‘मनसबदारच..’ हा अग्रलेख (११ एप्रिल) वाचला. मनसबदारीत मराठी नेत्यांची दिल्लीश्वरांपुढील रांग लाजिरवाणी आहे. डॉ. आंबेडकर, चिंतामणराव देशमुख यांच्या बुद्धिजीवी बाणेदारपणाशी ती विसंगत आहे. दिल्लीश्वरांची भलामण करणाऱ्यांत एरवी अनेकार्थाने मोठे असलेले यशवंतराव चव्हाण, स. का. पाटील हेदेखील मोडतात. मात्र त्याचे कारण नेतृत्वाचा अवाजवी पगडा हे होते. वर्तमान कारणे सर्वज्ञात आहेत.

आज पक्ष विस्ताराचे संदर्भ बदलले आहेत. प्रवक्ते, मंत्री, आयात केलेले नेते आणि आमदार यांनी महाराष्ट्रधर्माच्या पुनर्रचनेचे अवघड कार्य शिरावर घेतले आहे. ईडी, सीबीआय घेऊन दारी उभे असलेल्या शासनामुळे राजकीय संस्कृतीची नासधूस सुरू आहे. कालच्या काँग्रेसपेक्षा आजच्या भाजपची हायकमांड संस्कृती तिखट आणि निर्मम आहे. महाराष्ट्रातील सत्तांतराचा मुहूर्त एक चौथ्या फळीतला अमराठी नेता एक महिना आधी सांगतो हे विचार करण्यासारखे आहे. लोकशाहीतली ‘विकास’मार’ (लोकसत्ता- ९ जुलै २०२३) या लेखातील उल्लेखाप्रमाणे दिल्लीतल्या एका बडय़ा नेत्याने ठाकरे आणि पवार या दोन कुटुंबांना वठणीवर आणण्याबाबत जे सूतोवाच केले होते ती संकल्पपूर्ती या सर्व घटनाक्रमात लख्ख प्रतीत होते. महाराष्ट्राच्या राजकीय संस्कृतीचा विचका करण्याचे मिशन सुनियोजितपणे पार पाडले जात आहे. यशवंतराव, पवार, ठाकरे या परंपरेत ज्यांच्याकडे महाराष्ट्र आशेने पाहत होता त्या देवेंद्र फडणवीस यांचा कुशल प्रशासक ते ‘करेक्ट कार्यक्रम’ करणारा राजकारणी हा प्रवास त्यांच्या सर्वमान्यतेस आणि पर्यायाने अग्रेसर महाराष्ट्राच्या विकासाला खीळ घालणारा आहे.

loksatta editorial Supreme court descion regarding candidate affidavit on asstets
अग्रलेख: अपवादांचा अपराध!
raj thackray mns latest news
अग्रलेख: मनसबदारच..
Manmohan Singh
अग्रलेख: बडबड बहरातील मौनी!
Gaurav Vallabh
अग्रलेख: प्रवक्त्यांची पक्षांतरे!

मात्र सदासर्वकाळ राजकारणाकडे पाहून आपण निराश का व्हायचे? महाराष्ट्रधर्म राजकीय अवकाशापुरताच मर्यादित आहे का? देशबांधणीत, समाजसुधारणेत इतर घटकांचेही योगदान आहे. संयुक्त महाराष्ट्र चळवळीच्या रूपाने महाराष्ट्रधर्माचे दर्शन झाले ते मुख्यत्वे बिगरकाँग्रेसी विचारवंतांच्या भूमिकेतून. सेनापती बापट, एस. एम. जोशी, अत्रे, डांगे, प्रबोधनकार, अण्णाभाऊ, अमर शेख ही मंडळी त्यात अग्रणी होती. महर्षी कर्वे, विनोबा भावे तसेच देशाच्या सरन्यायाधीश किंवा लष्करप्रमुख पदांवरील मराठी व्यक्तींनी कोणत्याही मनसबदाराच्या रांगेत उभे न राहता महाराष्ट्रधर्माला गौरविले. विद्यमान मराठी राजकारण्यांनी मात्र त्यापासून फारकत घेतली आहे. -सत्यवान भाऊ पाटील, नाळे, नालासोपारा (प)

