रोजच्या दिवसाची आता एक स्वतंत्र घोंगडी आहे. तिच्या छिद्रांतून श्वास घेता आला, तर घ्यावा. कुणाला त्याला ‘ब्रेक’ म्हणायचे असेल, तर म्हणू द्यावे, आपण त्याचे अनुकरण करू नये. कुणाला त्याला ‘रिलॅक्सेशन’ म्हणायचे असेल, तरी म्हणू द्यावे, आपण त्याला जगणे म्हणू नये…

‘काळाच्या मोठ्या पटावरून ओघळलेल्या काही क्षणांमध्ये घेतलेले काही श्वास एवढंच तर असतं आपल्यासारख्या सामान्य माणसांचं आयुष्य! त्यात परत फुरसत काढून स्वस्थ बसणं म्हणजे निव्वळ आळशीपणा. अशा कंटाळ्यानं जगायचं राहून जातं.’ स्लोअर शहाणेनं कॉलेजात असताना आपल्या रोजदिनीत हे वाक्य लिहिलं, तेव्हा त्याला हे माहीत नव्हतं, की पुढच्या दीड-दोन दशकांत आळसाला ‘ब्रेक’ या संज्ञेची ऐट येणार असून, कंटाळ्याला ‘रिलॅक्सेशन’ची भव्यता येणार आहे. त्यानं अत्यंत निरागसतेनं सामान्यत्वाची व्याख्या करायचा प्रयत्न केला होता. पण, सामान्य विशेषणानंतर न चुकता येणारा मध्यमवर्ग जागतिकीकरणानंतर बहुमान्य झाला आणि सामान्य शब्दाचे मूल्यच संपले. कथा, कादंबऱ्या आणि त्याहीपेक्षा ऐंशी-नव्वदच्या दशकातील दूरदर्शनवरील मालिका यांतून रोमँटिसाइज होत राहिलेला ‘सामान्य मध्यमवर्ग’ असा सपाट वर्गीय आविष्कार, जागतिकीकरणानंतर संपन्नतेच्या उंचवटे, खाचखळग्यांतून कॉर्पोरेट पगारवाढीच्या निकषासाठी लावलेल्या ‘बेल कर्व्ह’प्रमाणे हेलकावे खाऊ लागला. सामान्य मध्यमवर्गीय माणूस असे केले गेलेले सरसकट व्यक्तीकरणही तेथेच गळून पडून कनिष्ठ मध्यमवर्गीय, सर्वसाधारण मध्यमवर्गीय, उच्च मध्यमवर्गीय, नवश्रीमंत असे कप्पेकरण अपरिहार्य झाले. हे जसे झाले, तसे आळस आणि कंटाळा यांना एक वेगळेच वलय प्राप्त होऊ लागले!

स्लोअर शहाणे लहान असताना, त्याच्या घरात जी मांजर पाळली होती, ती अत्यंत आळशी होती, असे त्याचे वडील त्याला म्हणायचे. मांजरीच्या ‘सुखी’ आयुष्याची तुलना ते त्यांच्या कष्टांशी करतात, म्हणून ते असं म्हणतात, असं स्लोअरला नेहमी वाटायचं. पण, झुरळापासून उंदरापर्यंत कोणताही कीटक वा प्राणी समोरून गेला किंवा अगदी पुढ्यात जरी आणून ठेवला, तरी त्याची शिकार न करता त्याकडे मख्खपणे पाहणारे मांजर स्लोअरच्या वडिलांना आळशी नाही, असं वाटण्याची काही शक्यताच नव्हती. समोर आलेल्या संधीकडे संधी म्हणून न पाहता खर्च म्हणून पाहण्याचा अव्यवहारी भाबडेपणा एक तर मध्यमवर्ग करू शकतो किंवा असे आळशी मांजर, असे म्हणून स्लोअरच्या वडलांनी नंतर हा विषय केवळ टिंगलीपुरता मर्यादित ठेवला. अगदी ते स्वत: लाक्षणिक अर्थानं सामान्य मध्यमवर्गीय वगैरे होते तरी.

