k Scientia potentia estl – Roger Bacon

अज्ञानात परमसुख असतं. ज्ञानाचं वर्जित फळ चाखल्यानं मनुष्य दु:खी होतो- हा मध्ययुगीन दृष्टिकोन समाजमनावर बिंबवण्यात धर्मसत्तेला मोठ्या प्रमाणात यश आलं होतं. या दृष्टिकोनाला छेद देणाऱ्या प्राचीन ज्ञानपरंपरा एकतर विस्मृतीत लोटल्या गेल्या होत्या किंवा त्यांचा विपर्यास करण्यात आला होता. त्यामुळे मध्ययुगीन माणसाला ‘मेंढपाळांच्या’ नियंत्रणाखाली मेंढरांसारखं दृष्टिहीन जीवन जगावं लागे. या परावलंबी अवस्थेचा उल्लेख १८ व्या शतकातला जर्मन विचारवंत इमॅन्युएल कान्ट ‘समाजमनाची बाल्यावस्था’ असा करतो. मात्र १२ व्या शतकापासून नवीन ज्ञानाभिमुख दृष्टिकोनाचा उदय होऊन रनेसॉन्सचे वारे वाहू लागले होते. इटलीत १५ व्या शतकात रनेसॉन्सची शक्तिशाली लाट निर्माण होऊन मध्ययुगीन ज्ञानविषयक दृष्टिकोनाचं विचारप्रणालीत्मक (ideological) चरित्र उघडं पडलं

‘Nanos gigantum umeris insidentes’ या १२ व्या शतकातल्या विचारवंत बेर्नार द शार्त्रच्या सुभाषितात रनेसॉन्सचा ज्ञानाभिमुख दृष्टिकोन दिसून येतो. या फ्रेंच सुभाषिताचा मथितार्थ असा की जन्माला येणारी माणसं कितीही लहान वा क्षुल्लक असली तरी भूतकालीन दिग्गजांच्या खांद्यावर उभं राहून त्यांना दूरवर पाहण्याची दृष्टी प्राप्त होते. पण त्यासाठी ज्ञानपरंपरा शाबूत असणं गरजेचं! माणसं आपोआप परंपरेच्या खांद्यावर उभी राहात नसतात. त्यासाठी मनुष्य आणि ज्ञानपरंपरा यांत भौतिक ढाचा आणि पूरक सामाजिक अवकाश हवाच. त्यात भूतकालीन दिग्गजांच्या खांद्यापर्यंत पोहोचण्याची संधी सगळ्यांना मिळते की बहुतेकांना परंपरेच्या चरणात बसवून भक्ती करायला भाग पाडलं जातं, हा राजकीय प्रश्नही महत्त्वाचा ठरतो.

रनेसॉन्सच्या अर्थात पुनरुत्थानाच्या प्रक्रियेमुळे १५ व्या शतकापासून ज्ञानविषयक दृष्टिकोनात मूलगामी बदल होऊन ज्ञान म्हणजे वर्जित फळ नसून, इंग्लिश विचारवंत सर रॉजर बेकनच्या (१२२०- १२९२) भाषेत सांगायचं तर ‘ Scientia potentia est’ अर्थात ज्ञानच खरी सत्ता आहे, ही आधुनिक धारणा मूळ धरू लागली. खंडित ज्ञानपरंपरेत सलगता आणि समग्रता आणून मध्ययुगात नष्ट करण्यात आलेल्या ज्ञानात्मक भौतिक ढाच्याची पुनर्निर्मिती करण्यात येऊ लागली. भूतकाळातल्या दिग्गजांच्या खांद्यापर्यंत सगळे पोहोचू शकावेत यासाठी ज्ञानाच्या लोकशाहीकरणाचं अभियान सुरू झालं. रनेसॉन्सच्या या ऐतिहासिक प्रक्रियांचं ठळक उदाहरण म्हणजे १६ व्या शतकातला फ्रेंच रनेसॉन्स! प्राचीन वारशात नवता शोधणारी रनेसॉन्सची चळवळ युरोपभर एकसारखी आणि एकाच वेळी घडली नाही. रनेसॉन्सचा उगम अनेकविध कारणांमुळे १५ व्या शतकात (क्वॉत्रोचेन्तो) इटलीत झाला. त्यानंतर तब्बल शंभर वर्षांनी रनेसॉन्सची लाट आल्प्स पर्वत ओलांडून १६ व्या शतकाच्या सुरुवातीला फ्रेंच आणि जर्मन भाषक प्रदेशात पोहोचली. फ्रान्समध्ये रनेसॉन्सचं आगमन कशा प्रकारे झालं, याविषयी प्रस्तुत लेखांकात जाणून घेऊ.