हे तर ‘नमो’निर्माण

‘मनसबदारच..’ हे संपादकीय (११ एप्रिल) वाचले. खरेतर राज ठाकरे यांचे मेळाव्यातील भाषण नेहमीसारखे नव्हते. त्यांची खुमासदार शैली दिसली नाही. राज ठाकरे यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची भेट घेतली तेव्हापासूनच ते राज्यात महायुतीला पाठिंबा देणार, अशी चर्चा होती. मेळाव्यात राज यांनी त्यावर शिक्कामोर्तब केले एवढेच! २०१९ मध्ये राज यांनी मोदींवर जोरदार टीका केली होती. ‘लाव रे तो व्हिडीओ’चा प्रयोग यशस्वी झाला होता. त्या वेळी त्यांनी सांगितले होते की, देशाच्या राजकीय क्षितिजावरून मोदी आणि शहा यांना हटवा. आता मोदी यांचे नेतृत्व खंबीर आहे याचा साक्षात्कार कसा झाला?

फडणवीस मनसेला युतीत घेण्याच्या विरोधात होते. आता त्यांना मनसे हवी आहे, कारण २०१९मध्ये उद्धव ठाकरे त्यांच्या सोबत होते. आता नाहीत, म्हणून राज ठाकरे हवे आहेत. ठाकरे ही भाजपची मानसिक गरज आहे. राज यांनी असे म्हटले होते की, दुसऱ्याची पोरे किती कडेवर घेणार? पण आता तेच भाजपच्या कडेवर बसले आहेत. राजकारणात बिनशर्त काहीच नसते. राज यांनी सांगितले की, विधानसभेच्या तयारीला लागा. विधानसभा लढवायची असेल तर राज यांनी निवडणूक रोखे, बेरोजगारी, बुलेट ट्रेन, महागाई, चीनची घुसखोरी यावर बोलणे गरजेचे होते.

रागरंग पाहता राज ठाकरेंची वाटचाल महायुतीच्या दिशेने सुरू आहे. उद्धव ठाकरे यांची घोडदौड रोखण्यासाठी भाजपला राज ठाकरे उपयोगी पडू शकतात हे खरे आहे. पण महायुतीत जाऊन राज ठाकरे यांच्या पदरात काय पडणार, हासुद्धा एक प्रश्न आहे. मनसेच्या अस्तित्वाचाही प्रश्न आहे. तेव्हा याला नवनिर्माण नव्हे ‘नमो’निर्माण म्हणावे लागेल, परंतु हे मनसे कार्यकर्त्यांना कितपत पचनी पडेल?-सुनील कुवरे, शिवडी (मुंबई)

मराठी पक्षांचा घात करणाऱ्यांच्याच पंखाखाली?

‘मनसबदारच..’  हे संपादकीय (११ एप्रिल) वाचले. आटोकाट प्रयत्न करूनही दिल्लीश्वरांनी केलेल्या मराठी नेत्यांपुढे अन्य कोणताच पर्याय उरला नसल्याने अखेरीस नाईलाजास्तव लोकसभा निवडणुकीसाठी ‘ड्रॉप’ घ्यावा लागून, त्यांनी (बिनशर्त?) मनसबदारी पत्करावी यापेक्षा राज्याचे दुर्दैव ते कोणते? आयुष्याच्या अखेपर्यंत स्वत:स कोणाचेही मनसबदार होऊ दिले नाही, त्या शिवरायांचा उठता-बसता जप करणाऱ्यांची अशी गत व्हावी, हे एक आश्चर्यच नव्हे का!

केवळ महाराष्ट्राच्या साधनसंपत्तीकडे डोळे असलेल्या विद्यमान सत्ताधारी दिल्लीश्वरांच्या मनात महाराष्ट्र राज्याविषयी निव्वळ आकस रोमारोमांत ठासून भरला आहे, हे सांगणे न लगे! त्याच कारणाने शिवसेना- राष्ट्रवादी या मराठी पक्षांचा घात ज्या भाजपने केला, त्याच पक्षाच्या पंखांखाली महाराष्ट्राची नवनिर्मिती करण्याच्या आणाभाका घेणाऱ्या नेत्यांनी निमूटपणे जावे, ही खटकणारी बाब नक्कीच!

