महेश सरलष्कर

भाजपच्या प्रचारासाठी नरेंद्र मोदी, तर ‘आप’साठी अरविंद केजरीवाल गुजरातमध्ये येत राहातील; पण काँग्रेसचे कोणते केंद्रीय नेते येणार? काँग्रेसचे अनेक आमदार भाजपवासी झाल्यानंतर तर, मोदींवर टीका करण्याचेही काँग्रेसजन टाळतात..

East Nagpur, Congress, booth planning,
पूर्व नागपुरात काँग्रेसची यंत्रणा तोकडी, बूथ नियोजनात ढिसाळपणा; स्थानिक नेत्यांऐवजी….
congress in gujarat loksabha
गुजरातमधील काँग्रेसचे ‘जायंट-किलर’ रूपालांविरोधात निवडणुकीच्या रिंगणात; भाजपाचं गणित बिघडणार?
controversy, nitin Gadkari photo, agitation of congress, nagpur
मतचिठ्ठीवर गडकरींचे छायाचित्र, नागपुरात भाजप- काँग्रेसमध्ये वादावादी !
narendra modi
काँग्रेसच्या जाहीरनाम्यावर मुस्लीम लीगचा ठसा! पंतप्रधान मोदींचा आरोप; काँग्रसचे प्रत्युत्तर

काँग्रेसने ‘भारत जोडो’ यात्रेचा मार्ग जाहीर केला तेव्हा प्रचंड टीका झाली होती. हिमाचल प्रदेश आणि गुजरात या दोन राज्यांमध्ये विधानसभेची निवडणूक असताना काँग्रेसने यात्रेमध्ये ही दोन्ही राज्ये का सोडून दिली? ‘काँग्रेस हा राजकीय पक्ष नव्हे तर, ‘एनजीओ’ झालेला आहे’ .. ‘नाही तरी ‘यूपीए’च्या काळात काही ‘एनजीओं’ना सोबत घेऊन काँग्रेसने समांतर सरकार स्थापन केलेच होते, यात्रा म्हणजे काँग्रेसच्या ‘एनजीओ’करणाचा नवा चेहरा आहे’ – असे वेगवेगळे मुद्दे चर्चिले गेले होते. पण काँग्रेसचे ‘एनजीओ’मध्ये रूपांतर होत नाही, हे ‘भारत जोडो’ यात्रेकडे बारकाईने पाहिले तर कोणालाही समजू शकेल. यात्रेमध्ये राहुल गांधी २२-२४ किमी चालतात, हा प्रमुख भाग असेल; पण यात्रेच्या दोन सत्रांमधील मध्यंतरामध्ये राहुल गांधी काय करत आहेत, हे पाहणे त्याहूनही महत्त्वाचे आहे. या मध्यंतरात खरे ‘राजकारण’ केले जाते, राहुल यांचे भाषण लक्ष देऊन ऐकले तर त्याची थोडी फार कल्पना लोकांना येऊ शकेल! आत्ता ‘भारत जोडो’ यात्रा महाराष्ट्रात प्रवेश करत आहे, तिथून यात्रेच्या मार्गात थोडा बदल केला तर, गुजरातला जाण्यासाठी फारसा वेळ लागणार नाही. पण, काँग्रेसने पहिल्यापासून यात्रा गुजरातला जाणार नाही, याची काळजी घेतली होती. ‘विधानसभेची निवडणूक असताना यात्रा गुजरातला जाणार नसेल तर यात्रेचा राजकीय लाभ कसा मिळणार,’ असेही प्रश्न विचारले गेले होते. त्यावर, ‘यात्रा निवडणुकीच्या लाभासाठी काढलेली नाही, यात्रा गुजरातपर्यंत जाईपर्यंत तिथली निवडणूक संपलेली असेल,’ असे स्पष्टीकरण काँग्रेसकडून दिले गेले होते. पण जाणीवपूर्वक गुजरात वगळून यात्रेचा मार्ग निश्चित केला गेला असावा, असे विधानसभेची निवडणूक नजीक आल्यावर दिसू लागले आहे.

