महाराष्ट्रातील १४ कोटी जनतेला या निवेदनाद्वारे मी हे स्पष्ट करू इच्छितो की माझी ‘ऑन कॅमेरा’ थुंकण्याची कृती ही अगदी ठरवून केलेली होती. मुळात थुंकणे या शब्द वा कृतीबद्दल आपल्याकडे खूपच गैरसमजातून बघितले जाते. ही कृतीसुद्धा प्रतीकात्मक विरोध दर्शवण्यासाठी वापरली जाऊ शकते हे मला एक ज्येष्ठ संपादक व पत्रकार या नात्याने माध्यमांना सांगायचे होते. या क्षेत्राने काळानुरूप बदलायला हवे या मताचा मी आहे. त्यामुळेच मी ही कृती करण्याआधी खूप विचार केला. प्रेक्षकांना नवे काही द्यायचे असेल तर ते अचूक व योग्य ‘टायिमग’ साधणारे असावे या मताचा मी आहे. त्यामुळे हा विचार अमलात आणण्याआधी मी माणूस पान व मावा खाऊन कसा थुंकतो? स्वाभाविकपणे कसा? याचा अभ्यास करणे सुरू केले. त्यासाठी दादर ते मरीन ड्राइव्हपर्यंतच्या अनेक पानटपऱ्या पालथ्या घातल्या. तोंडातून बाहेर पडणारी थुंकी किती लांब जाऊ शकते? त्यासाठी किती जोर लावावा लागतो? याचे निरीक्षण केले.
कान, नाक, घसातज्ज्ञ म्हणून काम करताना तोंडातल्या लाळेवर संशोधन करणाऱ्या काही डॉक्टरांशी बोललो. त्यानंतर घरी थुंकण्याची प्रॅक्टिस सुरू केली. वाहिन्यांचे माईक समोर असताना थुंकीचे तुषार त्यावर पडू नयेत, कुणाच्या अंगावर ते जाऊ नयेत यासाठी थुंकीचा वेग किती असावा, बाहेर पडणाऱ्या लाळेचे प्रमाण किती असावे याकडे बारकाईने लक्ष दिले. ही प्रॅक्टिस करताना मला घरभर थुंकावे लागले. त्यामुळे नाराज झालेल्या घरातील ज्येष्ठांनी ‘आधी मुंबई घाण केली, आता घरसुद्धा?’ असा मारलेला ‘सॉलिड’ टोमणासुद्धा ऐकावा लागला. या कृतीमागचा उद्देश सविस्तर समजावून सांगितल्यावर ते शांत झाले. मग एक ओळखीतल्या बूमधारीला घरी बोलावून कॅमेऱ्यासमोर तोच प्रकार करून बघितला. त्यानंतरच मी जाहीरपणे ते करण्याचे मनाशी ठरवले. मला तोंडात शब्दाशिवाय काहीही चघळण्याचे व्यसन नाही. त्या दिवशी मी मुद्दाम बडीशेप तोंडात ठेवली. त्यामुळे जास्तीची लाळ तयार होते हे मला ठाऊक होते.




चित्रीकरणातून केवळ तोंडाची कृती दिसू नये, थुंकीचे तुषारही दिसावेत हाच त्यामागचा उद्देश होता. या कृतीनंतर माझ्यावर टीकेची झोड उठेल याची मला कल्पना होती. तरीही मी कशाची पर्वा न करता ‘ते’ केले व त्यावर ठाम आहे. मुळात ती थुंकी नव्हतीच तर थुंकर होती. वणवा विझवण्यासाठी आपण फुंकर घालतो. इथे राजकीय वणवा पेटावा म्हणून मी थुंकर-प्रयोग केला. यातून सारे विरोधक गपगार होतील, यावर माझा ठाम विश्वास आहे. ज्यांना थुंकी शब्द आवडत नसेल त्यांनी पाहिजे तर या कृतीला ‘प्रतीकात्मक पिचकारी’ म्हणावे. माझी काहीही हरकत असणार नाही. मात्र, या नव्या कल्पनाविष्कारामुळे मविआ आणखी मजबूत होईल याची मला खात्री आहे. चटपटीत शब्दांना तशाच कृतीची जोड दिली तर ती प्रेक्षकांना भावते हे माध्यमतज्ज्ञ म्हणून माझे मत आहे. याची जाणीव या क्षेत्रातील सर्वाना असल्यामुळेच कुणीच माझा निषेध वगैरे करण्याच्या भानगडीत पडले नाही. स्वातंत्र्यपूर्व काळापासून विरोधक, गद्दारांना हीन लेखण्याची ही कला मी आज चव्हाटय़ावर आणली. त्यामुळे जनतेत त्याचे स्वागतच होईल याची मला खात्री आहे. माझ्या या ‘रोखठोक’ भूमिकेनंतर तरी माध्यमांची ‘काळजी’ वाहण्याचे नाटक करणारे शांत बसतील अशी आशा मला आहे. धन्यवाद!