एकवेळ मला नाही मिळाले तरी चालेल, पण त्यालाही कदापि मिळता कामा नये! अशी विखारी वृत्ती अंगी असलेल्या कोणत्याही मराठी राजकारण्यांना राज्यात एकहाती सत्ता मिळवून देण्याइतपत सक्षम व समर्थ प्रादेशिक पक्ष स्थापन करता आला नाही, हे ढळढळीत वास्तव होय!

एकेकाळी देशभरातील आदर्श राजवट असलेला पुरोगामी महाराष्ट्र सध्या राजकीय घसरणीवर असून, त्यास सर्वपक्षीय राजकारणी जबाबदार आहेत. यापुढे त्यांनी आत्मपरीक्षण करून राज्याच्या हितास्तव राजकीय क्षेत्रातील धरसोडवृत्ती व राजकारणाचा पोरखेळ थांबवला तर ठीकच, अन्यथा राज्याचे काही खरे नाही!-बेंजामिन  केदारकर, विरार

मोठय़ा स्वप्नांसाठीच्या मानसिकतेचा अभाव

‘मनसबदारच..’ हा अग्रलेख वाचला. दिल्लीश्वरांच्या तालावर नाचायचे नसेल तर दोनच पर्याय असतात- एक तर स्वत:च दिल्लीश्वर होणे किंवा आपल्या राज्यात खंबीरपणे पाय रोवून स्वबळावर उभे राहणे. यापैकी काहीही साध्य करायचे असेल तर धोरणीपणाने मोठे स्वप्न पाहून त्याचा पाठपुरावा करावा लागतो. तसे करताना अनेक छोटेमोठे वाद, अहंकार, आपलेच खरे करण्याची वृत्ती बाजूला सारावी लागते. प्रसंगी मोठी झेप घेण्यासाठी आधी दोन पावले मागे यावे लागते. दूरगामी मोठा स्वार्थ साधायचा असेल तर तात्कालिक स्वार्थाला अनेकदा मुरड घालावी लागते. कर्तृत्ववान साथीदार जोडताना कर्तृत्वाखेरीज अन्य कुठल्याही निकषांचे ओझे आणि मोह निग्रहाने झुगारावे लागतात. स्वत:ला ‘चार’ मिळाले तर इतरांना ‘दोन’ सोडावे लागतात. (अमेरिका विज्ञान/तंत्रज्ञान क्षेत्रात नेतृत्व कसे टिकवते हे यासंदर्भात अभ्यासण्याजोगे आहे.) आपापसांतील वादांत राज्याच्या प्रभावक्षेत्रालाच नख लागणार नाही याची काळजी (दक्षिणेतील राज्ये घेतात तशी) घ्यावी लागते. त्यालाच आधुनिक व्यवस्थापन शास्त्रात ‘कोऑपिटीशन’ (कोऑपरेशन आणि कॉम्पिटिशन यांचा संगम) म्हणतात. छत्रपती शिवरायांचा इतिहास आठवला तर असा धोरणीपणा पावलोपावली दिसतो. तशी मानसिकता त्यानंतर मराठी नेतृत्वात कधी दिसली नाही. बाहेरच्यांशी शंभर तडजोडी चालतील, पण आपल्याशी एकही चालणार नाही अशी वृत्ती दिसते. त्यामुळे त्यांचे स्वत:चे व राज्याचेही अपरिमित नुकसान झाले आहे, होते आहे. 