जगभरातील पर्यटकांना आकर्षित करणारं मोनालिसा हे तैलचित्र फ्रान्समध्ये रनेसॉन्सच्या आगमनाचं साक्षीदार आहे. बहुआयामी इटालियन व्यक्तिमत्त्व लिओनार्दो द व्हिन्चीने साकारलेली मोनालिसा पॅरिसच्या लूव्र म्युझियममध्ये कशी आली, ही कहाणी फ्रेंच रनेसॉन्सविषयी बरंच काही सांगून जाते. खरंतर, लूव्र म्युझियमची वास्तूसुद्धा फ्रेंच रनेसॉन्सचं द्याोतक आहे.

इटालियन भाषक शहर-राज्यं १५ व्या शतकात आर्थिक, सांस्कृतिक, कलात्मक बाबतीत शंभर वर्षे पुढे असली तरी शतखंडित असल्यानं राजकीयदृष्ट्या दुर्बल आणि परावलंबी होती. त्यामुळे फ्रान्स, स्पेन आणि ओटोमन साम्राज्यासारख्या बलाढ्य राजकीय शक्तींसाठी ते सोपं भक्ष्य ठरत. फ्रान्सनं १५ व्या शतकापासून नेपल्स आणि मिलानवर दावा ठोकून इटलीत लष्करी मोहिमा राबवायला सुरुवात केली होती. १५१५ मध्ये गादीवर आलेल्या फ्रॅान्स्वॉ पहिला या कर्तबगार फ्रेंच राजानं समृद्ध इटलीवर वर्चस्व मिळवलं. इटालियन शहरांच्या सौंदर्यानं त्याचे डोळे दिपून गेले. फ्रान्स एक महत्त्वाची राजकीय शक्ती असली तरी फ्रान्सच्या मागासलेपणाची फ्रेंच राज्यकर्त्यांना प्रखर जाणीव होती.

पॅरिसला परतल्यावर फ्रॉन्स्वॉने फ्रान्सला मध्ययुगातून बाहेर काढून जागतिक नकाशाच्या केंद्रस्थानी आणण्याचं भव्य स्वप्न पाहिलं. फ्लॉरेन्सची जागा पॅरिसनं घ्यावी यासाठी युद्धपातळीवर पॅरिसचा कायापालट करायला सुरुवात केली. त्यासाठी इटालियन कलाकारांना पॅरिसला आणवलं. १५१६ मध्ये फ्रॉन्स्वॉची भेट लिओनार्दो दा व्हिन्चीशी झाली. फ्रॉन्स्वॉला लिओनार्दो दा व्हिन्ची हा जगातला सगळ्यात बुद्धिमान व्यक्ती वाटे. तरुण फ्रॉन्स्वॉ साठीतल्या दा व्हिन्चीला पित्यासमान मानायचा. फ्रॉन्स्वॉचं निमंत्रण स्वीकारून लिओनार्दो व्हिन्ची पॅरिसला आला. येताना मोनालिसाचं अपूर्ण पेंटिंग घेऊन आला. या अपूर्ण पेंटिंगवर तो मरेपर्यंत काम करत होता. पॅरिसमध्ये वास्तव्य करत असतानाच लिओनार्दो दा व्हिन्ची १५१९ मध्ये मरण पावला. थोडक्यात, फ्रेंच रनेसॉन्सची सुरुवात प्रामुख्यानं इटलीवरच्या लष्करी मोहिमांमुळे झाली आहे. त्यामुळे फ्रेंच रनेसॉन्सच्या चळवळीवर प्राचीन परंपरेसोबतच इटालियन रनेसॉन्सचीही छाप दिसून येते.

