आहे त्यापेक्षा मोठे पद मिळावे अशी मनीषा अंगी बाळगण्यात काहीही गैर नाही. त्याच्या पूर्तीसाठी थोडेफार प्रयत्न (म्हणजे नेत्याची तारीफ हो) करणे केव्हाही योग्यच. त्यामुळे देशाच्या महामहिमांनी विश्वगुरूंना युगपुरुष संबोधणे अगदी बरोबर. आता ते ज्या पदावर आहेत ते असो वा त्यांना नंतर जे पद हवे आहे ते असो. दोन्ही पदे घटनात्मक. तरीही ती मिळवण्यासाठी नेतृत्वाची मर्जी राखणे आलेच. त्यासाठी उपाधीबहालीचा आधार घ्यावाच लागणार. तसा तो त्यांनी घेतला म्हणून गहजब उठवणे अत्यंत चुकीचे. एक युग हजार वर्षांचे. विश्वगुरू तर अवघ्या काही वर्षांपूर्वी उदयाला आले. त्यामुळे पदवी देण्याची घाई का असले प्रश्नही निर्थक. गुरूंची कारकीर्द आता सुरू झाली हे खरे असले तरी त्यांनी पहिल्याच टप्प्यात एवढे मोठे काम करून ठेवले की पुढची हजार वर्षे लोक त्यांची आठवण काढतील. ही दृरदृष्टी ठेवूनच महामहीम बोलले. युगपुरुष नेहमी कामाचे ठसे उमटवत पुढे जात असतात. ते ओळखून भाकीत करणे प्रत्येकालाच जमते असे नाही. मूळचे समाजवादी असलेल्या महामहिमांनी ती किमया साधली हे साऱ्यांना मान्यच करावे लागेल. देशाचे सर्वोच्च पद रिक्त व्हायला अजून बराच अवकाश आहे हे मान्य. पण आतापासून कौतुकाचा सेतू बांधायला सुरुवात करणे केव्हाही उत्तम असा विचार त्यांच्या मनाने केला असणार. त्याला पार्श्वभूमीही तशीच. आधीच्या महामहिमांनी विश्वगुरूंना ‘विष्णूचा अवतार’ म्हटले. ही उपाधी तशी भारतापुरती सीमित. जगाच्या कल्याणाचा ध्यास घेतलेल्या गुरूंवर एकप्रकारे अन्याय करणारी. त्यामुळेच कदाचित त्यांची सर्वोच्च पदावर जाण्याची संधी हुकली. हा इतिहास लक्षात घेऊन विद्यमान महामहिमांनी अगदी योग्य शब्द शोधला. त्यामुळे त्यांचे कौतुक करावे तेवढे थोडेच. त्यांनी राष्ट्रपित्याला महापुरुष संबोधले व त्यापेक्षा वरची पदवी विश्वगुरूंना दिली हा महात्म्याचा अपमान नाही का असले प्रश्न तर आताच्या घडीला नकोच नको. महात्म्याची कारकीर्द हा भूतकाळ झाला. आशावादी राहायचे असेल तर भविष्यकाळाकडे बघणे शिकायला हवे.
नेमका तोच धागा पकडून महामहीम बोलले. यातून दिसते ते त्यांचे चातुर्य. त्यामुळे सध्या तरी त्यांनी सर्वोच्च पदाची आशा बाळगायला काहीही हरकत नाही. या पदावर बसलेल्या व्यक्तीने कुणा राजकारण्याची अनावश्यक तारीफ करू नये, घटनेच्या चौकटीत राहून रचनात्मक बोलावे, राजकारणावर भाष्य करू नये. हे सारे संकेत आता इतिहासजमा झालेले. सध्याच्या अमृतकाळात दूरदृष्टी दाखवत देशाला महासत्ता बनवणाऱ्या नेत्याचा गौरव सर्वानी एका सुरात करणे योग्यच. त्यामुळे महामहिमांनी जे केले ते बरोबरच. त्यात त्यांचा स्वार्थ आहे, सर्वोच्च पदाची लालसा आहे असा तर्क त्यांच्या विधानातून काढणे विश्वगुरू ऊर्फ युगपुरुषाच्या कामगिरीवर अन्याय करण्यासारखे. त्यामुळे त्यांचा हेतू काहीही असला तरी नेतृत्वाच्या कर्तृत्वाचे मूल्यमापन त्यांनी योग्य शब्दांत केले हेच सत्य असे सर्वानी समजावे. आधीचे महामहीम परिवारातून समोर आलेले. पुराणकथांचे दाखले देण्यात या परिवाराचा हातखंडा. त्यामुळे त्यांची उपाधी विष्णूपुरती सीमित राहिली पण त्यांनी उल्लेखलेला दहावा अवतार काही त्यांच्या फळाला आला नाही. त्यांच्यासारखा विजनवास वाटय़ाला येऊ नये म्हणून विद्यमानांनी अत्यंत समर्पक व पुराणकथेशी काहीही संबंध नसलेला शब्द शोधून काढला त्याबद्दल त्यांचे अभिनंदन. आता या महामहिमांचा मार्ग प्रशस्त झाला असून मुगल गार्डनमध्ये सकाळची फेरी मारण्याचे त्यांचे स्वप्न लवकरच पूर्ण होईल अशी आशा बाळगायला हरकत नाही. बिच्चारे जुने महामहीम, ‘वनलायनर’साठी प्रख्यात असूनही आपल्याला हा शब्द का सुचला नसेल म्हणून आता हळहळत असतील!