‘अरे आपण वाघाच्या वंशातले आहोत हे विसरला की काय? शिकार करायची सोडून माणसांच्या चपला चोरताना तुला लाज कशी वाटली नाही? आपल्या या कृत्याने जंगलाच्या राजवंशाला बट्टा लागतो याची साधी कल्पनाही तुला का आली नाही?’ पुण्यानजीकच्या आंबेगावजवळ उसाच्या फडात गोलाकार करून बसलेले बिबटे मध्यभागी मान खाली घालून उभ्या असलेल्या तरुण सहकाऱ्यावर प्रश्नांचा भडिमार करत होते. त्याच्या बाजूलाच चपलांचे तीन जोड पडले होते. त्याकडे तुच्छतेने बघत एक ज्येष्ठ गुरगुरला. ‘हे मान्य की आपला समूह सध्या स्थलांतरितांसारखे जीवन जगतो. आपली हक्काची जागा असलेले जंगल आता राहिले नाही. त्यामुळे या फडात आश्रय घ्यावा लागला. त्यामुळे माणसांच्या सहवासात आपण आलो. म्हणून काय त्यांच्यासारख्या चोरीच्या सवयी लावून घ्यायच्या? एकेकाळी याच जमातीतील मुले वडिलांनी चप्पल घ्यायला दिलेल्या पैशातून सिनेमा बघता यावा म्हणून आधी मंदिरांकडे धाव घ्यायची व चपला चोरायची.

आता या वस्तूचा सुकाळ झाल्याने कुणीही तसे करत नाही. जे माणसांनी त्यागले ते अंगीकारण्याची तुझी हिंमत झालीच कशी? आपण मांसभक्षक आहोत. शौर्य दाखवून शिकार करायची व मांस मिळवायचे हेच आपले वैशिष्टय़. गाय, बैल, शेळी, मेंढी, काहीच नाही मिळाले तर साधी कोंबडी मारली तरी चालले असते. या कृतीला कुणीही चोरी म्हणत नाही, पण चपला उचलल्या की ती माणसाच्या दृष्टीने चोरी ठरते, एवढेही कळले नाही का तुला? एकेकाळी चपला चामडय़ांपासून बनायच्या. आता रेक्झिनचा जमाना आला. त्यात चामडे आहे, किमान ते चघळता तरी येईल म्हणून तू चप्पल चोरलीस का? सांग ना?’ मध्ये उभा असलेला बिबटय़ा तरीही गप्पच.

Concerned about the security of Indians in Iranian custody
जहाजावरील कर्मचाऱ्यांचे कुटुंबीय चिंतेत; इराणच्या ताब्यातील भारतीयांच्या सुरक्षेची चिंता
traffic police action against goon nilesh ghaiwal
गुंड नीलेश घायवळला वाहतूक शाखेचा दणका, मोटारींना काळ्या रंगाच्या काचांचा वापर केल्याप्रकरणी दंड
young woman saved a caged dog in a burning building shocking video goes viral on social media
जीवाची पर्वा न करता तरुणीने वाचवला पेटत्या इमारतीमध्ये फसलेल्या कुत्र्याचा जीव, VIDEO पाहून येईल अंगावर काटा
istanbul fire
इस्तंबूलच्या नाईटक्लबमध्ये भीषण आग, २९ जणांचा होरपळून मृत्यू!

मग दुसऱ्या ज्येष्ठाने जबडा मोठा करून त्याची खरडपट्टी काढायला सुरुवात केली. ‘चोरीचा आळ हा किती गंभीर आरोप आहे याची कल्पना आहे का तुला? मग मानवजातीत व आपल्यात फरक काय राहिला? ते चॅनलवाले ‘चप्पलचोर बिबटय़ा’ म्हणून दिवसभर बातमी चालवत आहेत. त्यामुळे सगळय़ांना किती बदनामी सहन करावी लागत आहे याची कल्पना तरी आहे का तुला? तुझ्या या कृत्याने आपण भटक्या कुत्र्यांच्या पातळीवर येऊन पोहोचलो याची तरी जाणीव आहे का तुला? अरे, आपण रुबाबात जगणारे चपळ प्राणी. आपण दिसलो तरी माणसे दूर पळतात असा आपला दरारा. त्यालाच नख लावले ना तू. झटपट कृती करण्याआधी सुद्धा क्षणकाळ विचार करावा हे शिकवले होते ना तुला. मग तुझी अक्कल काय शेण खायला गेली होती का? स्थलांतरणामुळे व माणूस चतुर झाल्याने शिकारीचे वांधे झाले हे मान्य. म्हणून काय अशा फुटकळ वस्तू चोरायच्या? आपल्या प्रजातीची काही प्रतिष्ठा आहे की नाही? मारे, चपला घेऊन आला. त्याचे करणार तरी काय तू? त्या आपल्या पायाच्या मापाच्या नाहीत हे सुद्धा तुला सुचले नसेल तर तो पराभव आहे आपला. ते काही नाही. या चपला तू जिथून आणल्या तिथे परत नेऊन ठेव. आणि जोवर तू मर्दासारखी शिकार करत नाही तोवर फडातल्या या आपल्या समूहात परत यायचे नाही. चोरांनाही उजळमाथ्याने वावरू देणाऱ्या मानवजातीतले आपण नाही हे कायमचे लक्षात ठेव.’ हा आदेश ऐकताच ओशाळलेला बिबटय़ा चपलांचे जोड तोंडात घेऊन तिथून परत निघाला.