नुकत्याच पार पडलेल्या गणेशोत्सवाच्या कवित्वाची लालबागच्या राजाच्या खोळंबलेल्या विसर्जनाने सांगता झाली. दरवर्षी स्थानिक, कोळी समाजाकडून केले जाणारे विसर्जन या वेळी अत्याधुनिक तराफ्याद्वारे करण्याचे ठरले, मात्र भरती-ओहोटीच्या गणितात अत्याधुनिक तराफा कुचकामी ठरला. त्यानंतर महाराष्ट्रात नवीन तंत्रज्ञान आणि स्थानिक अनुभव-ज्ञान यांच्या श्रेष्ठतेवर चर्चा सुरू झाली. नवीन तंत्रज्ञान नेहमीच प्रस्थापितांचा बाजार उठवण्यास कारणीभूत ठरते. बऱ्याचदा प्रस्थापित त्याची चाहूल आधीच घेऊन नवीन कौशल्ये आत्मसात करून झालेल्या फेरबदलावर पुन्हा वर्चस्व गाजवतात.

मात्र पारंपरिक किंवा स्थानिक ज्ञानप्रणाली समाजाचे देणे लागणारी असते! ती असते मुक्त आणि सहिष्णू! वर्चस्वापेक्षा संवर्धनाचा वसा घेतलेली! या व्यवस्थेत बदल झाल्यास त्या ज्ञानाची आणि अनुषंगाने संबंधित समाजाची अवहेलनाच होण्याची शक्यता जास्त! इंग्रजांच्या भारतातील आगमनानंतर देशी सत्तांनी प्रगत लष्करी तंत्रज्ञान खरेदी करून राजकीय नाही, मात्र किमान आर्थिक सत्ता टिकवली. मात्र यंत्रमागामुळे उद्ध्वस्त झालेल्या विणकरांवर उपासमारीची वेळ आली. सध्या कृत्रिम बुद्धिमत्तेच्या (एआय) जमान्यात तंत्रज्ञानाची सहाय्यक भूमिकाच नव्याने आकारास येत आहे. प्रश्न केवळ एआय आणि पारंपरिक ज्ञान यांचा संगम होण्यापुरता नाही, तर विदा विश्लेषण, निर्णय प्रक्रिया आणि ज्ञाननिर्मिती या संकल्पना मानवजातीच्या ऑपरेटिंग सिस्टिमशी संबंधित आहे.

ज्ञानमार्गाचे हेतू

ज्ञाननिर्मिती आणि तंत्रज्ञान यांचा जवळचा संबंध आहे. छपाईयंत्राच्या शोधानंतर ज्ञानप्रसार सुलभ झाला म्हणून तंत्रज्ञानाचा उदो-उदो होतो. मात्र त्याच वेळी आधीची ज्ञान मुखोद्गत करण्याची परंपरा मात्र लुप्त होऊ लागली. लोक साक्षर होत गेले तसतशा मौखिक परंपरेतील रूढी दुर्मीळ झाल्या. भोंडला किंवा हादग्याची संमेलने आज शोधावी लागतात. त्यातील गाणी मुखोद्गत असणारे तर आणखी कमी! आपल्या आजूबाजूच्या सांस्कृतिक अध:पतनामागे आणि उत्सवांच्या बाजारीकरणामागे गावगाड्याची बदललेली भाषा हे एक महत्त्वाचे कारण! ज्ञाननिर्मितीतील असणारा कलेचा, समाज कल्याणाचा अथवा समाजबांधणीचा वारसा दुय्यम होऊन तंत्रप्रसारासोबत ज्ञान हे रुक्ष, उपयोगितावादी आणि आर्थिक प्राप्तीचे साधन होऊ लागले. दर्यावर्दी वारसा केवळ युरोपीयन राष्ट्रांकडेच होता म्हणून त्यांनी जगावर राज्य केले असेही नाही. पॉलिनेशियासारख्या प्रशांत महासागरातील बेटांवरील स्थानिक जमातींना दीर्घ समुद्रसफरीचे ज्ञान परंपरेने शतकांपासून अवगत होते. हे तंत्रज्ञान प्रस्थापित वर्गाकडे गेले तेव्हा फरक पडला! राज्य करण्याची मानसिकता आणि वसाहतवादाचा इतिहास तिकडून आला.

