पक्षाचे सर्व लोकप्रतिनिधी, पदाधिकारी व निष्ठावान कार्यकर्त्यांना सप्रेम नमस्कार, कमळ हातात धरण्याची सवय असलेल्या आपल्या पक्षाने मनगटावर घडय़ाळ बांधून घेतल्याने आपल्यापैकी बरेचजण अस्वस्थ असल्याचे कानावर आले, म्हणून हा आवाहनरूपी पत्रप्रपंच! विचलित होण्याची काहीही गरज नाही. भलेही सरकारमध्ये आपले सर्वात कमी मंत्री असले, तरीही तुमची सारी कामे करण्यासाठी ते समर्थ आहेत. घडय़ाळाला जवळ केल्यामुळे पोह्यात चवीसाठी टाकण्यात येणाऱ्या पण नंतर प्लेटबाहेर पडणाऱ्या कढीपत्त्याच्या पानांसारखी आपली अवस्था झाली, असे कुणीही समजू नये. आजवर आपले राजकीय वैरी म्हणून ओळखले गेलेले घडीमंत्री तुमच्या क्षेत्रात आले तर सुहास्यवदनाने त्यांच्या कार्यक्रमात सहभागी व्हा पण सवयीप्रमाणे सतरंज्या उचलू नका. ते काम त्यांच्या कार्यकर्त्यांकडून करवून घ्या. त्यामुळे तुम्हाला वरिष्ठ श्रेणी मिळाल्याचा आनंद मिळेल.

संधी साधून काही मेहनती घडीवाले कार्यकर्ते आपल्या पक्षात कसे आणता येतील याचा सतत विचार करा. तुमचा मानसिक कोंडमारा होण्याची शक्यता असल्यामुळे पक्षाने राज्यपातळीवर एक मानसोपचार कक्ष स्थापन केला आहे. या कक्षाशी संपर्क साधून मार्गदर्शन घ्या. मैत्री करून समोरच्या पक्षाला संपवणे हेच आपले धोरण. सध्या त्याचा संक्रमण काळ सुरू आहे. भविष्यात आपलेच एकहाती साम्राज्य पूर्ण देशावर असणार याची जाणीव सतत मनी बाळगा. हसत-खेळत समोरच्याला आपल्यात ओढून त्याची ताकद क्षीण कशी करायची हे तुम्हाला लवकरच शिकवले जाईल. घडीला कमळासोबत आणण्याची ही अचाट कामगिरी फत्ते करून दाखवणाऱ्या आपल्या महाचाणक्य नेत्याची ‘दादा चक्की पिसिंग’ची एक चित्रफीत सध्या फिरवली जात आहे. त्याला प्रत्युत्तर म्हणून दादा व भाऊ एकाच जात्यावर दळण दळत असल्याची एक चित्रफीत तुम्हाला पाठवली आहे. तिचा सर्वत्र प्रसार करा. त्यात बोलीभाषेतल्या ओव्या घालण्याचा अधिकार तुम्हाला देण्यात आला आहे.

घडीवाले तसेच बाणवाले मंत्री तुमच्या भागात आले तर त्यांच्यासमोर उगीच नाकावर वारंवार हात फिरवू नका, या दीर्घकालीन लढाईत आपल्याला त्यांचे नाक कापायचे आहे, हे ध्यानात ठेवा. या सततच्या फूटनाटय़ामुळे निष्ठावंत  शब्दाविषयी लोकांमध्ये तिटकारा निर्माण झाला आहे. खरे निष्ठावंत आपणच हे सिद्ध करण्याची चांगली संधी तुम्हाला पक्षाने उपलब्ध करून दिली आहे. त्यामुळे पक्षनिष्ठा ढळणार नाही, याची सतत काळजी घ्या. फारच वाईट वाटले तर आकाशाकडे बघा, तुम्हाला तेजोमय विश्वगुरूंच्या प्रतिमेचे दर्शन घडेल. यामुळे तुमच्या मनाला निश्चित उभारी येईल. मित्र असो की शत्रू, त्यांची जिरवण्याचे कंत्राट व त्यासाठीची आयुधे आपल्याकडे आहेत. त्यामुळे आपलीच जिरेल अशी शंका घेण्याचे काही कारण नाही. फूटपाडय़ा धोरणांमुळे अनेकांना मंत्री वा तत्सम सत्तापदे मिळू शकली नाहीत, तरी या इच्छुकांना सत्तेवर आपलीच पकड असल्याने सत्ताधीशांच्या थाटात वावरण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. शत्रूला मित्र करून अद्दल घडवणे हा या फूटधोरणाचा एक भाग आहे. त्यामुळे येत्या काळात परिवाराकडून राबवल्या जाणाऱ्या ‘कुटुंब प्रबोधन’ योजनेत प्रत्येकाने सहभागी होऊन या नव्या मित्र पक्षातील कुटुंबांना लक्ष्य करावे व जगातला सर्वात मोठा पक्ष आणखी मोठा कसा होईल, यासाठी प्रयत्न करावेत. तुमची काळजी घेण्यासाठी आम्ही आहोतच. जय हिंद, जय महाराष्ट्र!