माननीय संचालक साहेब, मी आपल्या अधीनस्थ काम करणारा अधिकारी असलो तरी हे पत्र मात्र व्यक्तिगत पातळीवर लिहीत आहे. राज्यात गाढवांची संख्या कमी होत असल्याने त्यांच्या हाताळणीचे काम महिनाभरापूर्वी खात्याने आम्हाला दिले तेव्हा सर्वांनी नाके मुरडली होती. त्यात मीही होतो. ‘असाल तुम्ही पशूचे अधिकारी. म्हणून काय आता गाढवांच्या संगतीत राहाल काय’ या शब्दांत घरच्यांनीही माझी हेटाळणी केली. अतिशय नाराज मनोवस्थेत मी खात्याने तात्पुरत्या स्वरूपात उभारलेल्या गाढव निवारा केंद्रात दाखल झालो. एकूण २४ दिवसांच्या वास्तव्यानंतर आता माझे मत पूर्णपणे बदलले असून गाढवासारखा सच्चा, उमदा, प्रामाणिक, आज्ञाधारक प्राणी या जगात दुसरा नाही अशी माझी ठाम भावना झाली आहे. मथितार्थ हाच की मला आता गाढवांचा लळा लागला असून नोकरीतील उर्वरित कार्यकाळ मी याच पशूसाठी व्यतीत करायचे ठरवले आहे.

तसेही डोके न चालवता जे प्राणी माणसांसाठी राबराब राबतात ते मानवी समूहाला आवडतात. गाढव त्यात सर्वांत श्रेष्ठ आहे. सुरुवातीला मी त्यांना उगीच शिस्त लावण्याचा प्रयत्न केला. नंतर असे लक्षात आले की मुळातच गाढव शिस्तप्रिय आहे. रात्री त्यांना बांधण्यासाठी मी सरकारी खर्चाने भरपूर दोरखंड मागवले. प्रत्यक्षात त्याची गरज पडली नाही. गोठ्यात नेल्यावर त्यातल्या एकाला जरी दोराने बांधल्यासारखे नुसते नाटक केले तरी ते सर्वजण आपण बांधले गेलोय याच स्थितीत रात्र काढतात. हे निरीक्षण बघून मला मारुती चितमपल्लींचा एक लेख आठवला. एकदा रात्री सर्व गाढवे खिंकाळायला लागली. काय झाले ते कळेचना. मी अनेकांच्या पाठीवरून हात फिरवला पण फायदा झाला नाही. तेवढ्यात गेलेली वीज परत आली व त्यांचे खिंकाळणे थांबले. गाढवांना उजेड आवडतो हे तेव्हा लक्षात आले. मी त्यांना रोज सकाळी तपासत होतो. एकाला तपासणीसाठी घेतले की बाकीचे आपसूकच रांगेत उभे राहायचे. इतर जनावरांना तपासताना वा उपचार करताना लोखंडी पिंजरा वापरावा लागतो. शिवाय त्यांच्या मालकांचा आरडाओरडा सहन करावा लागतो. इथे सारे विनासायास पार पडायचे. यावरून हा प्राणी मानवापेक्षा श्रेष्ठ अशीच माझी भावना झाली.

या केंद्रात त्यांच्या पाठीवर वाळूचे ओझे नव्हते. त्यामुळे अस्वस्थ होऊन त्यांच्या आहारावर परिणाम झाल्याचे जाणवताच मी वाळू मागवली आणि ते ओझे पाठीवर ठेवण्यास सुरुवात केली. मग त्यांचा आहार नियमित झाला. इथे आल्यानंतर अनेकांनी गाढविणीचे दूध हवे म्हणून लकडा लावला. माझ्या बुद्धीला ते पटत नव्हते. तरीही एक दिवस मनाचा हिय्या करून मी पिल्लांसोबत बागडत असलेल्या एका गाढविणीजवळ गेलो. हे लक्षात येताच दोन गाढवे समोर आली व त्यांनी पिल्लांना बाजूला केले. मग मी दूध काढायला लागल्यावर सारे मायेच्या नजरेने माझ्याकडे बघत असल्याचे जाणवले. त्यांना नैसर्गिक वाटावे म्हणून केंद्रात काही उकिरडे तयार केले. जेणेकरून त्यांना मागील पायाने ते उकरता यावे. काही दिवस गाढवे तिथे गेली पण नंतर त्यांनी जाणे बंद केले. का याचा शोध मी सध्या घेत आहे.

हा प्राणी अजिबात मख्ख चेहऱ्याचा नाही. समोरचे दोन पाय वर करून तो आनंद व्यक्त करतो. एकूणच गाढवाची वैशिष्ट्ये अभ्यासण्याचा निर्णय मी घेतला आहे. यापुढे मी उभ्या आयुष्यात कोणत्याही मूर्ख माणसाची गाढवाशी तुलना करणार नाही. या अभ्यासासाठी मला इतर जनावरांच्या संवर्धन व देखरेखीच्या कर्तव्यातून मोकळीक द्यावी ही विनंती.