जागतिकीकरणाचे जणू ब्रीदवाक्य असलेले एक वाक्य स्लोअर शहाणेला फार आवडायचे, ‘जग हे एक खेडं आहे.’ शहरात राहणाऱ्या आणि जगण्यात शहरीच जाणिवा असलेल्या स्लोअरसारख्या कोणत्याही मध्यमवर्गीयाला हे वाक्य सुखावणारे होते. शहरवासीयांच्या खेड्याबद्दलच्या सर्व रोमँटिक कल्पनांचे जागतिकीकरण या एका वाक्यात झालेले असल्याने एक प्रकारे जागतिकीकरणाने मध्यमवर्गीयांची स्वप्नेही ‘कौलारू’ झाली! स्लोअरचेही यापेक्षा फार काही वेगळे झालेले नव्हते. नाही म्हणायला स्लोअरचे आजी-आजोबा खरोखरच एका खेड्यात राहात असल्याने त्याला प्रत्यक्ष खेडे माहीत नव्हते असे नाही. पण, सुट्टीपुरता थोडाच काळ तेथे जाणे-येणे-राहणे होत असल्याने तेथील असुविधाही ‘निर्लेप मनाचे प्रतिबिंब’ वगैरेंसारख्या भाबडेपणानेच गोंजारल्या जायच्या. डांबरी रस्ता मुख्य मार्गाची कास सोडून गावात शिरत नसल्याने धुळीचे पट्टे हीच आपली स्वप्नवाट असल्याची त्याची खात्री होती. स्लोअरने या ‘वाटे’वर खेड्यातील जीवनाच्या स्वप्नांचे अनेक इमले बांधले होते. जागतिकीकरण यायच्या आधी फार काळजीपूर्वक स्वस्थपणे उभी राहिलेली ही इमारत जागतिकीकरणानंतरच्या अवघ्या दोनेक दशकांतच पूर्ण जमीनदोस्त होणार होती, याची कल्पना इमारत बांधताना स्लोअरला आली नव्हती. धुळीच्या वाटेवरील त्याची स्वप्निल मरुद्याने खेड्यांबद्दलच्या शहरी जाणिवेच्या प्रतिमांची प्रतीकचिन्हे होती.
स्लोअरच्या या स्वप्नविश्वाला पहिला तडा तेव्हा गेला, जेव्हा त्याच्या आजी-आजोबांच्या गावातील माळरानात प्लॉटिंगचे चौकोन आखून बिल्डिंगा उगवायला लागल्या. स्लोअर तेव्हा कॉलेजात स्थिरावलेला असला आणि अर्थशास्त्रातील विकास दर वगैरे संकल्पनांची तोंडओळख करून घेत असला, तरी क्षितिजापर्यंत पसरलेल्या विस्तीर्ण माळरानांना स्क्वेअर फुटांची कुंपणे घालायला सुरुवात झाली आहे, एवढेच त्याला समजले. हा विकास आहे, हे तोवर कुणीही त्याला सांगितले नाही आणि त्याच्या मनातील खेड्याच्या कल्पनेने त्याची तशी उमजही त्याला येऊ दिली नाही. त्याला फक्त इतकेच कळले, की गावातल्या घरासमोरच्या ओट्यावर उताणं पडल्यानंतर वर काळ्या आकाशाच्या पडद्यावर नक्षी काढल्याप्रमाणे रेखीव दिसणाऱ्या चांदण्या आता आजूबाजूच्या बिल्डिंगच्या लायटींमुळे आकाशच पांढुरके होऊन त्यात लपून गेलेल्या आहेत. ‘माणसाला प्रकाशाचा इतका सोस असतो, की उजेडाचा अनिंद्या क्षण अंकुरणारा अंधारही त्याला अपशकुनी वाटतो,’ हे वाक्य याच सुमारास कधी तरी त्याने आपल्या ‘रोजदिनी’त लिहिले.