याउलट अगदी ब्रिटिशांपासून सर्व दिल्लीश्वरांनी आपल्याला खरे आव्हान कोण देऊ शकते याचे अचूक भान कायम बाळगलेले दिसते. अशा खऱ्या आव्हानवीरांना कसे निष्प्रभ करायचे हेही ते अचूकपणे जाणतात. कधी साम, दाम, दंड, भेद ही नीती वापरून, तर कधी देवत्व बहाल करून त्यांना ‘मॅनेज’ केले जाते. आपल्याला सोयीचे विरोधक निवडून त्यांच्या फाजील महत्त्वाकांक्षा जागवणे यात तर दिल्लीश्वरांचा हातखंडा आहे. इतर राज्ये करतात तेच मराठी माणसाने केले तर त्याला ‘संकुचितपणा’ म्हणून अपराधीपणाची जाणीव निर्माण करण्यातही ते तरबेज आहेत. आत्मवंचनेलाच प्रगल्भ सर्वसमावेशकता म्हटले की पुढचे काम खूप सोपे असते! तात्कालिक स्वार्थापोटी या सापळय़ात सारे मराठी नेते अलगद सापडतात. त्यामुळे मराठी नेतृत्व एकतर कायम स्वत:च्याच पोळीवर तूप ओढण्यात गर्क असते किंवा सतत देशाकरिता त्याग करण्यात पुढे असते! दक्षिणी नेत्यांना समजते तसा यातील सुवर्णमध्य कुठे आहे, हे त्यांना समजतही नाही आणि साधता तर अजिबातच येत नाही. स्वत:चा खराखुरा, मोठा, दूरगामी स्वार्थ नक्की कशात आहे हे ओळखून त्याला साजेशी मानसिकता जोवर सर्वपक्षीय मराठी नेतृत्वात येत नाही तोवर मनसबदारीच सुरू राहील, असे वाटते. -प्रसाद दीक्षित, ठाणे</p>

अस्तित्वासाठी मान तुकविणेच श्रेयस्कर ठरते

‘मनसबदारच..’ हे संपादकीय वाचले. एकीकडे ‘व्यभिचाराला थारा देऊ नका,’ म्हणायचे आणि दुसरीकडे महाभ्रष्ट पक्षांच्या यशासाठी स्वत:ची आणि आपल्या पक्षाची ताकद उभी करायची हे मनसेचे सध्याच्या काळातील धोरण झाले आहे. ‘महापुरे झाडे जाती, तिथे लव्हाळे रहाती!’ ही संतशिकवण लक्षात घेत तूर्तास तरी, दिल्लीश्वरांशी जमवून घ्यायचे धोरण मनसेने अवलंबिलेले दिसते. अस्तित्वाचा प्रश्न निर्माण होतो तेव्हा मान तुकवत मुजरा करून जीव वाचवणेच श्रेयस्कर असते.

महाराष्ट्रातील सद्य:स्थिती ‘भय इथले संपत नाही’ अशी आहे. रामदास आठवलेंचा रिपाइं, प्रकाश आंबेडकर यांची वंचित, शरद पवारांची राष्ट्रवादी, नानांची काँग्रेस आणि उद्धव ठाकरे यांची शिवसेना हे सारेच पक्ष फुटीने हतबल आणि निधीअभावी कंगाल झाले आहेत. छत्रपतींच्या काळातली घरादारावर तुळशीपत्र ठेवून ‘राजें’साठी तळहातावर शिर घेऊन लढणाऱ्या मावळय़ांची पिढी केव्हाच लयाला गेली. आता कार्यकर्ते हातावर लक्ष्मी ठेवल्याशिवाय कामालाच लागत नाहीत. त्यांनाही माहीत असते की नेते ‘खोके’ घेऊन येतात, त्यामुळे त्यातले आपल्याला काय मिळवता येईल, याचा हिशेब ते मांडतात. लढणाऱ्यांतही भाऊबंदकी कमी नाही. या पार्श्वभूमीवर आपला सवतासुभा राखत, झाकली मूठ म्हणत घेतलेला बिनशर्त पाठिंब्याचा निर्णय निश्चितच शहाणपणाचा ठरतो. -अ‍ॅड. एम. आर. सबनीस, मुंबई

