किशोरवयीन ज्यू मुलीने अनुभवलेला दुसऱ्या महायुद्धातील अज्ञातवासाचा काळ ‘द डायरी ऑफ अ यंग गर्ल – अॅन फ्रँक’ने जगासमोर आणला. पण ज्या देशाने या युद्धाचा सर्वाधिक क्रूर चेहरा पाहिला, त्या जपानमधल्या भारतीय किशोरवयीन मुलीची डायरी – ‘द वॉर डायरी ऑफ आशा सान’ महत्त्वाची ठरते. त्यात अॅन फ्रँकच्या डायरीसारख्या दैनंदिन नोंदी नसल्या, तरीही जपानने महायुद्धात काय भोगले, हे जाणून घेण्यासाठी तो उत्तम संदर्भठेवा ठरतो. हे पुस्तक लिहिणाऱ्या आशा सहाय नुकत्याच निवर्तल्या.

आशा सहाय चौधरी या मूळच्या भारतीय वंशाच्या, जपानमध्ये जन्मल्या, वाढल्या. दुसऱ्या महायुद्धात तो देश बेचिराख होताना त्यांनी पाहिला. एकीकडे महायुद्ध शिगेला पोहोचलेले आणि दुसरीकडे मायभूमीत स्वातंत्र्यासाठी अटीतटीचा लढा सुरू होता. जपानमध्ये स्थायिक भारतीयांच्या घरांतही स्वातंत्र्यलढ्याच्या चर्चा सुरू असत. किशोरवयीन आशाची नेताजींशी भेट झाली आणि ती ‘आझाद हिंद फौजे’च्या ‘झाशीची राणी रेजिमेंट’मध्ये भरती झाली. तिथे तिला नवी ओळख मिळाली- लेफ्टनन्ट भारती आशा सहाय.

आशाचे वडील आनंद मोहन सहाय नेताजींचे निकटवर्तीय आणि आझाद हिंद सरकारात कॅबिनेट मंत्री होते. ते १९२० मध्ये भारत सोडून जपानमध्ये स्थायिक झाले. तिची आई सती सेन ही देशबंधु चित्तरंजन दास यांची पुतणी. जपानवर अमेरिकेचे बॉम्बहल्ले सुरू असताना आणि पती गोपनीय मोहिमांवर असताना सती यांनी आपल्या तीन मुलांना खंबीरपणे वाढवले. आशा त्यांची थोरली मुलगी. तिने भारतातील ब्रिटिशांच्या अनन्वित अत्याचारांच्या कहाण्या ऐकल्या होत्या. नेताजी भारतात आल्यानंतर त्यांची भाषणे ऐकली होती. त्यामुळे ब्रिटिशांविरुद्ध लढण्याची जिद्द बळावली आणि वयाच्या सतराव्या वर्षी ती झाशीची राणी रेजिमेंटमध्ये भरती झाली.

आशा यांच्या डायरीत १९४३ सालापासूनच्या नोंदी आहेत. त्यात युद्धाने बेचिराख झालेल्या जपानची वर्णने आहेत. नेताजींच्या नेतृत्वगुणांचे दाखले आहेत. महायुद्ध काळातील अन्नधान्यांच्या टंचाईची, भुकेची तीव्रता काय असेल, याची कल्पना हे पुस्तक देते. रेशनवर मिळणारा भोपळा आणून तो उकडून खाऊन किंवा बटाटे खाऊन कित्येक महिने गुजराण केल्याचे, आईने घरातील एखादी चादर किंवा बेडशीट देऊन त्या मोबदल्यात तांदूळ आणल्याचे उल्लेख या पुस्तकात आढळतात. अशाही स्थितीत आईला नेताजींनी पैसे हवे आहेत का, असे विचारले असता, तिने नकार दिल्याची आठवण त्यांनी यात नोंदवून ठेवली आहे. आशा यांना सैन्य प्रशिक्षणासाठी तैवानमार्गे थायलंडला पाठवण्यात आले तेव्हा त्या प्रवासात अमेरिकी विमानाने केलेला पाठलाग, त्यातून निसटून सुखरूप पोहोचण्याचा थरार याची कथाही यात जाणून घेता येते.

महायुद्ध आणि स्वातंत्र्ययुद्धाच्या काळातली कणखर स्त्रीशक्तीचे प्रत्यंतर या डायरीतून येते. नेताजींच्या भेटीला निघालेल्या आईचा सीआयडीने केलेला पाठलाग, रंगूनमधल्या महिलांनी आझाद हिंद सेनेसाठी (आयएनए) नेताजींच्या स्वाधीन केलेले सोन्याचे दागिने, आयएनएच्या वैमानिकांना आपल्या घरात लपण्यासाठी आश्रय देणारी आई असे प्रसंग त्या काळातील महिलांची भूमिका अधोरेखित करतात.

नेताजी सुभाषचंद्र बोस यांचे विचार, त्यांच्या सहकाऱ्यांकडून असलेल्या अपेक्षा, त्यांच्या व्यक्तिमत्त्वाचे पैलू आणि त्यांचा गूढ मृत्यू व त्यानंतरचा घटनाक्रम याविषयीचे आशा यांचे स्वानुभव वाचण्याची संधी या पुस्तकातून मिळते. आशा यांचे शालेय शिक्षण जपानमध्येच झाल्यामुळे त्यांची पहिली भाषा जपानी होती. ‘द वॉर डायरी ऑफ आशा सान’ हे मूळ पुस्तक जपानी भाषेत असून तन्वी श्रीवास्तव यांनी त्याचा इंग्रजीत अनुवाद केला आहे. पुस्तकात आशा यांचे भारत आणि जपानविषयीचे प्रेम आणि लढाऊ वृत्ती प्रतिबिंबित होते. त्या १९४८ नंतर भारतात राहू लागल्या. त्यांच्या जाण्याने आझाद हिंद सेनेचे कार्य अनुभवलेल्या आणि महायुद्धाचा क्रूर चेहरा पाहिलेल्या पिढीचा एक महत्त्वाचा दुवा निखळला…