गिरीश कुबेर

युरो कपच्या अंतिम सामन्यात रविवारी स्पेनचा विजय झाला तर इथली हिरवळ थरारेल! अर्थात, जगातल्या सर्वच नामवंत फुटबॉलपटूंनी कधी ना कधी इथं सराव केलेला आहे; पदलालित्यानं सामने जिंकलेले आहेत...

लंडनमध्ये विम्बल्डनलॉर्डस्, पॅरिसला रोलाँ गॅरॉस अशा काही तीर्थस्थळांना भेट दिल्यानं आनंदाच्या खात्यात जमेच्या बाजूत घसघशीत वाढ होत असते. माद्रिदला जाऊन रेआल माद्रिदच्या स्टेडियमला भेट दिल्यावरही हे खातं एकदम टम्म फुगतं. यंदा तर या क्लबनं चॅम्पियन्स चषक जिंकलेला. त्यात आम्ही तिथं पोहोचलो तो नेमका रविवार. त्यामुळे तिथं फुटबॉलकऱ्यांची ही उत्साही गर्दी. ब्रूस ली, जॅकी चॅन वगैरेंचे सिनेमे पाहून परतताना बऱ्याच जणांना आपल्यालाही ज्युडो कराटेत गती आहे असं वाटतं आणि हे गावठी ब्रुस ली जिन्याच्या भिंती बुक्के मारत जसे उतरतात तसं माद्रिदमध्ये स्वत:च्या पायांवर उभ्या असलेल्या अनेकांना आपणही सुरेल लाथा मारू शकतो असं वाटत असावं. त्यात स्वत:च्या पोराबाळांसमवेत आलेल्यांचा उत्साह तर पाहायलाच नको! अनेकांच्या या पदलीला पाहताना गंमत वाटत होती. त्यातल्या अनेकांच्या अंगात आवडत्या फुटबॉलपटूंच्या फ्लूरोसंट रंगातल्या जर्सी. वातावरणात कमालीचा शब्दश: ‘खेळकर’पणा.

आणि अवाढव्य आकाराच्या सुमो पैलवानांनी काही चिमुरड्यांना सहज अंगाखांद्यावर खेळवावं तसं हे स्टेडियम. ‘आ वासणं’ या शब्दप्रयोगाचा वाक्यात उपयोग करायचा असेल तर त्यासाठी हे स्टेडियम उत्तम. स्टेडियम म्हटलं की एक मर्यादित आकार-उकार आपल्या डोळ्यासमोर येतो. ते सर्व या स्टेडियमसमोर सहज लुटुपुटुचे वाटतील. मानेचा ९० अंशांचा कोन जरी केला तरी डोळ्यात न मावणाऱ्या अवाढव्य इमारतींप्रमाणे हे स्टेडियम. आकारानं आयताकृती. कोपरे छान मुडपलेले. स्टीलचा आयताकृती वाडगा पालथा करून ठेवल्यावर जसा दिसेल तसं हे स्टेडियम दिसतं. अशा स्टेडियमवर सामना पाहण्याचा आनंद काय असेल हा मुद्दा आहेच. पण सामना नसतानाही स्टेडियम किती प्रेक्षणीय असू शकतं ते इथं कळतं.

ते पाहण्याची सुरुवातच होते एकदम पाचव्या मजल्यावरनं. प्रत्यक्षात तो पंधरावा वगैरे मजला असेल. तिथपर्यंत गोल गोल मार्ग, मध्येच जिना चढत जायचं. इतके कष्ट करून वर पोहोचलो की मात्र आनंदच आनंद. स्वागत कक्षाच्या प्रचंड भिंतीवर भिंतीइतकाच मोठाच्या मोठा स्क्रीन. त्यावर नुकत्याच झालेल्या चॅम्पियन्स लीगमधला अंतिम सामना सुरू असतो. तो जणू काय प्रत्यक्ष घडतोय अशा रीतीनं अनेक फुटबॉलप्रेमी पाहत असतात. क्लब समर्थकांची तशीच हुरहुर आणि गोल झाल्यावर सगळ्यांचं एकदम एकत्र आनंदानं उसळणं. त्यातल्या काहींना तर सामना दृश्यरूपात पाठ होता. एक मेक्सिकन कुटुंब होतं समोर. त्यातला पुरुष आता पुढे काय घडणार… कसं घडणार असं आपल्या मुलाबाळांना उत्सुकतेनं सांगत होता. त्या प्रेक्षकांत काही काही तर सत्तरी-पंचाहत्तरीचेही असतील. आपल्या तरुणपणातल्या फुटबॉलच्या आठवणी ते जागवत होते. सहज तिथल्या कर्मचाऱ्याला विचारलं तर कळलं साधारण डझनभर देशांतले लोक तिथं त्या क्षणाला आहेत. हे सगळे देश स्पेनेतर. पण फुटबॉलची जादू अशी की त्यावरचं प्रेम रोखण्याची ताकद कुठल्याच भिंतीत नसावी. या समोरच्या ज्येष्ठांकडून एका नावाचा उल्लेख वारंवार येत होता. त्याचं भव्य पोस्टर शेजारच्या हॉलमध्ये प्रवेश केल्या केल्या समोर आलं आणि हा ज्येष्ठांचा गट स्तब्ध होऊन, भारून पाहू लागला.