विज्ञानाच्या वाटेऐवजी उलटी दिशा

‘‘देव कणा’मागचा द्रष्टा!’’ हा ‘अन्वयार्थ’ वाचला. अणूलाही वस्तुमान असते हा सिद्धांत १९६० साली मांडला जाणे, प्रचंड खर्च करून जमिनीखाली २७ किलोमीटर परिघाचा बोगदा करून ‘लार्ज हायड्रोन कोलायडर’ची निर्मिती, ६० वर्षांच्या सिद्धतेनंतर कोलायडरमध्ये दोन कणांची टक्कर, विश्वाचा भार तोलून धरणाऱ्या दैवी कणाचे अस्तित्व सिद्ध होणे; हा सारा घटनाक्रम अचंबित करणारा आहे. इंग्लंडचे पंतप्रधान भारताचे जावई असल्याचा जसा अभिमान व्यक्त केला जातो, तसाच या दैवी कणाविषयीच्या संशोधनात भारतीय वंशाचे शास्त्रज्ञ सत्येंद्रनाथ बोस यांचा सहभाग असल्याबद्दलही वाटला पाहिजे. विज्ञाननिष्ठ संस्कृती निर्माण होणे गरजेचे आहे, मात्र सध्या विज्ञानाच्या वाटेने जाण्याऐवजी उलटय़ा दिशेने वाटचाल सुरू आहे.  -किशोर बाजीराव थोरात, नाशिक

विज्ञानाविषयी अनास्था वाढत आहे

‘देव कणा’मागचा द्रष्टा!’ हा ‘अन्वयार्थ’ वाचला. या तथाकथित ‘देव कणा’चे वा ‘गॉड पार्टिकल’चे खरे मूळ नाव ‘हिग्स बोसॉन’ असे आहे, पण ‘जिथे विज्ञान संपते, तिथे अज्ञान अध्यात्म सुरू होते’, असा छद्मवैज्ञानिक विचार डोक्यात घट्ट रुजलेले अनेक जण त्याला खरेच देव कण समजू लागले. भारतीय समाजात वैज्ञानिक दृष्टिकोनाचा अभाव आहे, हे एक कारण तर आहेच, पण दुसरे कारण म्हणजे आपल्याकडे आजच्या आधुनिक विज्ञानातील प्लास्टिक सर्जरी, टेस्ट टय़ूब बेबीपासूनचे सगळेच शोध आधीच लागलेले होते, असा पूर्वजांचा पोकळ िडडिम वाजविण्याकडे असलेला कल हेही आहे. त्यामुळे भलेही आपली अस्मिता सुखावत असेल, पण प्रश्न मात्र कधीही पडत नाहीत आणि संशोधनही होत नाही, नोबेल मिळणे दूरच. म्हणून भारतात विज्ञान खुरटलेले आहे.

आणखी एक महत्त्वाचे कारण म्हणजे गेल्या दहा वर्षांत वाढलेली सरकारी अनास्था. याच काळात अनेक विज्ञान संस्थांच्या अनुदानात कपात केली गेली. पंतप्रधानांसाठी असलेले विज्ञान सल्लागार मंडळ बरखास्त केले गेले. विज्ञान संशोधनावरील खर्चासाठी हात आखडता घेतला गेला. त्याऐवजी राम मंदिर, कुंभमेळा, आयुर्वेदानुसार गोमूत्रावर संशोधन, सेंट्रल विस्टा, सरदार पटेल यांचा पुतळा बांधण्यासाठी खर्च केला गेला. परिणामी तरुण पिढीत वैज्ञानिक दृष्टिकोन विकसित होण्याऐवजी ती दैववादी झाली. धर्माध भपकेबाजपणात मश्गूल झाली. याउलट पाश्चात्त्य देश विकसित झाले. कारण तेथील सरकारांनी, विद्यापीठांनी आणि उद्योजकांनीही संशोधनावर सढळ हस्ते खर्च केला. प्रयोगशीलतेला पोषक वातावरण तयार केले. आपल्याकडे असे घडेल तो सुदिन! –  जगदीश काबरे, सांगली

हे व्यवस्थेचे बळी

सांडपाण्याच्या टाकीत गुदमरून चार कामगारांचा मृत्यू होणे अमानुष आहे. व्यवस्थेने बळी घेतलेले हे तिशीच्या आतील चारही तरुण देशातील वाढत्या बेरोजगारीचे निदर्शक आहेत. सफाई कामगारांना ऑक्सिजनचा फेस मास्क वापरणे बंधनकारक केले पाहिजे. आरोग्याची नियमित चाचणी केली जाणे आणि विनामूल्य औषधोपचार हा त्यांचा अधिकार आहे.

