रविवारची सकाळ. सुट्टीचा दिवस असल्याने ‘एल अँड टी कंपनी’च्या मुख्य प्रवेशद्वारावर पेंगुळलेल्या अवस्थेत असलेल्या सुरक्षारक्षकाला अचानक वाहनांची रांग येताना दिसली तसा तो खडबडून जागा झाला. ताफा दाराजवळ आला तसा त्यातून एकेक कुटुंब सामानासकट उतरू लागले. ‘अरे, हे तर आपले कर्मचारीच’ असे रक्षकाने म्हणेपर्यंत सारे कुटुंबकबिल्यासह आत शिरलेसुद्धा! थोड्याच वेळात कंपनीचे आवार भरून गेले. त्यातली मुले इमारतीसमोरच्या बागेत हुंदडू लागली. काहींनी क्रिकेटचे किट काढून खेळण्यास सुरुवात केली. एकाने तडकावलेला चेंडू दर्शनी काचेवर आदळताच ती फुटली तशा साऱ्यांनी टाळ्या वाजवल्या. ‘हे काय नवीन?’ असे म्हणत रक्षक फोनकडे धावला. त्याने दिलेला निरोप वरिष्ठांमार्फत कंपनीचे अध्यक्ष सुब्रमणियन यांच्यापर्यंत पोहोचला. ते सकाळी न्याहरी आटोपून ‘गोलमाल-३’ बघत बसले होते. निरोप मिळताच ते लगबगीने कार्यालयात जाण्यासाठी निघाले. पत्नीने ‘सुब्बी’ असा आवाज देत प्रश्नार्थक नजरेने कुठे जाताय, असे विचारले पण स्वत:चेच विधान आठवल्याने तिच्याकडे बघण्याचे धाडस त्यांना झाले नाही. संसारत्याग करून रोज १८ तास देशासाठी देणाऱ्याला खूश करण्यासाठी आपण नको ते बोलून गेलो व अडचणीत सापडलो, असा विचार करत ते कंपनीच्या आवारात जसे पोहेचले तसा सर्वांनी त्यांना गराडा घातला.

हेही वाचा >>> तर्कतीर्थ विचार : कन्या विवाह वय विचार

एकेक जण बोलू लागला, ‘सर तुमच्या आवाहनाला प्रतिसाद देत आठवड्याला ९० तास काम करण्याची आमची तयारी झाली आहे. आजपासून आम्ही रविवार सुट्टीचा दिवस समजणार नाही. म्हणूनच येथे जमलोत. फक्त आमच्या काही मागण्या आहेत. त्या तुम्ही तातडीने पूर्ण करा. तुम्ही केलेल्या आवाहनानुसार वागण्यास आम्ही सुरुवात केली तर तुमच्यावरची टीकासुद्धा थांबेल. तर, आजपासून आमची बायका-पोरे येथेच राहतील. त्यांच्या निवासाची व्यवस्था तातडीने करा. सर्वांना स्वतंत्र निवासस्थान देत असाल तर भाजीपाला, वाणसामान आणण्यासाठी नोकरांची व्यवस्था करा. मुलांना शाळेत सोडण्यासाठी स्वतंत्र बस द्या. इतर वेळात त्यांचे लाड पुरवण्यासाठी सेवा क्षेत्रातील एखाद्या कंपनीशी तातडीने करार करा. आमच्या अर्धांगिनींना शॉपिंगसाठी जायचे असेल तर तात्काळ वाहने उपलब्ध करून द्या.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

आमच्यातील काहींच्या पत्नी इन्फोसिसमध्ये काम करतात. तिथे ७० तासांचा नियम लागू झालेला. आपले ९० व त्यांचे ७० यातून उभयतांना मुलांकडे लक्ष देण्यासाठी वेळेचे गणित जुळवावे लागेल. त्यासाठी तातडीने नारायण मूर्तींशी चर्चा करा. आम्हाला आठवड्यातील ७८ तास रिकामा वेळ मिळेल. तो दिवसाला कसा व केव्हा वापरायचा, या काळात पत्नीचा चेहरा बघायचा की नाही यासंदर्भातील नियमावली त्वरित तयार करून द्या. वीकएन्डला पार्ट्या करण्याची सवय आम्हाला आहे. त्याचा खर्च तसेच जमणाऱ्या आप्तेष्टांना येण्याजाण्याची सुविधा उपलब्ध करून द्या. कामाचे तास वाढल्याने कुटुंबात वाद उद्भवलाच तर त्यातून मार्ग काढण्यासाठी समुपदेशन केंद्राची व्यवस्था करा. वैद्याकीय अडचण आली तर आम्हाला हवा असलेला डॉक्टर उपलब्ध करून द्या. कामाच्या ९० तासांत आम्ही फोनवरून फक्त मुलांशी बोलू. पत्नीचे तोंड बघणार नाही याची हमी देतो’ इतके सारे ऐकून सुब्रमणियन यांना घामच फुटला. या सर्व मागण्या मान्य केल्या तर कंपनी खड्ड्यात जाईल व आपले पदही, हे लक्षात येताच ते जोरात ‘सॉरी’ म्हणाले व कंपनीचे कामकाज जुन्याच पद्धतीने चालेल तेव्हा सर्वांनी घरी जावे असे आवाहन करून परतले. घरात शिरताच त्यांनी पत्नीला हाका मारल्या, पण प्रतिसाद मिळाला नाही. त्यांनी फोन बघितला तर त्यावर तिचाच संदेश होता ‘सोमवारी सकाळी नाश्त्याच्या टेबलवर भेटू’ असा.