‘वलयकोषातला आत्मानंदी…’ हे संपादकीय (१० डिसेंबर) वाचले आणि माझ्या बँकेतील नोकरीचा एक अनुभव आठवल्याशिवाय राहिला नाही. शाखा प्रबंधक म्हणून एका शाखेत काम करत होतो. एक दिवस आमच्या झोनल मॅनेजरचा फोन आला, ‘तुमच्या ब्रांचला एक ऑफिसर पाठवत आहे. त्याला सांभाळून घ्या.’ ‘त्याला सांभाळून घ्या’ वाक्याने काय समजायचं ते समजलो. तो ऑफिसर आला अन् तीन-चार दिवसांतच लक्षात आलं की, त्याला काही येतच नव्हते. साहेबांना फोन केला तर ते म्हणाले, ‘मला माहीतेय. पण त्याला अॅडजस्ट करावंच लागेल. आपले मुंबई हेड ऑफिसला बसणारे अमूक तमूक जनरल मॅनेजर आहेत ना, त्यांच्या तो नात्यातला आहे.’
फर्नाडो सांतोस यांना लवकरात लवकर भारतात बोलावून त्यांचा जाहीर सत्कार करण्याकरिता कदाचित बरेच पुढे येतीलही कारण त्यानिमित्ताने का होईना, सत्कारकर्त्यांना प्रकाशझोतात येण्याची संधी नक्कीच मिळेल. पण इथे आल्यावर जर त्यांनी इथल्या कुणा ‘ख्रिस्तियानो रोनाल्डो’ला (असला खेळाडू आपल्या देशात पैदा होणे दुर्मीळच) साइड लाइनच्या बाहेर बसवण्याचा मूर्खपणा (?) केला तर लगेचच त्या खेळाच्या राष्ट्रीय पातळीवरील संस्थेच्या पदाधिकाऱ्याचा फोन घणघणल्याशिवाय राहणार नाही. कारण तो पदाधिकारीही देशाची धुरा सांभाळणाऱ्यांपैकीच कुणाचा न कुणाचा ‘नात्या’तला असतोच. थोडक्यात काय तर, संपादकीयात लिहिल्याप्रमाणे, व्यक्तिपूजा आणि वलयासक्ती मुरलेल्या आणि ‘वर’च्या कुणाचा तरी वरदहस्त असणाऱ्यांचा सुळसुळाट असलेल्या आपल्या देशात एकच काय पण हजारो ‘फर्नाडो सांतोस’ रोनाल्डोसारख्यांना (असेलच तर) योग्य वेळी त्यांची ‘जागा’ दाखविण्यात अपयशी ठरल्याशिवाय राहणार नाही.
– विनोद द. मुळे, इंदौर (म.प्र.)
आपल्याकडे ‘सांतोस’ असतीलही, पण..
‘वलयकोषातला आत्मानंदी..’ हे संपादकीय (१० डिसेंबर) सध्याच्या फुटबॉल फीवरला तडका देणारे आहे. स्वत:साठी खेळणाऱ्या रोनाल्डोला पोर्तुगाल फुटबॉल संघाचे प्रशिक्षक फर्नाडो सांतोस यांनी वगळले आणि त्याच्याशिवाय तो संघ उपांत्यपूर्व फेरीत दाखल झाला याचे कौतुक आहे. पण त्याची तुलना आपल्या टी-२०च्या संघाशी करणे पटत नाही. कारण आपल्या देशात क्रिकेट हे जनतेच्या रक्तात भिनले आहे आणि त्यामुळेच उत्तम कामगिरी (अगदी एकदाच तरीही) करणारा क्रिकेटपटू जनतेच्या गळय़ातला ताईत बनतो. त्यामुळे क्रिकेट मंडळही या ताईतांना वागवत असते. सांतोससारखे प्रशिक्षक आपल्याकडे असतीलही पण त्यांच्या सूचना मंडळ मान्य करणार का?
– माया हेमंत भाटकर, मुंबई
खेळाडू नाही, खेळच मोठा
‘वलयकोषातला आत्मानंदी..’ हे संपादकीय आवडले. कोणत्याही खेळातला खेळाडू देशातर्फे खेळतो तेव्हा त्याने स्वत:साठी नव्हे तर देशासाठीच प्रामाणिकपणे खेळले पाहिजे. रोनाल्डोला खेळाबाहेर काढून सांतोस यांनी त्याला व सर्वच खेळाडूंना देशापेक्षा व खेळापेक्षा कोणीही श्रेष्ठ नाही हा घालून दिलेला आदर्श धडा आहे असे वाटते.
