आपल्याप्रमाणे शार्कनाही दृष्टी, ध्वनी, गंध, रुची, स्पर्श या संवेदना असतात. विद्युतग्रहण आणि प्रवाह-संवेदना या शार्कच्या खास संवेदना!
‘ॲम्प्युले ऑफ लॉरेन्झिनी’ ही शार्कची अर्धप्रवाही, चिकट पदार्थाने भरलेली ज्ञानेंद्रिये आहेत. स्टिफॅनो लॉरेन्झिनी या इटालियन शास्त्रज्ञाला १६७८ मध्ये ॲम्प्युले आढळले. त्यांचा विद्युतग्रहण संवेदनेशी संबंध रिचर्ड मरे यांना १९६० साली कळला. मध्यंतरी २८२ वर्षे लोटली. ॲम्प्युले ऑफ लॉरेन्झिनी सूक्ष्म चंबूंसारखे असून तोंडाच्या आसपास दिसतात. प्राणिशरीरातल्या प्रत्येक पेशीत, पेशीपटलाबाहेर किंचित धनविद्युतभार असतो. याउलट पेशीपटलाची आतील बाजू ऋणविद्युतभार दाखवते. पेशी उद्दीपित होते तेव्हा अल्पकाल स्थिती उलट होते. ही क्रिया सामान्य पेशींपेक्षा चेता-स्नायूपेशींमध्ये फारच ठळक प्रमाणात घडते. आपल्याला नगण्य वाटणारा विद्युतभारातील बदल शार्कना जाणवतो. प्राणिशरीराभोवतीचे विद्युतक्षेत्र क्षीण असले तरी शार्कना अॅम्प्युलेमुळे कळते. परिणामी समोरचा प्राणी भक्ष्य आहे का, हे शार्क ओळखतात. नक्की कळले नाही तर शार्क चावा घेऊन ‘नमुनाघास’ घेतात आणि पक्के ठरवतात. आपण समुद्रात पोहत असलो तर शार्कने खाद्यनमुना म्हणून आपला ‘घास’ घेणे धोक्याचे ठरते. शार्कचे डोळे चेहऱ्याच्या दोन विरुद्ध बाजूंना असल्याने त्यांना स्वत:च्या तोंडालगतचे दिसत नाही. तोंडाजवळचा भाग शार्कसाठी अंधक्षेत्र आहे. त्यामुळे ॲम्प्युले ऑफ लॉरेन्झिनींकडून मिळणारी विद्युतग्रहण संवेदना अंधाऱ्या, गढूळ पाण्यात शार्कसाठी महत्त्वाची ठरते.

शार्कच्या डोक्यावर सर्वत्र आणि शरीराच्या दोन्ही बाजूना समांतर अरुंद नळय़ा असतात. त्यात अर्धप्रवाही, दाट द्रव असतो. थोडय़ा- थोडय़ा अंतरावर या नळय़ांना सूक्ष्म छिद्रे असली तरी त्यातील दाट पदार्थ वाहून जात नाही. नळय़ांच्या आतील भिंतींवर रोमकधारी (पातळ तंतू) संवेदी पेशींचे गट विखुरलेले असतात. भोवतालच्या पाण्यातील दाबात छोटय़ाशा फरकानेही या पेशींवरील रोमक वाकतात. त्यांच्या बुडाशी असलेल्या चेतातंतूतून संवेग मेंदूकडे जाऊन शार्कना अन्य प्राण्यांचे अस्तित्व, हालचाल, स्थलांतराचा वेग, दिशा याची जाणीव करून देतात. कानाप्रमाणेच हे नलिकाजाल, दाब समजून घेण्यास उपयोगी पडते. नलिकाजालाच्या वेगवेगळय़ा ठिकाणी दाब बदलत गेला तर जलप्रवाहाचे ज्ञान होते. ऐकणे, स्पर्श, दाब आणि प्रवाहज्ञान-संवेदना मूलत: एकाच प्रकारच्या आणि एकमेकांशी निगडित संवेदना आहेत.-नारायण वाडदेकर,मराठी विज्ञान परिषद

survival of marine species in danger due to ocean warming
विश्लेषण : महासागर तापल्याने प्रवाळ पडू लागलेत पांढरेफटक… जलसृष्टीचे अस्तित्वच धोक्यात?
forever particles marathi news, forever particles latest marathi news
विश्लेषण : जगभर पिण्याच्या पाण्यात आढळतात घातक `फॉरएव्हर पार्टिकल्सʼ… त्यांचे उच्चाटन अवघड का असते?
Brown Rice or White Rice
कोणता भात खावा पांढरा की ब्राऊन? तज्ज्ञांनी सांगितला कोणता तांदूळ आरोग्यासाठी फायदेशीर…
Electrolyte-rich drinks in summer is good for health
उन्हाळ्यात इलेक्ट्रोलाइटयुक्त पेये फायदेशीर; डिहायड्रेशन दूर करण्यासाठी तज्ज्ञांच्या खास टिप्स