गुजरातमध्ये सलग २७ वर्षे भाजपची सत्ता असून गेल्या विधानसभा निवडणुकीत (डिसेंबर २०१७) या सत्ताधारी पक्षाला ४९ टक्के; तर काँग्रेसला ४३ टक्के मते मिळाली होती. १८२ जागांपैकी भाजपला ९९; तर काँग्रेसला ७७ जागा जिंकता आल्या. २०१७ मध्ये भाजपला कशीबशी सत्ता वाचवता आली होती. पण गेल्या पाच वर्षांमध्ये भाजपने सत्तेची पकड घट्ट केली आहे. त्यासाठी मुख्यमंत्री बदलून पाटीदार समाजाला खूश केले. हार्दिक पटेलसारख्या पाटीदार नेत्यांना पक्षात आणले, काँग्रेसचे आमदार फोडले. भाजपच्या या आक्रमकपणाविरोधात काँग्रेसला काहीही करता आले नाही. यंदाच्या विधानसभा निवडणुकीत भाजपला तोंड देण्यासाठी ग्रामीण भागांतील मतदारांचा पाठिंबा कायम राखणे हा एकमेव पर्याय काँग्रेसकडे उरलेला आहे. हा मतदार हातातून सुटणार नाही, याची दक्षता काँग्रेस डोळय़ावर न येणाऱ्या प्रचारातून घेत आहे! काँग्रेस पक्ष गुजरातमध्ये निवडणुकीचा प्रचार करत आहे की नाही, असा प्रश्न विचारला जात आहे. काँग्रेसचे काय चालले आहे, हे गुजरातबाहेर लोकांना समजतच नाही. गुजरात काँग्रेसमध्ये शांतता पसरल्याचा भास निर्माण झाला आहे.

मोदींकडून दखल

याउलट आम आदमी पक्षाचे (आप) सर्वेसर्वा अरविंद केजरीवाल यांनी दिल्ली सोडून अहमदाबादमध्ये स्थलांतर केले असावे, असे वाटावे इतका त्यांचा गुजरातमधील वावर वाढलेला आहे. सकाळी दिल्लीत पत्रकार परिषद घेऊन केजरीवाल खासगी विमानाने अहमदाबादमध्ये पोहोचतात आणि दुपारी पुन्हा पत्रकार परिषद घेतात. केजरीवाल यांच्यासह आपच्या नेत्यांची फळी गुजरातमध्ये प्रचार करताना दिसते. भाजपसाठी तर गुजरात म्हणजे हक्काचे घर, तिथे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांचे दौरे होणे अपेक्षितच आहे. मोदी-शहा उत्तर प्रदेशमध्ये गेले नसतील इतके ते या वेळी गुजरातमध्ये जाताना दिसले. मोदी-शहा आणि केजरीवाल यांचे गुजरातमधील झंझावाती दौरे आणि प्रचार पाहिला तर, काँग्रेस कुठे आहे, असे म्हणावे लागले.

काँग्रेसच्या ‘गायब’ होण्याची दखल पहिल्यांदा घेतली ती पंतप्रधान नरेंद्र मोदींनी. गुजरातमधील दौऱ्यात भाजपच्या कार्यकर्त्यांना उद्देशून केलेल्या भाषणात मोदी म्हणाले की, या वेळी काँग्रेसने प्रचाराची पद्धत बदलली आहे, काँग्रेसच्या गोटामध्ये शांतता आहे, ते गुपचूप प्रचार करत आहेत. काँग्रेसचे नेते उघडपणे काही बोलतही नाहीत. तुम्ही सावध राहा! मोदींनी जाहीरपणे काँग्रेसची दखल घेतल्यावर, प्रसारमाध्यमांचेही काँग्रेसकडे लक्ष वेधले गेले. गुजरातमध्ये काँग्रेस कुठे गेला, याची आता चर्चा होऊ लागली आहे. काँग्रेसचे राष्ट्रीय स्तरावरील नेते गुजरातमध्ये जाऊन विधाने करताना दिसत नाहीत. काँग्रेसने मोदींविरोधात बोलणे बंद केलेले आहे. केंद्रातील मोदी सरकारच्या धोरणांवर काँग्रेसचे नेते दिल्लीत, भारत जोडो यात्रेमध्ये, गुजरात आणि हिमाचल प्रदेशमध्ये टीका करतात; पण पूर्वीप्रमाणे भाजपच्या केंद्रीय नेतृत्वाला लक्ष्य केले जात नाही. काँग्रेससमोर द्विधा मन:स्थिती असावी : गुजरातमध्ये मोदींचे राज्य म्हणून थेट शाब्दिक हल्लाबोल करायचा की, ग्रामीण भागांवर लक्ष केंद्रित करायचे? प्रचाराचे केंद्र मोदी असतील तर त्याचा राजकीय लाभ नेहमीच भाजपला मिळाला आहे.

ग्रामीण भागांत पाहावे लागेल..