ते छायाचित्र होतं सँटिआगो बर्नाब्यू यांचं. या रिआल माद्रिदच्या स्टेडियमचं मूळ नाव त्यांचंच आहे. बर्नाब्यू स्टेडियम हे याचं खरं नाव. या बर्नाब्यू यांच्या भव्य पोस्टरपासून सुरू होतो या स्टेडियमचा आणि रेआल माद्रिद क्लबचा इतिहास. म्हणजे ज्या वर्षी उडालेलं पहिलं विमान जेव्हा जेमतेम दोन वर्षांचं झालं, ज्या वर्षी थिओडोर रूझवेल्ट पहिल्या मोटारीत बसले, ज्या वर्षी ‘लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्स’ जन्माला आली आणि इकडे भारतात ज्या वर्षी स्वामी विवेकानंदांनी बेलुर मठात देह ठेवला त्या वर्षी ‘रेआल माद्रिद’चा जन्म झाला. म्हणजे आज हा क्लब साधारण १२२ वर्षांचा आहे. खरं म्हणजे हा क्लब बर्नाब्यू यांच्या आधी जन्माला आला. रेआल माद्रिद क्लब सुरू झाला तेव्हा बर्नाब्यू सात वर्षांचे होते. लहानपणापासूनच त्यांना फुटबॉलमध्ये रुची आणि ‘गती’ही होती. नंतर तर या क्लबचे अध्यक्षच बनले. त्यांच्या काळात या क्लबनं अनेकानेक विजय मिळवले. त्या सगळ्याचं कौतुक म्हणून मग स्पेनच्या सम्राटानं आपल्या डोक्यावरचा मुकुट या क्लबच्या नावचिन्हावर सन्मानानं ठेवला. आजतागायत तो तिथं आहे. वास्तविक रेआल माद्रिदनंतर अनेक फुटबॉल क्लब युरोपात आणि जगभरातही जन्माला आले. पण तरी त्या सगळ्यात रेआलचं कौतुक अजूनही टिकून आहे. एक तर ‘फिफा’च्या आधी दोन वर्षं रेआल माद्रिद जन्माला आला. फिफा ही जागतिक फुटबॉल संघटना जन्माला येण्यात रेआलचा वाटा आहे. आणि दुसरं असं की अन्य युरोपीय क्लब्जप्रमाणे रेआलची मालकी कोणा धनिकाकडे वा सौदी राजपुत्राकडे वगैरे नाही. क्लबचे सदस्यच क्लबचे मालक. आज फिफाकडून जगातला सर्वोत्कृष्ट क्लब म्हणून रेआल गौरवला गेलाय. त्याच्या या आधुनिक उभारणीत बर्नाब्यू यांचा मोठा वाटा. त्यांच्या गौरवार्थ या स्टेडियमला त्याचंच नाव आहे. ऐन दुसऱ्या महायुद्धकाळात बर्नाब्यू या क्लबचे अध्यक्ष झाले आणि मग त्यांनीच या स्टेडियमची उभारणी मनावर घेतली.