तुंबलेल्या गटारात कामगाराला उतरविणे हा दखलपात्र गुन्हा मानला पाहिजे. शौचालये बांधली गेली; परंतु पाण्याची आणि मैल्याची विल्हेवाट लावण्याची सोय नसलेल्या ठिकाणी गैरसोय वाढली. मात्र सरकार आणि प्रशासनात केवळ मान डोलावणारे भरलेले आहेत, त्यामुळे केंद्राकडून येणाऱ्या योजनांतील त्रुटी दाखविण्यासाठी लागणाऱ्या धैर्याची अपेक्षा करणे व्यर्थ आहे. –   प्रभा पुरोहित, जोगेश्वरी (मुंबई)

निमंत्रण नाकारणे म्हणजे अवमान नव्हे!

‘काँग्रेसने रामाचा अवमान केला’ ही बातमी (लोकसत्ता, १० एप्रिल) वाचली. काँग्रेसने अयोध्येतील राम मंदिराच्या उभारणीमध्ये अनेकदा अडथळे आणण्याचा प्रयत्न केला, प्राणप्रतिष्ठा सोहळय़ाचे निमंत्रण नाकारून त्यांनी प्रभू श्रीरामाचादेखील अवमान केला आहे, असा धादांत खोटा आरोप करून राजकारणात श्रीरामांना आणून मतांच्या जोगव्यापायी ध्रुवीकरणाचा मतलबी डाव मोदी खेळत आहेत! ते सत्यवचनी प्रभू श्रीरामाचे नाव घेतात खरे, परंतु वारंवार असत्य बोलतात. मंदिराचे काम अपूर्ण असतानाही लोकसभा निवडणूक डोळय़ांसमोर ठेवून प्राणप्रतिष्ठेचा घाट घातला गेला. चारही पिठांच्या शंकराचार्यानीही नापसंती व्यक्त करून निमंत्रण नाकारले होते. काँग्रेसनेही केवळ राजकीय हेतूने प्रेरित असलेल्या या सोहळय़ाचे निमंत्रण नाकारले होते. याचा अर्थ रामाचा अवमान नव्हे!  -श्रीकांत जाधव, अतीत (सातारा)

भूतदया केवळ बोलण्यापुरतीच

‘पेट केअर सेंटरमध्ये श्वानांना मारहाण’, हे वृत्त (लोकसत्ता ११ एप्रिल) वाचले. सारासार विचार करण्याची, कुवतच नष्ट झाल्याचे हे लक्षण आहे. मध्यंतरी डोंबिवली येथील पाळणाघरात लहान मुलांना, फरफटत नेतानाची दृश्ये पाहिली. हा निर्दयपणाचा कहर आहे. कुत्र्याचे मालक बाहेरगावी जाताना पाळीव कुत्र्यांना पेट केअर सेंटरमध्ये ठेवतात. पण तिथे कुत्र्यांना अमानुष मारहाण होत असेल तर, काय करायचे? भूतदया वगैरे तत्त्वे केवळ नावापुरतीच उरली आहेत की काय, असा प्रश्न पडतो. –  गुरुनाथ मराठे, बोरिवली (मुंबई)

लेखकाची दिलगिरी

‘लोकसत्ता’मध्ये गुरुवार, ११ एप्रिल २०२४ रोजी प्रकाशित झालेल्या ‘फुले आंबेडकरांचा जाती-अंत विचार’ या लेखामध्ये नजरचुकीने महात्मा जोतिबा फुले यांचे जन्मवर्ष १८२७ ऐवजी १८२३ झाले आहे. तसेच डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे जन्मवर्ष १८९१ ऐवजी १८८९ झाले आहे. तसेच फुले कालवश झाले तेव्हा बाबासाहेब तीन वर्षांचे होते, असा चुकीचा उल्लेख आहे. वास्तविक महात्मा फुले यांचे निधन (२८ नोव्हेंबर १८९०) झाल्यानंतर पाच महिन्यांनी बाबासाहेबांचा जन्म (१४ एप्रिल १८९१) झाला. लेखात काही ठिकाणी ‘धम्म’ या शब्दाऐवजी ‘धर्म’ असा उल्लेख झाला आहे. कृपया वाचताना हा बदल ध्यानात घ्यावा, ही नम्र विनंती. अनवधानाने झालेल्या चुकीबद्दल क्षमस्व! –  प्रसाद माधव कुलकर्णी