तर, स्लोअर शहाणे जसजसा अर्थशास्त्र शिकत गेला, तसतसे आजी-आजोबांचे गावही सुधारणा होत बदलू लागले. तेच कशाला, वाटेत लागणारी गावेही बदलत गेली. म्हणजे, ज्या गावचा एसटीचा थांबा रस्त्यावर होता, तेथे एसटीला थांबण्यासाठी स्थानक झाले. त्यासाठीची मोकळी जागा आपल्याला प्रवासात आधी कशी दिसली नव्हती, असा किरकोळ प्रश्न स्लोअरच्या मनात कधी तरी यायचा, पण त्याने त्याकडे दुर्लक्ष करणे पसंत केले. किंचित आंबटसर चवीचे पेरू टपोरे होऊन पूर्ण गोड कसे झाले आणि त्याला लावले जाणारे तिखट मीठ हाताला चिकटल्यावर हात रंगीत का करतात, असेही प्रश्न त्याने पडू दिले नाहीत. बस स्टँडवर कागदात मिळणारा वडा कागदासह पॉलिथिन पिशवीत टाकून मिळू लागल्याने वड्याला हात न लावताच हात तेलकट होतात, ही ब्याद टळल्याचे त्याने प्रामुख्याने समाधान मानून घेतले. बाकी बस स्टँडच्या बाजूला कचऱ्यात लोळणारी गलेलठ्ठ डुकरे आणि तोंडाला चिकटलेल्या प्लास्टिकच्या पिशव्या वागवत सैरावैरा धावणारी गुरे हा ग्रामपंचायतीचा प्रश्न असावा, असे म्हणून त्याने तेही सोडून दिले.
बाकी इकडे शहरात असताना, ‘अवांतर व्याख्याने ऐकत जा,’ असे कॉलेजातील प्रोफेसरांनी सांगितल्याने स्लोअर अशा व्याख्यानांना जायला चांगलाच सरावला होता. ‘इथून पुढे बदल हीच एकमेव स्थिर गोष्ट,’ हे वाक्य त्याने अनेक व्याख्यानांत ऐकल्याने ‘रोजदिनी’च्या नाव घातलेल्या पानावरच त्याने ते खाली लिहून ठेवले होते. उद्देश हा, की रोजदिनी उघडताना ते कायम दिसावे आणि बदलांमुळे चकित न होता, हेच सामान्य आहे, असे वाटून घेऊन कशालाही उगाचच प्रश्न न विचारण्याचे भान जागे राहावे. तेथून पुढच्या आजी-आजोबांच्या गावच्या स्लोअरच्या भेटी हेच भान मनाशी पक्के ठेवून झाल्या.
दिवाळीच्या एका सुट्टीत तो गावाकडे गेलेला असताना एरवी ज्या चमूबरोबर तो क्रिकेट खेळत असे, त्यात आणखी चार नवीन मुले आलेली त्याने पाहिले. फार गोड मुले होती. त्यांच्याशी याची गट्टीही लगेच जमली. ते कुठे राहतात, ते स्लोअरला माहीत झाले, पण ती का आली आहेत, हे काही माहीत नव्हते. खेळण्यापुरता संबंध येत असल्याने पहिल्या काही भेटींत गप्पांचा विषय तिथपर्यंत कधी गेलाही नाही. हळूहळू स्लोअर त्यांच्याबरोबर तुतीच्या झाडावर चढायला आणि तुती खायला शिकला. ‘आम्ही कोकणातले, पण महाबळेश्वरला गेलेलो नाही, त्यामुळे आमच्यासाठी या माळरानावर हीच स्ट्रॉबेरी,’ असे त्यातील एका मुलाने जेव्हा स्लोअरला सांगितले, तेव्हा त्या वाक्याचा फार काही अर्थबोध स्लोअरला झाला नाही. त्याने मनात विचार केला, ‘हाच तो बदल – स्ट्रॉबेरीऐवजी तुती – जो सध्याच्या काळाचा स्थायीभाव आहे.’ या मुलांबरोबर फिरताना त्याला छकडा आणि बैलगाडीत फरक असतो, ऊस घेऊन जाणाऱ्या बैलगाडीच्या मागच्या बाजूने हळूच उसाची कांडी काढणे हे कौशल्य असते, डुडुनियाचा पाला औषधी असू शकतो, असे काही तुटपुंजे ज्ञानकण वेचता आले. गंमत इतकीच, की हे ज्ञानकण स्लोअरला उदारीकरण या संकल्पनेशी पडताळून पाहावेसे वाटायचे. पिकवणारा उदार असून, कायम उधारीवर का जगतो, याचे कोडे त्याला त्यामुळेच सुटत नसे. पण, आपण उगाच अर्थशास्त्राला भावनिक करतो आहोत, असे वाटून स्लोअरने हा विचार सोडून देण्याचा बदलही लवकरच स्वीकारला.
