ज्यांनी नव्वदच्या दशकात आलेल्या ‘स्टार मूव्हीज’ आणि अन्य चित्रवाहिन्यांचे नेत्रस्वागत केले, त्यांना लिली टेलर कोण हे वेगळ्याने सांगायची गरज नाही. कारण दशकभर तरी रोज तिचा कोणता ना कोणता नवाजुना चित्रपट सुरू असे. अॅरिझोना ड्रीममधील अकॉर्डियन वाजविणारी विक्षिप्त ललना असो किंवा ढीगभर सिनेमांत नायिकेच्या बरोबर सहाय्यक भूमिका असोत… लिली टेलरचा चेहरा नित्यनेमाने पाहायला मिळे. आता ज्येष्ठावस्थेतही तिचा कामाचा उरक पूर्वापार चालणारा. आधी तिने बऱ्याच सहलेखकांना एकत्रित करून पुस्तके लिहिलीत. गेल्या १५ वर्षांपासून मात्र अभिनेत्रीऐवजी तिची ‘पक्षीमैत्रीण’ ही छबीच लोकप्रिय होत आहे. ‘टर्निंग टु बर्ड्स : द पॉवर अॅण्ड ब्यूटी ऑफ नोटिसिंग’ हे तिने लिहिलेले पुस्तक काही महिन्यांपूर्वी आले. त्या पुस्तकाविषयी छोटे टिपण आणि लिली टेलरचे निवेदन येथे पाहता येईल. हॉलीवूड अभिनेता-अभिनेत्रीचा फावल्या वेळातील छंदोउद्याोगासारखे हे पुस्तक नसून पाखरांच्या प्रेमाचा पसारा त्यात समाविष्ट आहे.
https://tinyurl.com/3dwv65r3
देविका रेगेची लेखनचर्चा…
‘क्वार्टरलाइफ’ ही देविका रेगे यांची कादंबरी दीड वर्षांपूर्वीची. भारतापेक्षा अमेरिका ब्रिटनमध्येच तिचे कुतूहल अधिक. कारण कादंबरीचे कथानक २०१४ नंतर घडलेल्या राजकीय आणि सामाजिक स्थित्यंतरात घडते. ‘ग्रॅण्टा’ मासिकाच्या संपादकाने वांद्रे येथील अमृततुल्य केंद्रात या कादंबरीवर चर्चा केली. ही चर्चा ग्रॅण्टाच्या फक्त संकेतस्थळावरच पूर्णपणे वाचता येईल.
https://tinyurl.com/43z53hmx
पंचकथा राष्ट्रकुल देशांतल्या
राष्ट्रकुल देशांतील कथालेखकांना प्रोत्साहन म्हणून दरवर्षी ‘कॉमनवेल्थ फाऊंडेशन’ कथा मागवते. दरवर्षी सात ते आठ हजार इंग्रजी कथा विविध देशांतून या स्पर्धेसाठी येतात. यंदा ७,९२० इतक्या कथा आल्या. त्यातील निवडलेल्या पाचांमध्ये आफ्रिका आणि ब्रिटनमधील कथांचा समावेश आहे. त्या पाचही पूर्ण कथा येथे मोफत वाचता येतील.
https://tinyurl.com/47nzwk75