‘भारत जोडो’ यात्रेनिमित्त राहुल गांधी महाराष्ट्रात असतील; पण तिथून ते मध्य प्रदेशमध्ये जातील. गुजरातमध्ये राहुल गांधींची जाहीर सभा होणार की नाही, हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. एखाद-दोन सभा झाल्या तरी, प्रचाराच्या शेवटच्या टप्प्यामध्ये होतील. तोपर्यंत राहुल गांधी गुजरातमध्ये फिरकण्याची शक्यता दिसत नाही. हिमाचल प्रदेशमध्येही प्रियंका गांधी-वाड्रा प्रामुख्याने प्रचार करत आहेत. तिथेही राहुल गांधी प्रमुख प्रचारक नाहीत. राहुल गांधींचे नाव तारांकित प्रचारकांच्या यादीत असेलही; पण ते प्रचार करणार नसतील तर, ‘मोदी विरुद्ध राहुल’ असा सामना भाजपला खेळता येणार नाही. हा सामना होणारच नसेल तर, भाजपला राजकीय लाभ मिळू शकत नाही. भाजपविरोधात काँग्रेस समोर येऊन लढणार नसेल तर, भाजपला काँग्रेसच्या मागे धावावे लागेल. काँग्रेसचा प्रचार कसा चालला आहे, हे भाजपला ग्रामीण भागात जाऊन पाहावे लागेल. काँग्रेसला ४०-४२ टक्के मते मिळाली असतील तर, अजूनही ग्रामीण भागामध्ये काँग्रेसच्या मतांचा पाठिंबा कायम असू शकतो. काँग्रेस घरोघरी जाऊन प्रचार करत असल्याचे सांगितले जाते. मतदारांना प्रत्यक्ष थेट भेटून भाजपच्या धोरणांविरोधात मानसिकता तयार केली तर, काँग्रेसला गेल्या विधानसभा निवडणुकीतील मतांची टक्केवारी टिकवता येऊ शकेल. त्याचा लोकसभा निवडणुकीत अधिक लाभ होण्याची शक्यता आहे. काँग्रेसची ‘भारत जोडो’ यात्रा गुजरातमध्ये येणार नसली तरी, राज्याच्या पाच विभागांमध्ये पाच यात्रा काढल्या जात आहेत. या यात्रांमधून सर्वच्या सर्व मतदारसंघांमध्ये काँग्रेसचे नेते फिरतील. ‘भारत जोडो’ यात्रेमुळे लोकांमध्ये निर्माण झालेले कुतूहल गुजरातमधील यात्रांना लाभदायी ठरेल असा काँग्रेसचा कयास आहे. या यात्रांमध्ये काँग्रेसच्या नेत्यांना भाजपविरोधात आक्रमक होता येऊ शकेल.

गुजरातमध्ये या वेळी तिरंगी लढत होईल; पण ‘आप’ कोणाची मते खिशात टाकेल याकडे सगळय़ांचे लक्ष आहे. ‘आप’चे दिल्ली प्रारूप शहरी मतदारांना अधिक आकर्षित करणारे आहे. त्यामुळे गुजरातमध्येही ‘आप’ शहरी भागांमध्ये अधिक मते मिळवेल असे मानले जाते. इथे ‘आप’ने काँग्रेसची मते हिसकावून घेतली तर भाजपच्या मतांमध्ये फारसा फरक पडणार नाही. पण, भाजपची मते ‘आप’ला मिळाली तर मात्र, भाजपला गुजरातमध्ये विधानसभेची निवडणूक तुलनेत कठीण जाऊ शकेल असे सांगितले जाते. भाजपला सुमारे ५० टक्के मते मिळाली आहेत, त्यामुळे मतांची ही प्रचंड टक्केवारी कमी करून सत्ता खेचून घेणे अवघड असेल; पण ग्रामीण भागांतील काँग्रेसची मते कायम राहिली आणि ‘आप’ने भाजपच्या मतांच्या वाटय़ात हिस्सेदारी केली तर, भाजपविरोधात काँग्रेस आणि ‘आप’ची अप्रत्यक्ष आघाडी दबाव आणू शकेल. हा जाणीवपूर्वक केलेला प्रयोग नसावा, पण तो यशस्वी झालाच तर लोकसभा निवडणुकीत विरोधकांच्या आघाडीचे वेगळेच चित्र पाहायला मिळू शकेल. त्यामुळे काँग्रेसच्या गुजरातमधील ‘विनागोंगाटा’च्या प्रचाराकडे भाजप अत्यंत काळजीपूर्वक पाहू लागला आहे.