– डॉ. राजेंद्रकुमार गुजराथी, दोंडाईचा, धुळे
राजकारण्यांवर खर्च होतो, त्याचे काय ?
भाजपा आमदार चंद्रकांत पाटील यांनी शिक्षण संस्थांबाबत केलेल्या विधानाची बातमी वाचली. फुले-आंबेडकर, कर्मवीर भाऊराव पाटील यांनी भीक मागून नाही तर लोकवर्गणी व मेहनतीच्या पैशातून शाळा उभ्या केल्या आणि चालविल्या. महात्मा जोतीराव फुले यांनी रात्रंदिवस अखंड श्रम करून पैसा उभा केला. ‘फुले-आंबेडकरांनी भीक मागून शाळा चालू केल्या होत्या. अनुदानावर अवलंबून का राहता?’ म्हणणारे भाजपा आमदार चंद्रकांतदादा पाटील स्वत:सह सर्व भाजपा आमदार यांना मिळणारे विविध भत्ते, सवलती, सुविधा, निवृत्तिवेतन बंद करतील का? शिक्षक २००५ पासून जुन्या पेन्शनसाठी लढत आहेत. पण चंद्रकांत पाटील यांच्यासारखे राजकारणी पाच वर्षांसाठी निवडून आल्यानंतर पेन्शन उपभोगत आहेत. तसेच शिक्षणाची जबाबदारी सरकारची आहे, सरकार जनतेवर उपकार करत नाही. लोकांनी भरलेल्या करांमधून गोळा झालेला पैसा लोकांसाठी वापरते. राजकारण्यांच्या सवलती व निवृत्तिवेतनाचा खर्च लोकांच्या पैशांमधूनच चालतो.
-प्रा. जयवंत पाटील, भांडुप, मुंबई
अशा वितंडवादातून काहीच साधत नाही
गेले काही दिवस कोणी ना कोणी महापुरुषांविषयी बेताल वक्तव्य करते आणि विरोधी गटातील नेते त्यावर आणखी आक्रमक प्रतिक्रिया देतात. यातून काहीच निष्पन्न होत नाही उगा वितंडवाद काही दिवस चालतो. नुकतेच उच्च व तंत्रशिक्षणमंत्री चंद्रकांत पाटील यांनी पूर्वीच्या समाजसुधारकांनी सरकारवर अवलंबून न राहता भीक मागून शाळा चालवल्या असे वक्तव्य केल्याने वाद निर्माण झाला. त्यांनी दान शब्दप्रयोग केला असता तर विरोधकांना संधी मिळाली नसती. पण बोलण्याच्या नादात चुकीचा शब्द वापरला आणि टपून बसलेल्या विरोधकांना आयतेच कोलीत मिळाले.
पूर्वी अनेकांनी माधुकरी (म्हणजेच काही मोजक्या घरी भिक्षा मागणे) मागून आपल्या शैक्षणिक गरजा भागवल्या. आचार्य विनोबा भावे यांनी भूदान चळवळीसाठी जमीन दान मागितली आणि अनेक भूमिहीनांना ती दान केली त्या वेळी त्यांचे वक्तव्य होते ‘मी दान नव्हे, गरिबांचा हक्क मागतो आहे आणि मी भिक्षा नव्हे तर दीक्षा द्यायला आलो आहे’ भरपूर जमीन असूनही जे छोटासा तुकडा द्यायचे अशांकडून आचार्य जमीन घेत नसत तर जे मोठा हिस्सा आपणहून द्यायचे त्यांची जमीन ते दान घ्यायचे. तेलंगणातील एका खेडय़ातील रामचंद्र रेड्डींनी तर १०० एकर जमीन दान केली. अगदी पाकिस्तानातूनही त्यांना भरपूर जमीन दान मिळाली. मथितार्थ प्रत्येक वक्तव्याचा विपर्यास करू लागल्यास मुख्य आर्थिक प्रश्नांकडे दुर्लक्ष होऊन समाजहिताची कार्ये कशी पार पडतील? जनतेनेही अशा उपद्वय़ापी उसकावण्यापासून दूर राहून दुर्लक्ष केल्यास वेळ सत्कारणी लागेल असे मला वाटते.
– सतीश मुक्ताबाई सीताराम कुलकर्णी, माहीम, मुंबई
ही वृत्ती मराठीत कधी येईल?