त्याचा देदीप्यमान इतिहास इथं येणाऱ्या प्रत्येकाला भारावून टाकेल अशी सगळी व्यवस्था. या क्लबनं जिंकलेल्या तीनेक डझनभर ट्रॉफ्या, त्या त्या सामन्यांची क्षणचित्रं दाखवत राहणारे स्क्रीन्स, मोठमोठ्या खेळाडूंनी घातलेल्या जर्सीज, त्यांचे शूज, माद्रिदच्या खेळाडूंनी बक्षिसांत जिंकलेले सुवर्ण चेंडू… आणि त्या प्रत्येकामागची गोष्ट सांगणाऱ्या तळटिपा असं बरंच काही इथं आहे. ते पाहत पाहत आपण खाली उतरत जातो. एके ठिकाणी तर कमालच म्हणायची. नाटकाच्या रंगमंचावर जशा विंगा असतात तशा त्या पॅसेजच्या दोन्ही बाजूंना विंगा. म्हणजे उभे स्क्रीन्स. लांबून पाहिलं तर या सगळ्या स्क्रीन्सची एक अखंड भिंतच दिसते. प्रत्यक्षात तसं नाही हे पुढे गेल्यावर कळतं. आणि मग आपण जेव्हा त्या विंगेतनं जाऊ लागतो तेव्हा त्या वेळी त्या ‘स्क्रीन्स’वर सुरू असलेल्या सामन्यांत जणू प्रत्यक्ष चाललोय असा लांबनं पाहणाऱ्याला भास होतो. कधी या स्क्रीन्सवर टोनी क्रूस, रोनाल्डो, पेपे, बेकहॅम, ओझील, रॉबर्टो कार्लोस वगैरे खेळाडू असतात तर कधी त्यांचे काही सामने सुरू असतात. फुटबॉलच्या विश्वात काल आणि आज जे जे अचंबित करणारे खेळाडू होऊन गेले वा आहेत ते कधी ना कधी या क्लबच्या वतीने खेळलेले आहेत. त्यामुळे या क्लबचा इतिहास म्हणजे फुटबॉलचं तारांगणच.

आणि तो इतका रम्यपणे सादर केलाय की ते ना मिरवणं वाटतं ना तो कंटाळवाणा वाटतो. एका दालनात तर भव्य उभ्या स्क्रीन्सवर या सगळ्या खेळाडूंच्या त्रिमिती वाटाव्यात अशा प्रतिमा हालचाल करत असतात. अर्थातच हे दालन म्हणजे सेल्फी दालन बनून गेलेलं. हे असं सगळं पाहत पाहत, हातातलं घड्याळ बंद पडल्याचा अनुभव घेत घेत आपण खाली येतो. आणि मग ती हिरवळ दिसते. मग आपल्याला हुरहुर लागते ती हे आयताकृती फुटबॉल मैदान पाहण्याची. ते संपूर्ण फक्त मैदान डोळ्यात मावतं आणि ते पाहून हरखून गेलेले प्रेक्षक मिळेल त्या खुर्चीवर बसतात आणि मग जाणवते एकदम निर्माण झालेली शांतता. कारण या खुर्चीतल्या प्रेक्षकांच्या मनात सुरू झालेला असतो त्यांना आवडलेला एखादा सामना. तो ‘पाहण्यात’ ते काही क्षण का असेना पण दंग होऊन गेलेत ही ती शांतता सांगून जाते. या एवढ्या प्रचंड स्टेडियमला छत आहे. प्रसंगी ते बंदिस्त करता येतं. ते पाहिल्यावर आठवतं क्रिकेट हा धर्म वगैरे असलेल्या देशात एकही असं छत असलेलं स्टेडियम अजूनही नाही. असो.

या स्टेडियमच्या शेवटच्या दालनात एका भिंतीवर तरुण मुलामुलींची छायाचित्रं आहेत. शेजारी माहिती. आपण ती उत्सुकतेनं पाहायला जातो. रेआल माद्रिद उद्याच्या फुटबॉलपटूंना घडवणारी अकादमी चालवतं. आजच्या घडीला या अकादमीनं घडवलेले तब्बल १८० फुटबॉलपटू विविध देश, क्लब यांच्याकडनं आपलं नाव काढतायत. समोरची यादी उद्या नावं काढणाऱ्यांची. यात जगातल्या जवळपास सर्व देशांतले खेळाडू आहेत.

पण त्यात एकही भारतीय नाही.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

एव्हाना त्याची काही खंत आपल्याला वाटत नाही. कारण आपण जे काही अनुभवलं त्यानं एखाद्या विजयाच्या भव्य मिरवणुका, खेळाडूंवर होणारा दौलतजादा याच्यापलीकडचा आनंद आपल्याला दिलेला असतो. उद्याच्या रविवारी ‘युरो कप’च्या अंतिम सामन्यात स्पेन विजेता ठरला तर बर्नाब्यूतून हा आनंद स्पेनभर पसरेल.