या चौघांबरोबर मात्र स्लोअरने आजवर न पाहिलेले गाव पाहून धमाल केली. शहरात स्विमिंग पूलवर दोन-तीन वेळा क्लास लावूनही पोहायला न जमलेल्या स्लोअरला या पठ्ठ्यांनी कॅनॉलच्या वाहत्या पाण्यात पोहायला शिकवले. ती सुट्टी भलतीच गमतीशीर चालली होती. गावात सुरू झालेल्या सहकार मॉलमध्ये किराण्यापासून कपड्यापर्यंत सर्वच वस्तू एकाच मोठ्या दुकानात मिळण्याची मौजही याच सुट्टीत स्लोअरने अनुभवून पाहिली होती. अर्थात, त्या मोठ्या दुकानात जाताना त्याचे चौघे मित्र बाहेरूनच दुकानाच्या भल्या मोठ्या काचेला तोंडं चिकटवून आतल्या वस्तू पाहात असल्याचे त्याच्या नजरेतून सुटले नव्हते. त्यांच्या वेड्यावाकड्या दिसणाऱ्या चेहऱ्यांनी त्याचे मनोरंजनही छान केले. सुट्टी पुरती संपली नव्हती आणि अजून मजा करायची बाकी असताना एक दिवस मात्र अचानक हे चौघे नाहीसे झाले. स्लोअरला त्यांच्या या अशा अचानक जाण्याचे दु:ख आणि आश्चर्य दोन्ही वाटले. त्याने चौकशी केली, तेव्हा कळले, की या पोरांचे इथले रोजंदारीवरचे काम संपून नव्या कामासाठी त्यांना कालच गाडी येऊन दुसऱ्या गावी घेऊन गेली.
निराश मनाने आजी-आजोबांच्या गावातल्या घरी परतताना स्लोअरला लक्षात आले, की धुळीचा रस्ता आता पक्का व्हायला लागला आहे. गावात एखादीच दुचाकी दिसायची, आता दुचाक्याच काय, जीपड्यापण लगोलग काही दारांसमोर लागल्या आहेत. घरात टीव्ही आहे, केबलपण आलीये, वीजही आता फार जात नाही आणि पायजमा, पांढरा सदरा, टोपीची जागाही जीन्स, टी-शर्ट, गॉगलने घेतली आहे. हा ‘बदल’ आपल्याला इतका काळ जाणवला कसा नाही, असा विचार करतच स्लोअर घरी आला. त्याने रोजदिनीत लिहिले, ‘‘गावाकडचे’ असे काही स्वप्न असेल, तर ते आता शिल्लक आहे? का बदलाची व्याख्या शिकताना आपण हे स्वप्नही बदलण्याचे भान ठेवले नाही? मग ते चौघे अजूनही कसे ‘गावाकडचे’च राहिले? त्यांना बदल कळला नाही, की आपण त्यांना सांगायला कमी पडलो?… ते काहीही असो, ते चौघेजण मी पोहत असताना निघून गेले. निरोप न देता गेले, पण वाटतंय काही तरी ‘निरोप’ ठेवून गेले. मला हा बदल कळतोय का?’