‘सत्यजित राय यांच्यानंतर निव्वळ दृश्यांतून कथा मांडण्याची सिद्धी मिळवलेला महत्त्वाचा दिग्दर्शक’ म्हणून शाजी करुण यांचे नाव भारतीय चित्रपट इतिहासात कायम कोरलेले राहील. कधीकाळी फ्रान्समधील कान चित्रपट महोत्सवात कुणीतरी शाजी करुण यांची तारीफ करताना ‘सत्यजित रायनंतर महत्त्वाचे’ असे बिरुद लावले असल्याच्या नोंदी त्यांच्या मृत्यूनंतर हळूहळू पुसल्या गेल्या तरी, ‘पिरावी’ आणि ‘वानप्रस्थ’सारखे चित्रपट दृश्य-तंत्रावरल्या त्यांच्या हुकमतीची साक्ष नेहमीच देत राहतील.

पुण्याच्या ‘एफटीआयआय’मधून शिक्षण घेऊन पुढे दिग्दर्शक म्हणून गाजलेले गिरीश कासारवल्ली, केतन मेहता, सईद मिर्झा यांच्या आधीच्या- १९७४ च्या ‘बॅच’चे शाजी करुण. त्यांच्यानंतरचे तिघे दिग्दर्शक म्हणून त्यांच्या आधी चमकले, तर १९८८ पर्यंत शाजी करुण छायालेखक (सिनेमॅटोग्राफर) म्हणून काम करता करता लघुपट आणि अनुबोधपट बनवत राहिले. दिग्दर्शक जी. अरविन्दन यांच्यासाठी छायालेखनाचे काम करताना भरपूर शिकता आले, याचा उल्लेख शाजी आवर्जून करत. पण ते ‘भरपूर’म्हणजे काय, हे ‘पिरावी’ (१९८८) या पहिल्याच चित्रपटाने दाखवून दिले. मुलाची वाट पाहण्यासाठी दररोज खाडी ओलांडून, बसथांब्यावर दिवस घालवणाऱ्या वयस्कर बापाची ही कथा- त्याचा तरुण मुलगा पडद्यावर कधीच येत नाही; पण ‘आणीबाणी जाहीर झाली असताना निदर्शने केली म्हणून पकडला गेला’, ‘पोलिसांनी त्याच्यासह बऱ्याच जणांना डांबले’ असे काहीबाही वृद्ध बापाला आणि प्रेक्षकांनाही कळत राहते.

बापाची आशा चिवट असली तरी समाज एकंदरीत निराशेकडेच कसा चालला आहे, हेही प्रेक्षकाला उमगते. बाप आणि मुलगा यांची कथा १९९८ सालच्या ‘वानप्रस्थ’मध्ये दूरान्वयाने येते, तर ‘निषाद’ (२००२) मध्ये हवाई दलातील मुलाऐवजी भलत्याच कुणा अनाथ मुलाचा फोन येत असल्याने हतबल झालेली आई दिसते. ‘वानप्रस्थ’मध्ये नायकाचा तथाकथित उच्चजातीय जन्मदाता त्याचे पितृत्व नाकारतो; पुढे तरुणपणी उत्तम कथकली नर्तक झालेल्या या नायकावर एक कलासक्त तरुणी भाळते आणि तो तिच्या मुलाचा जन्मदाता असला तरी, त्याला पितृत्वाचे समाधान मिळू न देता ती मुलासह एकटी राहते. कारण? ‘मी फक्त कलावंत म्हणून तुला जवळ केले.

मुलगा माझा आहे’ अशी तिची भावना! पण कलावंताबद्दलची आसक्ती फक्त शारीरच कशी असेल? ती अशरीरी नाही असू शकत?- हा प्रश्नही त्यांनी पुढल्या चित्रपटात मांडला. कौटुंबिक कथेचे सामाजिक कंगोरे दाखवणारे शाजी करुण, प्रमुख पात्रांचे चित्रण अजिबात एकसुरी होऊ न देता माणूस म्हणून या पात्रांमध्ये असलेला व्यामिश्रपणा प्रेक्षकांपर्यंत नेमका पोहोचवत. तोही संवादांच्या भडिमारातून नव्हे, तर शांत-संयत चित्रणातून. त्यामुळेच भाषा मल्याळम असली, तरी आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात वाहवा मिळवण्याचा क्रम पहिल्या ‘पिरावी’पासून अखेरच्या ‘ओलु’पर्यंत अखंड राहिला.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

‘पिरावी’ला सर्वोत्कृष्ट भारतीय चित्रपटाचा राष्ट्रीय पुरस्कार (सुवर्णकमळ) मिळण्याआधीच लोकार्नो, कान, लंडन, बेर्गामो आदी चित्रपट महोत्सवांत तो अव्वल ठरला होता. स्त्री म्हणून विशेष वागणूक मागू नका- चित्रपट क्षेत्रात स्थिरावायचे तर बुद्धीची चमक आणि संघर्षाची तयारीही दाखवा, असा आग्रह धरणाऱ्या शाजी करुण यांना अखेरच्या दिवसांत मात्र ‘केरळ राज्य चित्रपट विकास महामंडळा’च्या अध्यक्षपदावरून विनयभंगाच्या कथित आरोपांमुळे पायउतार व्हावे लागले होते.