मानवी भावना समजून घेण्याची क्षमता यंत्रांमध्ये अंतर्भूत करणे अशक्यप्राय वाटत असले तरी अथक परिश्रमांमधून संशोधकांनी साहाय्यभूत ठरतील असे काही मार्ग शोधले आहेत.
अमूर्त भावना व त्यांचे चढ-उतार समजण्यासाठी भावनांची तीव्रता संख्येने दर्शवली जाते. या संख्या सिग्माइड फलाचा (इंग्रजीमधील एस आकाराच्या फलाचा) वापर करून आलेखित करता येतात. या फलाच्या सद्य व पूर्वीच्या किमतीवरून भावनांच्या चढ-उतारांची अंकीय प्रारूपे यंत्राला समजू शकतात.
मानवी भाषेतून व्यक्त होणाऱ्या भावना समजून घेण्याची नैसर्गिक भाषा प्रक्रिया (नॅचरल लँग्वेज प्रोसेसिंग) ही पद्धत कृत्रिम बुद्धिमत्तेने बऱ्याच अंशी आत्मसात केली आहे. चॅटबॉटसारखे यंत्रसाहाय्यक आपले बोलणे समजू शकतात. चेहऱ्यावरील भाव समजणारी यंत्रेही आता तयार होत आहेत. अर्थात सर्वच भावना माणसे बोलून व्यक्त करत नाही. त्यामुळे मानवाची विचार प्रक्रिया जाणून घेणे गरजेचे आहे.
कृत्रिम बुद्धिमत्तेत कृत्रिम चेतापेशींचे जाल (न्यूरल नेटवर्क) वापरले जाते. हे मानवाच्या मेंदूतील घडामोडींशी काही अंशी साधम्र्य साधते. या क?त्रिम चेतापेशीच्या जोडण्यांचे अनेक थर असणारे जाल यंत्राला स्वयंशिक्षण देण्यात आणि अधिकाधिक अचूकतेच्या जवळ जाणारी उत्तरे अनुभवातून शोधण्यात साहाय्यक ठरत आहे.
पारंपरिक मशीन लर्निग पद्धतीत यंत्राला शिकवण्याकरता मोठय़ा प्रमाणावर माहिती पुरवावी लागते. माहितीबरोबर माहितीची वैशिष्टय़े सांगणाऱ्या माहितीपट्टय़ासुद्धा (लेबल्स) पुरवाव्या लागतात. या माहितीपट्टय़ांचा अभ्यास करून यंत्रे माहितीचे विश्लेषण करणे शिकतात. परंतु या देखरेखीखाली शिकण्याच्या पद्धतीहून (सुपरवाइज्ड लर्निग) अधिक परिणामकारक अशा मेटा लर्निग पद्धती आता उपलब्ध आहेत. त्यांचे वैशिष्टय़ म्हणजे शिकण्याची प्रक्रिया आधीच्या अनुभवांतून अधिक प्रगत होत जाणाऱ्या पद्धती असून त्यांच्या आज्ञावल्याही निर्माण झाल्या आहेत. अगदी थोडी माहिती माहितीपट्टय़ांशिवाय पुरवली तरीही अनुभवातून या आज्ञावल्या शिकतात व स्वत:मध्ये उचित बदल घडवून आणतात. पूर्वी न हाताळलेल्या समस्याही या आज्ञावल्या हाताळू शकतात.
चांगले वागल्यावर आपण लहान मुलांना शाबासकी देतो त्याच धर्तीवर अधिक अचूक निदान करणाऱ्या आज्ञावल्यांना अधिक गुण देऊन उत्तेजन देणाऱ्या आज्ञावल्या (रीइन्फोर्समेंट पद्धत) यंत्रशिक्षणासाठी उपयुक्त ठरतात.
मानवाप्रमाणे यंत्रांनीही नीतिमत्तेचे पालन करणे अतिशय गरजेचे आहे. त्यासाठी क?त्रिम बुद्धिमत्तेचे नीतीनियम अशी नवी अभ्यासशाखाच आता विकसित होत आहे. या सर्वाचे फलित म्हणजे मनाचा सिद्धांत वापरू शकणारी यंत्रे विकसित होतील अशी आशा आहे. – प्रा. माणिक टेंबे,मराठी विज्ञान परिषद