इथे हे नमूद करायला हवे, की स्लोअरचे कुटुंब मध्यमवर्गीय वगैरे असले, तरी त्या काळाच्या, म्हणजे ऐंशी-नव्वदच्या दशकाच्या मध्यमवर्गीय व्याख्येसारखे महिन्याच्या तुटपुंज्या का होईना मासिक पगारावर अवलंबून, वर्षभराचे धान्य, महिन्याचा किराणा भरून ठेवणारे, जमेल तेवढ्या गोष्टी सवलतीत, पर्यायाने स्वस्तात खरेदी करणारे, रविवारी सुटी असलेले आणि सुटीच्या दिवशी सकाळी पॅटिस आणि संध्याकाळी भेळ वगैरे खाण्याचा शिरस्ता असलेले, अशा साचेबद्ध लक्षणांना बांधील नव्हते. शक्यता आणि संधी असे दोन्ही एका वेळी मिळाले, म्हणून चारचाकी गाडी घेतलेले, घेऊन तर बघू म्हणून संगणक खरेदी केलेले, सोय म्हणून घरी स्वयंपाकात वेळ न घालवता रोजचाच डबा लावलेले आणि दर रविवारी पॅटिस, भेळ वगैरे खाण्याऐवजी चवीत बदल म्हणून महिन्यातून एकदा थेट हॉटेलिंग करणारे असे स्लोअरचे कुटुंब होते. अशा ‘धाडसी’ कुटुंबात एखादा आळशी सदस्य असणे तोल साधण्यासाठी गरजेचे, तसे ते मांजर स्लोअरच्या कुटुंबात स्थिरावले होते.

तर, मांजराचा आळशीपणा स्लोअरच्या वडलांना आवडत नव्हता, तरी स्लोअरला त्याचे आकर्षण होते. लोळत पडलेल्या मांजराचा तऱ्हेवाईकपणा त्याला मोठा लोभस वाटायचा. फरशीवर लोळण घेऊन कूस बदलण्याचा खेळ करणे, तो झाला, की उगाच कान टवकारून, डोळ्यांच्या बाहुल्या मोठ्या करून एकटक कुठे तरी पाहणे, नंतर ‘सावधान’मधून एकदम ‘विश्राम’मध्ये जाऊन मंदपणे म्याँव असे कण्हणे आणि कुणी तरी आता काही तरी खायला दिले तर बरे, असा विचार मनात आणून संपूर्ण शरीराला आळोखेपिळोखे देत उभे राहणे असे अनेक ‘मार्जार विभ्रम’ स्लोअरला विलोभनीय वाटायचे. तेवढा एक माणसाच्या पायात घुटमळण्याचा लाचारपणा सोडला, तर संपूर्ण स्वावलंबी आणि आपल्या मनाचे राजे असलेले मांजर स्लोअरला आवडायचेच. मध्यमवर्गातून बाहेर पडायचे, तर मांजराचे गुण आत्मसात करणे फार गरजेचे आहे, असा विचार स्लोअर करत असतानाच त्याचे मांजर अचानक गायब झाले आणि मग तो विचारही.