पाश्चात्त्य मूल्याधिष्ठित ज्ञानप्रणाली

एआय तंत्रज्ञानाचा मागोवा घेताना लक्षात येईल की मशीन लर्निंग, लार्ज लॅंग्वेज मॉडेल वगैरे प्रशिक्षित एआयवर पाश्चात्त्य मूल्यांचा पगडा आहे. ज्ञान संदर्भापासून वेगळे करता येते, त्याचे मोजमाप करता येते आणि सांख्यिकीय संबंधांद्वारे त्यावर प्रक्रिया करता येते. ज्या ज्ञानाचा अर्थ माणसे, जमीन, पूर्वज आणि आत्म्यांशी असलेल्या नात्यांमधून निर्माण होतो, असे ज्ञान समजून घेण्यास या प्रणालींना संघर्ष करावा लागतो. पाश्चात्त्य जगातील भोगवादी, वंशश्रेष्ठत्वाच्या नजरेतून जगाकडे पाहायचे झाल्यास वर्चस्वाच्या पाश्चात्त्य मिथकाचे दृढीकरण होण्याची शक्यता आहे. नफेखोरीला प्राधान्य दिल्यामुळे पारंपरिक ज्ञानाचा बाजार कसा मांडला जातो हे आपण हळद आणि कडुलिंबाच्या पेटंटवरून उठलेल्या वादावेळी पाहिले! तंत्रज्ञान एकजिनसीपणाला प्राधान्य देते. हरितक्रांतीच्या आधी अस्तित्वात असणाऱ्या तांदळाच्या, कडधान्यांच्या कित्येक प्रजाती नामशेष होऊन ठरावीक प्रजातीचे गहू आणि तांदूळ लागवडीपुरते उरले. ठरावीक काळानंतर सेंद्रिय शेतीच्या नावाखाली पूर्वीचीच यंत्रणा कार्यान्वित होऊन स्थानिक समुदायांची जीवनपद्धती महाग होऊन त्यांना बहुसंख्याकांची शैली आत्मसात करावी लागली. हा एकजिनसीपणा तोही तंत्रधारकांच्या सोयीने मानवी समाजात उतरल्यास विविधता नाहीशी होण्याचा धोका आहे. स्थानिक परिसंस्थेमुळे समग्र माहिती असलेले आपले रीतिरिवाज, चालीरीती नाहीशा होऊन नैसर्गिक संकटांबाबत आपण अधिक असुरक्षित होण्याचा धोका नाकारता येत नाही. हिंदू हा धर्म नसून ती एक जीवनशैली आहे, असे आपण म्हणतो तेव्हा त्यात आदिवासी पाड्यांपासून लमाणी तांड्यांपर्यंतच्या सर्व चालीरीतींचा समावेश होतो. अशा वेळी एआयनिर्मित हिंदू धर्माच्या संकल्पनेमध्ये प्रस्थापित वर्गाच्या अनुषंगाने आशयनिर्मिती केल्यास येणाऱ्या पिढ्यांसाठी विशिष्ट हिंदुत्व म्हणजेच हिंदू धर्म हे सूत्र पक्के होईल. सध्याच्या वातावरणात समाजमाध्यमे आणि अल्गोरिदममुळे शाकाहाराचे वाढलेले स्तोम, बुवाबाबांची चलती आणि धर्माबद्दलची अतिरेकी संवेदनशीलता हे याचेच उदाहरण आहे.

नवोन्मेषाची आजची संकल्पना लक्षात घेतल्यास संशोधन या शब्दाचा संदर्भ केवळ विज्ञान आणि तंत्रज्ञान क्षेत्राशी, तर दुसरीकडे पारंपरिक ज्ञान हे पर्यावरण संवर्धन, औषधे, पिकांची जनुकीय विविधता इथपर्यंत मर्यादित आहे असे वाटण्याचा धोका आहे. मात्र नागरीकरणाची सामाजिक आणि राजकीय घडी बसविण्यामागे पारंपरिक ज्ञानाचा समृद्ध वारसा आहे हे बऱ्याचदा विसरले जाते. एआयला प्रशिक्षण देण्यासाठी लागणाऱ्या डेटाची भूक म्हणजे एक नव्या प्रकारचा संसाधन वसाहतवाद आहे. आदिवासी भाषा, सांस्कृतिक पद्धती, पर्यावरणीय ज्ञान आणि अगदी आनुवंशिक माहितीदेखील आंतरराष्ट्रीय कायद्याने सुनिश्चित केलेल्या ‘मुक्त, पूर्व आणि माहितीपूर्ण संमती’ (फ्री, प्रायर, अॅण्ड इनफॉर्म्ड कन्सेन्ट) शिवाय गोळा केली जात आहे, त्यावर प्रक्रिया केली जात आहे आणि त्यातून पैसे कमावले जात आहेत. एआय पारंपरिक औषधांविषयीचे ग्रंथ वाचते किंवा अल्गोरिदम आदिवासी भाषांमधील ध्वनिमुद्रणांवर प्रक्रिया करतो, खाणी ओरबाडणाऱ्या भांडवलदारांसारखेच ते संसाधने उपसत असतात. फरक फक्त इतकाच की हे ‘उत्खनन’ अदृश्य असते, भौतिक पाऊलखुणांशिवाय! त्याचे ओरखडे केवळ ज्ञानप्रणालींवरच उमटतात.

