित्रपटही बारगळला. गतवर्षाच्या सुरुवातीला दिग्दर्शक विकास बहल यांनीही याच विषयावर चित्रपटनिर्मितीची घोषणा केली. ‘बॅटल ऑफ नौशेरा’ हे नावही ठरलं. संरक्षणमंत्री राजनाथ सिंगचं समर्थन मिळालं. ‘ब्रिगेडियर मोहम्मद उस्मान यांचा पराक्रम, त्यांचं राष्ट्रप्रेम आणि मातृभूमीसाठी त्यांनी केलेला त्याग सर्वांसाठी प्रेरणादायी आहे,’ असं राजनाथ सिंग यांनी म्हटलं होतं. या चित्रपटाचं काम कुठवर पोहोचलं आहे, याची कल्पना नाही. रंजन कुमार सिंग आणि उपिन्दर सूद यांनी १९९७ ला उस्मान यांच्या ८५ व्या वाढदिवसानिमित्त ‘नौशेरा का शेर’ नावाचा ५० मिनिटांचा माहितीपट तयार केला होता, तेवढीच त्यांच्या कामाची नोंद.
काश्मीरच्या भूमीचा एक इंचही पाकिस्तानच्या ताब्यात जाऊ नये म्हणून प्राणांची आहुती देणाऱ्या या वीराच्या योगदानाची आजच्या काळातील माध्यमांनी फारशी दखल घेतलेली नाही. ‘द लायन ऑफ नौशेरा: द लाइफ अँड टाइम्स ऑफ ब्रिगेडियर मोहम्मद उस्मान’ हे पुस्तक महत्त्वाचं ठरतं, ते त्यामुळेच.
द लायन ऑफ नौशेरा : द लाइफ अँड टाइम्स ऑफ ब्रिगेडियर मोहम्मद उस्मान
लेखक: झिया उल सलाम आणि आनंद मिश्रा
प्रकाशक: ब्लुम्सबुरी
मूल्य: ३९९ रुपये, पृष्ठे: १४८
लेखक ज्येष्ठ पत्रकार व शांततावादी कार्यकर्ते
jatindesai123@gmail.com