जम्मू आणि काश्मीर राज्याला विशेषाधिकार देणारे घटनेतील ३७० वे कलम हटविण्याच्या मोदी सरकारच्या निर्णयास या ५ तारखेला सहा वर्षे पूर्ण झाली. ते करतानाच जम्मू आणि काश्मीरचा राज्याचा दर्जा काढून जम्मू – काश्मीर तसेच लडाख अशा दोन केंद्रशासित प्रदेशांची निर्मिती करण्यात आली. केंद्रशासित झाल्याने इथले सारे अधिकार हे नायब राज्यपाल म्हणजेच पर्यायाने केंद्र शासनाच्या हाती एकटवले. पोलीस, प्रशासकीय यंत्रणा नायब राज्यपालांच्या अखत्यारीत आली. सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार गेल्या वर्षी जम्मू आणि काश्मीर केंद्रशासित प्रदेशाच्या विधानसभेची निवडणूक पार पडली. ओमर अब्दुल्ला यांच्या नेतृत्वाखाली सरकार स्थापन झाले तरी या लोकनियुक्त सरकारच्या हाती मर्यादित अधिकार होते. यातूनच संपूर्ण राज्याचा दर्जा पुन्हा बहाल करा, अशी मागणी सातत्याने करण्यात येत आहे. राज्यात विधानसभेची निवडणूक घेण्याचा आदेश देतानाच केंद्रशासित प्रदेशाऐवजी राज्याचा दर्जा बहाल करावा, असे निर्देशही सर्वोच्च न्यायालयाने डिसेंबर २०२३ मध्ये दिले होते. त्यालाही आता दीड वर्ष उलटले. राज्याचा दर्जा पुनर्स्थापित करावा म्हणून नव्याने सादर करण्यात आलेल्या याचिकेवर उद्या, शुक्रवारी सुनावणी घेण्याचे सर्वोच्च न्यायालयाने मान्य केले आहे. सर्वोच्च न्यायालयाने राज्याचा दर्जा पुन्हा बहाल करण्याकरिता कालमर्यादा निश्चित केली तरच ही मागणी लवकर पूर्ण होऊ शकेल. राज्याचा दर्जा बहाल करण्याच्या सर्वोच्च न्यायालयाच्या या आधीच्या आदेशावर केंद्र शासन नेहमीच ‘लवकरात लवकर’, असे मोघम उत्तर देते. पण लवकर म्हणजे कधी हे केंद्राने गुलदस्त्यात ठेवले आहे. सहा वर्षे झाल्याच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री आपल्या मागणीसाठी सनदशीर मार्गाचा अवलंब करत ओमर अब्दुल्ला यांनी भाजप, काँग्रेससह देशातील ४२ राजकीय पक्षांच्या प्रमुखांना पत्राद्वारे सध्या सुरू असलेल्या संसदेच्या अधिवेशात ‘राज्याच्या दर्जा’चा मुद्दा मांडण्याची तसेच या मुद्द्यासाठी पुढाकार घेण्याची विनंती केली आहे.
घटनेतील ३७० वे कलम हटविल्यापासून जम्मू आणि काश्मीरमधील परिस्थिती सुधारल्याचा दावा भाजपकडून केला जातो. तेथील दहशतवादी कारवाया कमी झाल्या. स्थानिक युवकांचा दहशतवादी कारवायांमधील सहभाग कमी झाला. पर्यटन वाढले. लोकसभा आणि विधानसभेच्या निवडणुका मुक्त आणि मोकळ्या वातावरणात पार पडल्या. विधानसभेसाठी सुमारे ६४ टक्के मतदार मतदानासाठी बाहेर पडले. याबरोबरच राज्यात गुंतवणुकीसाठी अनेक जण पुढाकार घेत असल्याचा दावा प्रशासनाकडून करण्यात येतो. जम्मू आणि काश्मीरमधील परिस्थिती पूर्णत: पूर्वपदावर आली, असा दावा नायब राज्यपाल मनोज सिन्हा यांनी केला होता. परिस्थिती पूर्वपदावर आली तर राज्याचा दर्जा देण्यात कसला अडथळा? पण पहलगामधील दहशतवादी हल्ल्यानंतर सारेच चित्र बदलले. ऐन मोसमात पर्यटकांचा ओघ कमी झाला. राज्याच्या अर्थव्यवस्थेवर त्याचा परिणाम झाला. लोकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले. सुरक्षेत त्रुटी राहिल्याचे केंद्र सरकारला शेवटी कबूल करावे लागले.
केंद्रशासित प्रदेशात लोकनियुक्त सरकार असले तरी केंद्राचे पूर्णपणे नियंत्रण असते. हे लक्षात घेता, केंद्र सरकार जम्मू आणि काश्मीरला लगेचच राज्याचा दर्जा किंवा स्वायत्तता देण्याबाबत साशंकताच व्यक्त केली जाते. तशीही भाजपची सध्याची वाटचाल ही एकाधिकारशाहीकडे सुरू असल्याची टीका होते. संघराज्य पद्धतीत केंद्र व राज्यांचे अधिकार विभागलेले आहेत. अर्थात, केंद्राला जादा अधिकार आहेत. विरोधी पक्षांची सरकारे असलेल्या बहुतांशी सर्व राज्यांमध्ये सध्या केंद्र व राज्य संबंध ताणले गेलेले आहेत. तमिळनाडू, पश्चिम बंगाल, केरळ, पंजाब, कर्नाटक, तेलंगणा अशा राज्यांची हीच तक्रार असते. राज्यात महाविकास आघाडीचे सरकार असताना केंद्राकडून राज्याची कशी अडवणूक झाली याची उदाहरणे समोर आहेतच. जम्मू आणि काश्मीरमध्ये नॅशनल कॉन्फरन्स-काँग्रेस आघाडीची सत्ता आहे. भाजप विरोधकांना बळ देण्याची शक्यता कमीच. त्यातच मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला भाजपबद्दल फारच मवाळ भूमिका घेतात, अशी टीका पीडीपीच्या नेत्या मेहबूबा मुफ्ती यांनी केली आहे. राज्याचा दर्जा किंवा घटनेच्या ३७० व्या कलमानुसार राज्याला पुन्हा विशेषाधिकार प्राप्त करून देण्याच्या आश्वासनाचा ओमर यांना विसर पडल्याचा आरोप खोऱ्यात केला जातो. भाजपशी हातमिळवणी केल्याचे विरोधकांकडून सातत्याने टोचले जात असल्यानेच मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला यांनी शहीद दिनाला नायब राज्यपालांचा बंदीचा आदेश मोडून कबरस्तानात प्रार्थनेसाठी घेतलेली धाव किंवा ५ तारखेला राज्यभर नॅशलन कॉन्फरन्सच्या वतीने राज्याच्या दर्जासाठी केलेले आंदोलन यातून भाजपविरोधी चेहरा दाखविण्याचा प्रयत्न तरी केला आहे. जम्मू काश्मीर किंवा हिंसाचारग्रस्त मणिपूर या राज्यांवरील आपली पकड केंद्र सरकार सहजासहजी सोडणार नाही. यामुळेच संपूर्ण राज्याच्या दर्जासाठी जम्मू आणि काश्मीरमधील सत्ताधाऱ्यांना अजून प्रतीक्षा करावी लागेल अशीच चिन्हे दिसतात.