ज्ञानमीमांसात्मक द्वैत

कदाचित आपण मानवी इतिहासातील ज्ञानमीमांसेच्या सर्वात मोठ्या बदलाजवळ पोहोचलो आहोत. कृत्रिम बुद्धिमत्तेच्या युगात ज्ञानमीमांसात्मक द्वैताचा (एपिस्टेमिक बायनरी) उदय होत आहे. हे द्वैत पाश्चात्त्य आणि आदिवासी किंवा वैज्ञानिक आणि पारंपरिक असे नसून, ते ‘सेंद्रिय बुद्धिमत्ता’ (ऑरगॅनिक) आणि ‘कृत्रिम बुद्धिमत्ता’ यांच्यातील आहे. या नव्या चौकटीत, पिढ्यानपिढ्याच्या अनुभवातून चेरापुंजीच्या मेंढपाळाने पावसाबद्दल मिळवलेले ज्ञान आणि केंब्रिजच्या भौतिकशास्त्रज्ञाने प्रयोगशाळेतील निरीक्षणातून मिळवलेले ज्ञान, या दोन्हीमध्ये साम्य असेल. कारण ते कृत्रिम बुद्धिमत्तेच्या मदतीशिवाय तयार झालेले ज्ञान असेल. हा बदल पारंपरिक ज्ञानप्रणालींना पुन्हा एकदा अधोरेखित करू शकतो. कृत्रिम बुद्धिमत्ता सर्वव्यापी होईल, तेव्हा मानवी जीवनातील एकसुरीपण टाळण्यासाठी जमीन, समाज आणि मानवेतर सजीवांशी असलेल्या खऱ्या संबंधांतून निर्माण झालेले ज्ञान अधिकाधिक मौल्यवान बनेल. ज्याप्रमाणे औद्याोगिक शेतीच्या युगात ‘सेंद्रिय’ अन्नाला जास्त किंमत मिळते, त्याचप्रमाणे ‘सेंद्रिय बुद्धिमत्ता’ ही ज्ञानाच्या जगात दुर्मीळ, मौल्यवान आणि अस्सल बनेल, जी उपयुक्त असली तरी कृत्रिम बुद्धिमत्ता कधीच होऊ शकणार नाही.

सध्या संयुक्त राष्ट्र, ओईसीडी किंवा जी-२० सारख्या जागतिक स्तरावरील एआय प्रशासनावर चाललेल्या चर्चांमध्ये बेरोजगारी, स्वायत्त शस्त्रे, अल्गोरिदमचे पूर्वग्रह इत्यादी विषयांवर चर्चा होते, ज्या पाश्चिमात्य संदर्भांना गृहीत धरतात. मात्र ज्ञानरचनात्मकता, पारंपरिक ज्ञानपद्धती, स्थानिक रूढी आणि परंपरा ज्या प्रस्थपित हेतूंपेक्षा ज्ञानाचा निराळा मार्ग अवलंबतात त्याबद्दल मोठ्या प्रमाणात शांतता आहे. या विषयावरील चर्चा अत्यंत गरजेची आहे. कारण ही फक्त विविध सॉफ्टवेअर किंवा प्रशासन प्रारूपांमधून योग्य आणि अयोग्य अशी निवड नाही. मानवी ज्ञानाचे भविष्य औद्याोगिक संस्कृतीच्या डिजिटल अवशेषांवर प्रशिक्षित केलेल्या कृत्रिम बुद्धिमत्तेची ही एकसंध संस्कृती असेल की, लाखो वर्षांपासून मानवाला विविध वातावरणांमध्ये जगण्यास आणि भरभराटीस येण्यास मदत करणारी ज्ञानाची विविधता कायम राहील, याचा सोक्षमोक्ष ही चर्चा लावणार आहे.

प्रत्येक डेटासेट संकलित करताना, प्रत्येक अल्गोरिदमला प्रशिक्षण देताना आणि यंत्रप्रशिक्षणासाठी ज्ञान-मूल्ये ठरवताना आपण नेमाडेंच्या भावी ‘खंडेरावा’ची वाट पक्की करत आहोत. मोरगावच्या गणिकेपासून मोहेंजोदारोपर्यंत त्याने मानवी जाणिवा-नेणिवांचा माग काढायचा की गावगाडा हाकत केवळ उदरभरण करत बसायचे हे हा काळ ठरवणार आहे. मानवी भविष्य उत्सवांच्या काळात कोकणच्या सुशेगात गावात जाऊन नाचण्या-गाण्यात दंग होईल की शहरातील कोनाड्यात गेलाबाजार नगरसेवकाच्या फेकलेल्या तुकड्यांवर पोसले जाईल हे एआय आणि पारंपरिक ज्ञानमार्गातील द्वंद्व स्पष्ट करणार आहे. एआयकेंद्रित भविष्याच्या सुषुप्ती-जागृतीच्या या सीमारेषेवर पारंपरिक ज्ञानाची ही समृद्ध अडगळच निर्णायक ठरणार आहे.

phanasepankaj@gmail.com