तर मित्रांनो, आधुनिक युगात कमालीची लोकप्रिय ठरलेली ध्यानधारणा कशी करावी याची माहिती आज आम्ही देणार आहोत. डिजिटल युगातले हे ‘ध्यान’ नक्की फलदायी होईल अशी आशा. ‘डोळे बंद न करता पद्मासनात बसावे. एका बाजूला पाट व दुसऱ्या बाजूला चटई अंथरून ठेवावी. सभोवार कॅमेरेच कॅमेरे दिसतील. विचलित न होता ते कसे लावले जात आहेत, त्यांचा अँगल कसा असणार, त्याच्या मागे असलेले दिवे प्रकाशाचा झोत कसा सोडणार याचे एकाग्रचित्ताने निरीक्षण करावे. त्यातूनच प्रवास ध्यानमग्नतेकडे सुरू होईल. कॅमेरा व लाईटमनला सूचना देऊ नयेत. एकदा सर्व ‘सेट’ झाले की मोठ्याने ‘ओम’ म्हणत डोळे मिटावे. सुरुवातीला ‘क्लिक’ असा आवाज येईल. तो कुठून आला हे पाहण्यासाठी सवयीनुसार डोळे उघडू नयेत. दिव्यांचा झोत शरीरावर पडू लागल्यावर थोडे उष्ण वाटेल.

हेही वाचा >>> पहिली बाजू : ‘जैसे थे’ नसणारा अरुणाचल निकाल!

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

कदाचित घामही येईल पण हालचाल नको. घाम गळू द्यावा. प्रकाशझोत पडताच पापणीआडचा अंधार नाहीसा होऊन उजाडल्यासारखे वाटेल. तांबूस प्रकाश जाणवेल. विचलित न होता आजवर केलेल्या कृती नजरेसमोर आणाव्यात. त्यावर आत्मपरीक्षण सुरू केले की त्यातला खरे व खोटेपणा तुमच्या लक्षात येऊ लागेल. या कृती एखाद्या चलचित्राप्रमाणे तुमच्या नजरेसमोरून सरकत जातील. खोट्या कृतीमुळे चेहरा पश्चात्तापदग्ध होणार नाही याची काळजी घ्यावी. अर्थात नव्या कॅमेऱ्यांत हा खोटेपणा सहज लपून जाईल याबाबत निश्चिंत असावे. मग भविष्याचा (प्रसिद्धीचा नाही) विचार करता करता शरीराच्या एकेका भागावर लक्ष केंद्रित करत जावे. पन्नास दिवस केलेले श्रम आठवून तुम्हाला थकल्यासारखे वाटेल. पाय मोकळे करावेसे वाटतील पण तसे अजिबात करू नये. तुमचे ध्यान सुरू असताना कॅमेरे व दिव्यांचे स्टँड ‘योग्य प्रतिमा’ दिसावी म्हणून इकडेतिकडे सरकवले जातील. त्या आवाजाच्या अडथळ्याने तंद्रीभंगतेचा धोका संभवतो. त्यावर मात करू शकलात तरच ज्ञानाच्या अलौकिक प्रकाशाकडे जाणारी तुमची वाटचाल सुकर होईल. एकाच आसनात बसून तुमचे शरीर अवघडले तर कॅमेरेवाल्यांना थांबा असा इशारा करून थोडे चालायला हरकत नाही. मात्र हे करताना जपमाळ तुमच्या हाती हवीच. डोळे उघडे ठेवून ध्यान करण्याचा हा प्रकार तुम्हाला आणखी उल्हासित करेल. पुन्हा ध्यानस्थ झाल्यावर आधीच्या तुलनेत तुमची चित्तवृत्ती लवकर एकाग्र होईल. तुम्ही समुद्राच्या काठावरच असाल तर गाजेचा आवाज तुम्हाला त्रास देऊ शकतो. सुरुवातीला विरोधकांचा अडथळा असे समजून त्याकडे दुर्लक्ष करा. तरीही त्रास होतच असेल तर गाजेच्या लयीवर स्वार होण्याचा प्रयत्न करा. तुम्हाला एक वेगळीच अनुभूती प्राप्त होईल. ४५ तासांच्या या साधनेमुळे तुमची प्रतिमा उजळून निघेल की नाही अशी शंकाही मनात येऊ देऊ नका. प्रतिमा उजळण्याचे काम अत्याधुनिक कॅमेरे व माध्यमे चोखपणे पार पाडतील याची खात्री बाळगा.’ (या आधुनिक ध्यानधारणेचा परवा दक्षिणेत झालेल्या ध्यानाशी काहीही संबंध नाही याची नोंद घ्यावी.)