‘‘फार जुनी हकीकत. १९१७ सालची. वाई येथील प्राज्ञपाठशाळेत वेदान्ताचे अध्ययन करण्याकरिता स्वातंत्र्य चळवळीतील अनेक कार्यकर्ते येऊ लागले होते. त्यात जानेवारीच्या अखेरच्या आठवड्यात महात्मा गांधींच्या साबरमती आश्रमातून आलेले विनोबा भावे हेही होते. ते त्यांच्या अजोबांनी बांधलेल्या घरात उतरले. आजोबांचे नाव शंभूराव. हे घर वाईच्या ब्राह्मणशाही आळीत कोटेश्वर मंदिराजवळ आहे. कोटेश्वर हे भाव्यांच्याच मालकीचे मंदिर आहे. जाड्याभरड्या खादीच्या वेशात विनोबा भावे प्राज्ञपाठशाळेच्या मुख्य आचार्यांकडे प्रात:काली आठच्या सुमारास उपस्थित झाले. भावे यांनी ‘‘शंकराचार्यांची प्रस्थानत्रयी शिकण्याकरिता आलो,’’ असे मुख्य आचार्य नारायणशास्त्री मराठे यांना सांगितले. प्रस्थानत्रयी म्हणजे उपनिषद्भाष्य, गीताभाष्य आणि ब्रह्मसूत्रभाष्य. आवश्यक ती चौकशी व प्राथमिक चर्चा झाली. प्रात:काली आठ वाजता शांकरभाष्याचे पाठ सुरू झाले. वीस ते बावीस वर्षे वयाचे प्रौढ विद्यार्थी शांकरभाष्याचा पाठ घेत होते. दीड-दोन महिन्यांनंतर वाईत प्लेगचा उपद्रव सुरू झाला. प्राज्ञपाठशाळेचे शिक्षक व विद्यार्थी प्लेगचा उपद्रव टाळण्याकरिता नदीच्या पैलतीरावर पर्णकुट्या बांधून राहू लागले. तेथेच पाठ व त्यानंतरची चर्चा होत असे. पाठाच्या पूर्वी पूर्वावलोकन व पाठांतर झालेल्या विषयाची आवृत्ती विद्यार्थी एकत्र बसून करीत. विनोबा भावे त्यात सामील होत नव्हते. या प्लेगात आमराईत लहानशा कुटी उभारल्या होत्या. विनोबा या आमराईमध्ये शांकरभाष्याचे मुक्तकंठाने पठण करीत असत. आचार्य नारायणशास्त्री मराठे यांना त्यांचे ते पठण फार रोचक वाटत असे. विनोबांची पठणशैली सुरेख व अनुकरणीय आहे, असे ते इतर विद्यार्थ्यांना सांगत. थंडी गेली, प्लेग गेला. वस्ती पुन्हा गावात परतली. आजोबांचे घर सोडून विनोबा प्राज्ञपाठशाळेच्या शेजारी असलेल्या एका मित्राच्या घरी माडीवर राहावयास आले. पहाटेच्या वेळी विनोबा स्वत:ची बाजरी, जोंधळा किंवा गहू दळून काढत. मित्राची आई विनोबांना भाकरी किंवा चपाती भाजून देई.
ब्रह्मसूत्रभाष्यातील महत्त्वाचे असे संदर्भ शिकून झाल्यावर विनोबांना शांकरभाष्याचे आकलन गुरूच्या साहाय्यावाचून होऊ लागले. प्रस्थानत्रयीचा बराचसा भाग त्यांनी अभ्यासला. साबरमती आश्रमातून महात्मा गांधींच्या संमतीने ते वाईस आले तेव्हाच, वर्षभरात इथून साबरमतीला परतायचे, असे त्यांनी ठरविले होते. त्याप्रमाणे वाई येथील अध्ययनाचा संपविलेला कार्यक्रम महात्मा गांधींना पत्राने कळविला. विनोबांचे हे पत्र वाचून महात्मा गांधी आश्चर्यचकित झाले. शंकराचार्यांची प्रस्थानत्रयी एका वर्षात संपविणाऱ्या या प्रज्ञावंताने महात्मा गांधींना चकित करून सोडले. गांधींनी ‘आश्रमात वाट पाहात आहे’ असे पत्रात कळवून म्हटले की, ‘ऐ गोरख, तूने मच्छिंद्र को भी जीता है !’ नवनाथांमध्ये पहिले नाथ प्रत्यक्ष पार्वतीपती शिव. त्या शिवाला आदिनाथ म्हणतात. त्याचा शिष्य मच्छिंद्रनाथ. मच्छिंद्रनाथाचा शिष्य गोरखनाथ हा तिसरा नाथ होय. याने सगळ्या विषयवासनांवर विजय मिळविला होता. त्यामुळे मच्छिंद्रनाथ हे या जितेंद्रियाला पाहून चकित झाले. त्यावेळचे मच्छिंद्रनाथांचे वरील उद्गार होत.’’
– ही आठवण नमूद करून तर्कतीर्थ म्हणतात, ‘‘प्राज्ञपाठशाळेतील माझे सहाध्यायी म्हणून आणि नंतर माझे झालेले गुरुवर्य (इंग्रजीचे अध्यापन) म्हणून अनेक आठवणी अद्याप चिरस्मरणीय आहेत. प्राज्ञपाठशाळेत प्रत्येक सोमवारी धर्मसभा भरत असे. एका श्रावण सोमवारच्या धर्मसभेत विषय उपन्यास (मांडणी) करण्याचे काम माझ्यावर सोपविले होते. ह्यराज्यसंस्था व धर्मसंस्थाह्ण विषयावर मी मांडणी केली. पाश्चात्त्य विद्वानांची मते देऊन केलेली मांडणी प्रभावी ठरली. माझ्या भाषणानंतर कोणीच प्रतिवाद करेना. सभा विसर्जित होणार इतक्यात विनोबा पुढे आले. माझ्या भाषणाचे सहानुभूतिपूर्वक स्वागत करून त्यांनी नंतर खंडनास प्रारंभ केला. क्रमाक्रमाने माझे सर्व मुद्दे खोडून काढले. माझा सारा युक्तिवाद ढासळून टाकला. अहिंसेच्या तत्त्वज्ञानात उदात्त व भव्य राज्यशास्त्रही असू शकते, याची उत्कृष्ट प्रतीती प्रथमच विनोबांनी आणून दिली. सगळी सभा विनोबांच्या तेजस्वी वक्तृत्वाने स्तीमित झाली. अहिंसेचे शौर्य हीच मानवसमाजाची धारणाशक्ती; शस्त्रसामर्थ्य मानव्यास दुर्बल बनविते व समाजाच्या विनाशाची बीजे रोवते, हा सिद्धांत सांगून दंडाचे वैयर्थ्य विनोबांनी सिद्ध केले.’’
– डॉ. सुनीलकुमार लवटे
drsklawate@gmail.com