‘आयपीएलची कंत्राटे मिळाली नाहीत त्याचे वैषम्य वाटत नाही. उलट १००हून अधिक कसोटी सामने खेळलो याचा अभिमान आहे…’ चेतेश्वर पुजाराच्या या शब्दांमध्ये त्याचे क्रिकेटप्रेम आणि प्राधान्य प्रतिबिंबित होते. पुजारा कसोटीतील आदर्श फलंदाज. वरकरणी शांत पण तितकाच निग्रही, अचल. प्रतिआक्रमण करणाऱ्या फलंदाजांच्या युगात दुर्मीळ बचावात्मक फलंदाज. खेळपट्टीवर टिकून राहिले की धावा होतात, या मूलभूत तंत्रापासून त्याने फारकत घेतली नाही. हिंमत, संयम आणि शैली यांची यशस्वी सांगड घालू शकलेल्या शेवटच्या काही फलंदाजांपैकी एक.
वडील अरविंद रणजीपटू असल्यामुळे चेतेश्वरला घरातूनच क्रिकेटचे धडे मिळाले. धावांचा रतीब घालणे लहानपणापासूनच मुरले होते. १४ वर्षांखालील क्रिकेटमध्ये त्रिशतक, १९ वर्षांखालील सामन्यात इंग्लंडविरुद्ध द्विशतक. मोठ्या खेळी उभारण्याची सवय अखेरपर्यंत कायम राहिली. त्याची फलंदाजी आकारास आली, सौराष्ट्रातील राजकोट येथील सपाट खेळपट्टीवर. पण प्रचंड मेहनत घेऊन त्याने ऑस्ट्रेलिया, इंग्लंडमधील खेळपट्ट्या आणि वातावरणातही या फलंदाजीचा अभेद्यापणा कायम राखला. त्यामुळेच राहुल द्रविडच्या अस्तानंतरही त्याची उणीव पुजाराने जाणवू दिली नाही.
त्याचा भारतीय संघातील प्रवास सोपा नव्हता. एकदिवसीय सामन्यांसाठी उपयुक्त आहे का, या प्रश्नापासून गुडघ्यावरील शस्त्रक्रियेमुळे उभा राहिलेला तंदुरुस्तीचा प्रश्न यामुळे त्याची एकदिवसीय क्रिकेट कारकीर्द फार बहरली नाही. कसोटीत मात्र त्याने कसर भरून काढली. ऑस्ट्रेलियात २०१८-१९ मध्ये भारताच्या ऐतिहासिक मालिका विजयात त्याचा संयम मोलाचा ठरला. ऑस्ट्रेलियन गोलंदाजांचा शरीरवेधी मारा थेट झेलत पुजारा न डगमगता खेळपट्टीवर उभा राहिला. चार कसोटींत तब्बल १२५८ चेंडूंचा सामना आणि तीन शतकी खेळी ही आकडेवारीच त्याचा दर्जा सिद्ध करणारी. पुढे २०१९-२० मधील जागतिक कसोटी स्पर्धा आणि पाठोपाठ २०२०-२१ मधील ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या मालिकेतही तो आधारस्तंभ ठरला.
त्यानंतर मात्र कारकिर्दीला ग्रहण लागले. तीन वर्षांपूर्वी २०२२च्या सुरुवातीला पुजाराने भारतीय संघातील स्थान गमावले. स्वत:ला नव्याने सिद्ध करण्यासाठी त्याने इंग्लिश काउंटी क्रिकेटचा मार्ग अवलंबला. तेथील कामगिरीने पुन्हा भारतीय संघात स्थान मिळवले. मात्र, कहाणी बदलली नाही. खेळपट्टीवर नुसते थांबून धावा होत नाहीत, हे आधुनिक क्रिकेटचे समीकरण त्याला उमगलेच नाही. त्यामुळे २०२३ च्या जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेच्या मालिकेतील अंतिम सामना त्याचा अखेरचा कसोटी सामना ठरला. पुजाराने समालोचकाची भूमिका स्वीकारली. पण, विराट, रोहितच्या निवृत्तीने मधल्या फळीत कोण, अशी विचारणा होऊ लागली. पुजाराच्या नावाची दबक्या आवाजात चर्चा सुरू झाली. पण, निवड समितीने नव्या फलंदाजांवर विश्वास दाखवला. इंग्लंडमधील नवोदितांची कामगिरी आणि वयाचा विचार करून पुजाराने क्रिकेटमधून निवृत्तीचा निर्णय घेतला असावा. आता समालोचक, प्रशिक्षक असे पर्याय त्याच्यासमोर आहेत. पण, प्रतिस्पर्धी गोलंदाजांना निराश करणारा त्याचासारखा फलंदाज आता दिसणार नाही. विराटच्या नेतृत्वाने भारताच्या कसोटी संघात धुगधुगी आणली, पण त्या विजयगाथेतला एक शिलेदार पुजाराही होताच.