‘प्रिन्स ऑफ रनेसॉन्स’

फ्रॉन्स्वॉ पहिला याच्या ३२ वर्षांच्या दीर्घ कारकीर्दीत (१५१५-१५४७) फ्रान्सनं आधुनिकतेत पदार्पण केलं असं म्हटलं जातं. तो स्वत: एक उत्कृष्ट साहित्यिक होता. जेवण करताना, जंगलात शिकार करतानाही त्याला वैचारिक मेजवानी लागत असे. ‘आधुनिक’ माणसाच्या सर्वांगीण विकासासाठी कला, संस्कृती, तत्त्वज्ञान अशा गोष्टी निर्णायक असतात ही बाब त्याला पटली होती. त्यामुळे तत्कालीन धर्मसत्तेच्या विरोधात जाऊन त्यानं रनेसॉन्सच्या विचारांना समर्थन दिलं. रनेसॉन्सच्या मानवतावादी विचारवंत, लेखक, कवी, कलावंतांना त्याने केवळ प्रोत्साहन दिलं नाही तर त्यांच्यासाठी आवश्यक पायाभूत सुविधा निर्माण करून दिल्या. उदा. पॅरिसमधील सोर्बोन विद्यापीठ धर्मशास्त्राच्या अध्ययनासाठी प्रसिद्ध होतं. मात्र तिथं प्राचीन पेगन ज्ञानाचा अभ्यास करू इच्छिणाऱ्यांसाठी पूरक वातावरण नव्हतं. फ्रॉन्स्वॉने रनेसॉन्सच्या विचारवंतांना सोर्बोनच्या जाचापासून फक्त संरक्षणच दिलं नाही तर त्यांच्यासाठी पॅरिसच्या प्रतिष्ठित लॅटिन क्वार्टर्समध्ये रॉयल कॉलेजची स्थापना करून दिली. १५३० मध्ये स्थापन केलेलं रॉयल कॉलेज म्हणजे आजचं प्रतिष्ठित Collè ge de France जिथं विसाव्या शतकातल्या हेन्री बर्गसन, क्वोद लेव्ही स्ट्रॉस, मिशेल फुको, रोलाँ बार्थ, पिएर बुर्दिअ सारख्या दिग्गजांनी अध्यापन केलं आहे.

जगभराच्या आठवणी, स्वप्नं, विचार, कल्पना साठवून वैश्विक ज्ञानपरंपरेचा ढाचा निर्माण करून फ्रान्सला ज्ञानाचं माहेरघर बनवावं, ही फ्रॉन्स्वॉची महत्त्वाकांक्षा होती. खरंतर, त्याची ज्ञाननीती त्याच्या महत्त्वाकांक्षी राजनीतीचाच भाग होती. जणू काही त्याला आधुनिकयुगाच्या ज्ञानधिष्ठित समाजाची चाहूल लागली होती. फ्रान्सच्या प्रतिष्ठित राष्ट्रीय ग्रंथालयात (बीएनएफ) आजच्या घडीला जगातील हजारो दुर्मीळ संहिता जतन करून ठेवल्या आहेत. हे जगप्रसिद्ध ग्रंथालय आणि म्युझियम म्हणजे फ्रॉन्स्वॉचं स्वत:चं खासगी ग्रंथालय! त्याची राष्ट्रीय ग्रंथालय म्हणून सुरुवात १५३७ मध्ये एका अध्यादेशानं झाली. या अध्यादेशानुसार फ्रान्समध्ये प्रकाशित होणाऱ्या पुस्तकांची एक प्रत या ग्रंथालयात जमा करणं अनिवार्य करण्यात आलं. त्यामुळे गेल्या ५०० वर्षांत फ्रान्समध्ये प्रकाशित झालेल्या पुस्तकांसह फ्रेंच मिशनरी, वसाहतवादी अधिकारी यांनी जगभरातून जमा केलेल्या संहितांचा अनमोल संग्रह ‘बीएनएफ’मध्ये सापडतो.