‘हसण्यावारी हुकूमशाही’ आणि ‘शब्दकोशाची महाशक्ती’ हे बुकमार्क (१० डिसेंबर) सदरातले दोन्ही लेख रंजक, रोचक आणि वाचनीय आहेत. पहिल्या लेखात असलेली उच्चपदस्थ व्यक्तींना विनोद विषय करण्याची खेळकर वृत्ती व प्रवृत्ती आपल्या देशातल्या राजकीय पटलावर वावरणाऱ्या अगणित व्यक्तींच्या बाबतीत हरघडी दिसते. मात्र ती लिखित स्वरूपात कमी आणि मौखिक स्वरूपात विपुल आहे. ओईडीच्या निमित्तानं इंग्रजी भाषेत असलेली दक्षता, तत्परता आणि जागरूकता आपल्या मायबोली मराठीत यायला अजून किती वर्ष लागतील हे सांगता येणं कठीण आहे. घरोघरी बोलल्या जाणाऱ्या मराठी शब्दांचे मराठीतच अर्थ सांगणारे शब्दकोश आज किती घरांमधे आढळतील? इंग्रजी शब्दांचे मराठी किंवा इंग्रजीत अर्थ सांगणारे शब्दकोश बाळगण्याचा सोस मात्र घरोघरी दिसून येईल. ही अनास्था जेव्हा संपेल तो मराठी भाषेसाठी सुदिन असेल.
– प्रा विजय काचरे, कोथरुड, पुणे
भाजपचा गुजरात विजय आश्चर्यकारक नाही!
‘२०२४ साठी गिरवायचा धडा!’ हा योगेंद्र यादव यांचा लेख (९ डिसेंबर) वाचला. भाजप प्रत्येक निवडणूक गंभीरपणे लढवतो. काँग्रेसचे नेते मात्र एखादा चमत्कार घडण्याची, राहुल गांधींची छाप पडण्याची वाट पाहत बसतात. गुजरात निवडणुकीची रणनीती २०२४ ची लोकसभा निवडणूक नजरेसमोर ठेवून आखण्यात आली होती. तिथल्या मतदारांनी नरेंद्र मोदींना डोळय़ांसमोर ठेवूनच पुन्हा एकदा भाजपला सत्तापदी बसविले. हिमाचल प्रदेशचा निकाल मात्र ‘काँग्रेसमुक्त भारत’ला धक्का देणारा ठरला. गुजरातच्या विजयात आश्चर्य वाटण्यासारखे काही नाही.
– सुनील समडोळीकर, कोल्हापूर
पर्याय देणाऱ्यांकडे सातत्य हवे..
‘पर्यायास पर्याय नाही’ या अग्रलेखात (९ डिसेंबर) राजकीय पक्ष आणि राजकीय स्थिती याबद्दलचे व्यक्त केलेले विचार यथायोग्य आहेत. आपल्या देशाला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर पुढे अनेक वर्षे काँग्रेस पक्षाला पर्याय उपलब्ध नव्हता. पुढे आणीबाणी जाहीर करण्याच्या काँग्रेस पक्षाच्या भूमिकेविरुद्धचा असंतोष म्हणून जनता पक्षाची स्थापना झाली आणि देशातल्या तमाम मतदारांना पर्याय उपलब्ध झाला. अटलबिहारी वाजपेयी यांच्या पंतप्रधान पदाच्या कारकीर्दीनंतर २०१४ या वर्षी मोदी यांच्या नेतृत्वाखालील भारतीय जनता पक्षाचा सशक्त पर्याय देशातल्या जनतेला उपलब्ध झाला. विविध राज्यांमध्येदेखील वेळोवेळी सत्तेत असणाऱ्यांविरुद्ध मतदारांनी पर्याय निवडले. त्यामुळे ‘पर्यायाला पर्याय नाही’ हे प्रतिपादन अगदी योग्य आहे. मात्र प्रस्थापित राज्य कर्त्यांविरुद्ध पर्याय उभा करावयाचा असल्यास पर्यायी राजकीय पक्षाच्या धोरणांमधे सातत्य असावे आणि धरसोडीची वृत्ती नसावी. महाराष्ट्रातदेखील संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीच्या वेळी संयुक्त महाराष्ट्र समितीच्या रूपाने पर्याय पुढे आला होता. जुन्या काळात काँग्रेसला पर्याय नव्हता तेव्हा काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि माजी विधानसभा अध्यक्ष बाळासाहेब भारदे प्रचार सभांमध्ये एक मजेशीर वाक्य वापरत असत. हे वाक्य असे होते, ‘जनसंघाच्या पूजा अर्चा, शिवसेनेच्या भाले बरच्या, समाजवाद्यांच्या फक्त चर्चा आणि काँग्रेसला मात्र खुर्च्या.’
-अॅड. सुरेश पटवर्धन, कल्याण</p>