ख्रिास्तपूर्व ४५ मध्ये अमलात आलेलं जूलियन कॅलेंडर सन १५८२ पर्यंत चाललं — जवळजवळ १६०० वर्षं. हे मोठं आश्चर्यच म्हटलं पाहिजे. कारण हे कॅलेंडर चुकीच्या गृहीतकावर आधारित होतं. आणि ही गोष्ट त्याच्या जन्माच्या वेळेसच माहीत होती!
आता दोन प्रश्न निर्माण झाले. मुळात चुकीच्या गृहीतकावर आधारित कॅलेंडर अमलातच का आणलं? बरं, आणलं ते आणलं, ते पुढे इतकी वर्षं वापरात का राहिलं? आज या प्रश्नांच्या उत्तरांचा शोध घेऊ.
जूलियन कॅलेंडरच्या आधीची सगळी रोमन कॅलेंडरं चांद्र मास आणि सौर वर्ष अशी होती. त्या मालिकेतलं जूलियन कॅलेंडर हे पहिलं असं कॅलेंडर होतं ज्यात चांद्र मास या संकल्पनेला फाटा देण्यात आला होता. जूलियस सीझरला हा बदल करण्याची प्रेरणा कुठून मिळाली?
इजिप्तमधून! इजिप्तमध्ये ३६५ दिवसांचं सौर कॅलेंडर वापरात होतं. दर वर्षी तितकेच दिवस. अधिक महिना वगैरे काही भानगड नाही असं ते कॅलेंडर होतं. आणि सीझर तर स्वत: इजिप्तमध्ये गेला होता आणि तिथे त्याने दीर्घकाळ मुक्कामही केला होता. का?
सीझर सम्राट बनण्यापूर्वी रोममध्ये प्रजासत्ताक राज्य होतं. अर्थात, हे सगळं म्हणण्यापुरतं. सर्व सत्ता अवघ्या तीन माणसांच्या हातात एकवटलेली होती — जूलियस सीझर, क्रॉसस आणि पाँपे. क्रॉसस तर निवर्तला. पण पाँपे आणि सीझर यांच्यातला संघर्ष अगदी शिगेला पोहोचला. सीझरचं पारडं जड होतं आहे हे पाहताच पाँपे पळाला — ग्रीसमार्गे इजिप्तकडे. इजिप्तला पोचल्या दिवशीच प्रतिस्पर्ध्यांनी पाँपेचा काटा काढला. पण सीझर पाँपेच्या मागावर इजिप्तला पोचलाच.
आणि इथे सगळा ब्रह्मघोटाळा झाला! तिथे त्याची भेट झाली क्लिओपात्राशी. ही मिस्राी सुंदरी तिथली राणीही होती. सीझर तिच्या प्रेमात पडला. तिच्या वतीने तिच्या प्रतिस्पर्ध्यांशी लढला. आणि तिला राणी म्हणून प्रस्थापित केलं. या काळात तिला त्याच्यापासून एक मुलगाही झाला. थोडक्यात, त्याचा इजिप्तमधला मुक्काम दीर्घकाळाचा होता.
या प्रदीर्घ मुक्कामात इजिप्शियन सौर कॅलेंडर त्याच्या निदर्शनास आलं असण्याची दाट शक्यता आहे. कारण जूलियन कॅलेंडरच्या निर्मितीत सीझरचा प्रमुख सल्लागार ख्यातनाम खगोलशास्त्रज्ञ सोसेजिनिस हा होता. हा माणूस तसं पाहता ग्रीक पण त्याचं वास्तव्य असे अलेक्झांड्रियामध्ये. याने सौर वर्षाचा कालावधी ३६५.२५ दिवसांचा असतो असं अनुमान बांधलं होतं. तोच मुख्य सल्लागार असल्यामुळे जूलियन कॅलेंडरसाठी वर्षाची लांबी तेवढीच धरली!
वास्तविक या सगळ्या घडामोडींपूर्वी सुमारे शे-दीडशे वर्ष हिप्पार्कस नावाच्या ग्रीक खगोलशास्त्रज्ञाने सौर वर्ष ३६५.२४६७ दिवसांचं असतं असा अधिक अचूक अंदाज वर्तवला होता. पण तरीही तो काही विचारात घेतला नाही.
म्हणजे, ना तो पाँपे इजिप्तला पळता, ना सीझर त्याच्या मागे जाता. ना तो सीझर इजिप्तला जाता, ना त्याला ती क्लिओपात्रा भेटती. ना तिची-त्याची भेट होती, ना तो इतका प्रदीर्घ मुक्काम करता. आणि मग कदाचित, हे कॅलेंडर या चुकीच्या गृहीतकावर आधारित नसतं! म्हणजे तात्पर्य काय, तर एका अर्थाने राजाचं प्रेमप्रकरण हे या घोडचुकीचं मुख्य कारण ठरलं!
दर ४०० वर्षांत हे कॅलेंडर तीन दिवस मागे पडे. त्यामुळे सुरुवातीची काही वर्षं, काही शतकं हे कॅलेंडर आणि ऋतू यांचा घट्ट मेळ बसला आहे असं लोकांना वाटलं असेल तर त्यात काही नवल नाही. पण यातली चूक हळूहळू लोकांच्या लक्षात येऊ लागली होती.
आठव्या शतकात बेडे नावाच्या इंग्लिश साधूने जूलियन कॅलेंडर आणि प्रत्यक्ष ऋतू यांत सुमारे तीन-चार दिवसांचं अंतर पडलं आहे हे दाखवून दिलं होतं. १३ व्या शतकात रॉजर बेकन या प्रख्यात इंग्लिश शास्त्रज्ञाने हे अंतर सात-आठ दिवसांचं आहे असा अंदाज वर्तवला होता. १४ व्या शतकात डांटे या इटालियन विचारवंताने कॅलेंडरमध्ये बदल करणं गरजेचं आहे हे सांगितलं.
पण तरीही तो बदल प्रत्यक्ष करण्यासाठी पुढची सुमारे २०० वर्ष वाट पाहावी लागली. का?
पहिलं कारण समाजाचं शैथिल्य. ‘चाललं आहे ते बरं चाललं आहे…’ अशीच समाजाची धारणा असते. कोणत्याही रचनेत काही बदल करणं समाज साधारणपणे टाळतो. कॅलेंडरसारख्या रोजच्या वापरातल्या, गरजेच्या विषयात तर बदलाला कडकडून विरोधच होतो.
दुसरं म्हणजे शास्त्रीय निकषांवर आधारित असे बदल स्वीकारायचे तर त्यासाठी समाजमन अधिक प्रगल्भ हवं. मागासलेल्या, बुरसट विचारांच्या समाजात असे बदल स्वीकारले जाण्याची शक्यता कमी. तेव्हा, युरोपात प्रबोधन युग बऱ्यापैकी प्रस्थापित झाल्यावर कॅलेंडरमधला हा बदल घडावा हा योगायोग नसावा!