प्रत्येक व्यक्तीला ज्ञानक्षेत्रातील दिग्गजांच्या खांद्यावर उभं राहून ज्ञान दृष्टी प्राप्त व्हावी यासाठी ज्ञानव्यवहार लोकभाषेत होणं गरजेचं आहे, हे आधुनिक शैक्षणिक तत्त्वज्ञान विल्यम ब्युदे, फ्रॉन्स्वॉ राब्लेसारख्या तत्कालीन विचारवंतांनी मांडलं होतं. पण त्याकाळी फ्रेंच ज्ञानव्यवहाराची भाषा नसल्यानं तिला आजची प्रतिष्ठा आणि अधिमान्यता नव्हती. फ्रेंच फक्त ‘बोलीभाषा’ असल्यानं राज्यकारभार लॅटिनमध्ये चालायचा. आंतरराष्ट्रीय मानमान्यता मिळविण्यासाठी अभिजनवर्ग लॅटिनमध्ये लिखाण करत असे. फ्रेंचमध्ये व्यक्त होणं कमीपणाचं समजलं जाई. मात्र फ्रेंच या लोकभाषेचा सर्वस्तरीय वापर व्हावा यासाठी फ्रॉन्स्वॉनं १५३९ मध्ये विल्यम ब्यूदे या फ्रेंच भाषाशास्त्रज्ञाच्या सल्ल्यानुसार अध्यादेश काढून प्रशासकीय व्यवहारासाठी लॅटिनऐवजी फ्रेंच अनिवार्य केली. हा अध्यादेश फ्रेंच भाषेच्या इतिहासातली महत्त्वपूर्ण घटना समजली जाते.

पण कुठल्याही भाषेचा विकास फक्त कायदे बनवून होत नसतो. सर्वसामान्यांना समजणाऱ्या फ्रेंच या लोकभाषेत साहित्य आणि ज्ञानव्यवहार व्हावा यासाठी जोआशिम दु बेले (१५२२- १५६०) या प्रसिद्ध फ्रेंच कवीच्या मार्गदर्शनाखाली जनजागृतीची मोठी मोहीम राबवण्यात आली. त्याकाळी असा समज होता की उच्च ज्ञान आणि साहित्य व्यवहारासाठी फ्रेंच भाषा अपुरी आणि अपात्र आहे. मात्र दु बेलेने १५४९ मध्ये ‘ Defense and Illustration of the French Language ’ या ऐतिहासिक जाहीरनाम्यात अतिशय प्रभावीपणे युक्तिवाद केला की फ्रेंच ही जिवंत भाषा असल्यानं तिच्यात सर्व मानवी व्यवहार अभिव्यक्त करण्याची क्षमता आहे. त्यामुळे फ्रेंच भाषेचा सर्वस्तरीय वापर करण्यात कुणालाही लाज वाटण्याचं कारण नाही! पण ज्या फ्रेंच भाषेनं १६व्या शतकात स्वत:च्या अस्तित्वाची लढाई लढून जागतिक मान्यता मिळवली त्याच फ्रेंच भाषेनं एकोणिसाव्या शतकापर्यंत अनेक भाषा संपवून टाकल्या!

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

फ्रॉन्स्वॉनं पॅरिसला आधुनिक जगाची राजधानी बनविण्यासाठी अनेक प्रकल्प राबविले. मध्ययुगीन वास्तूंच्या जागी आधुनिक वास्तूंचं निर्माण करण्यात आलं. शॉम्बोर, फोन्तेनब्लसारख्या सुंदर वास्तू फ्रेंच रनेसॉन्सची उदाहरणं आहेत. लूव्र या मध्ययुगीन गढीचं रूपांतर भव्य पॅलेसमध्ये करण्यात आलं. लूव्र पॅलेसवर प्राचीन आणि इटालियन वास्तुशास्त्राचा प्रभाव दिसून येतो. व्हर्सायच्या महालात स्थलांतरित होण्यापूर्वी १६६२ पर्यंत लूव्र फ्रेंच राज्यकर्त्यांचं निवासस्थान होतं. थोडक्यात, द्रष्ट्या फ्रॉन्स्वॉनं ‘आधुनिक’ माणसाच्या निर्मितीसाठी विचारांखेरीज संस्थात्मक कामही करून निर्णायकपणे फ्रेंच समाजाला आधुनिकतेच्या उंबरठ्यावर आणून सोडण्याचं ऐतिहासिक काम केलं आहे. त्यामुळे त्याचा गौरव ‘प्रिन्स ऑफ रनेसॉन्स’ अशा उल्लेखानं केला जातो.