पुढे स्लोअर कॉलेज संपवून नोकरीला लागला, त्या २००० च्या दशकात धावपळीचा सिद्धान्त हळूहळू रूढ होत चालला होता. ‘जागतिकीकरण संधी देत आहे, तर त्याचे सोने केले पाहिजे’, ‘पैसे मिळवणे म्हणजे पाप नाही’, ‘पाय जास्त पसरण्यासाठी अंथरूण मोठे केले पाहिजे,’ असे नवनवीन सुविचार रुजत जाण्याचा तो काळ. स्लोअरचे सगळे मित्र या आदर्शांवर वाटचाल करत होते. आता खरे तर स्लोअरही त्याला दिलेले काम नेमकेपणाने करायचा, पण त्यापलीकडे जाऊन अनुभव म्हणूनही चार गोष्टी करून पाहायचा. त्याचे नेमके इथेच चुकत असल्याचे आणि ‘जेवढा मोबदला, तेवढे काम’ यावर आधारित ‘पैशांचे मूल्य’ नावाची हिशेबी संकल्पना त्याला त्याच्या मित्राने सांगून पाहिली होती. पण, ‘मूल्य’ ही संकल्पना व्यावहारिक आहे, की तात्त्विक, असा वाद त्यांच्यात झाल्याने स्लोअरला मित्र काय सांगतो आहे, याचे जागतिकीकरणोत्तर ‘मूल्य’मापन करताच आले नाही. परिणामी, स्लोअरमध्ये न्यूनगंड वाढून, नोकरीत धावावे कसे, हेच त्याला कळेनासे झाले आणि काम-पगार-समाधान यांचे गुणोत्तर न साधून स्लोअरने गणिताचा पूर्वीपेक्षा अधिक धसका घेतला. याला गणित चुकणे म्हणत नसून, व्यवहार न कळणे असे म्हणतात, हे त्याला त्या वेळी कळले नाही. त्याच्या एवढेच लक्षात आले, की फुटबॉलच्या मैदानावर चेंडूसाठी जोरात धाव घेणे आणि नोकरीत धावपळ करणे हे फार वेगळे असून, पाय धावले, तर श्वास मोकळा होतो, पण विचार धावले, तर धाप लागते!

विचार धावल्याने धाप लागून स्लोअर एकदा ऑफिसात नुसता बसून राहिला. त्याच्याकडून काही कामच होईना. दिवसअखेरपर्यंत अशीच स्थिती राहून शेवटी काहीही काम न करता स्लोअर घरी आला. घरी आल्यानंतरही अस्वस्थ वाटत राहिल्याने तो चालायला बाहेर पडला, तेव्हा त्याला त्याचा हिशेबी मित्र रस्त्यात भेटला. त्याच्याशी गप्पा मारताना स्लोअरला समजले, की हा मित्र गेले काही दिवस रजेवर होता आणि आता तो उद्यापासून पुन्हा कामावर जाणार आहे. स्लोअरने त्याला इकडचे-तिकडचे चार-दोन प्रश्न विचारून रजेबद्दल विचारले. मित्राने त्यावर त्याने केलेल्या ट्रिपच्या आठवणी सांगून सारांशाने स्लोअरला सांगितले, ‘अरे खरे सांगू का, काम करून ‘कंटाळा’ आला होता, म्हणून जरा रजा टाकून ‘आळस’ केला. ‘रिलॅक्सेशन’साठी असा ‘ब्रेक’ आवश्यक असतो. ट्रिप करून रिचार्ज झालोय, पण उद्या कामावर जायचे आहे, या विचाराने परत कंटाळा येऊन तो विचार घालवायला जरा पुन्हा घराबाहेर पडलोय.’

स्लोअरला मित्राचे उत्तर एकाच वेळी मजेशीर आणि गंभीर वाटले. तो शांतपणे घरी आला आणि त्याने रोजदिनीत लिहिले, ‘जगण्यासाठी ज्यातून काही क्षण ओघळावेत, इतका काळाचा पट आता मोठा राहिलेलाच नाही. रोजच्या दिवसाची आता एक स्वतंत्र घोंगडी आहे. तिच्या छिद्रांतून श्वास घेता आला, तर घ्यावा. कुणाला त्याला ‘ब्रेक’ म्हणायचे असेल, तर म्हणू द्यावे, आपण त्याचे अनुकरण न करावे. कुणाला त्याला ‘रिलॅक्सेशन’ म्हणायचे असेल, तरी म्हणू द्यावे, आपण त्याला जगणे म्हणू नये. श्वास घेता घेता विचार मात्र करत राहावा, धाप लागली तरी. कारण, विचारांची धाप लागून आलेला ‘कंटाळा’ कृतिशील असतो, जो न थांबता ‘आळस’ द्यायचे मोल जाणतो… आणखी एक. आता पुन्हा मांजर पाळायला हवी. तिच्या ‘सुखी’ आयुष्याची तुलना आता आपल्याला आपल्या ‘कष्टां’शी करता येईल…’