सात दशकांची प्रदीर्घ कारकीर्द; कन्नड, तेलुगु, तमिळ आणि हिंदी अशा विविध भाषांतील चित्रपट क्षेत्रांत लीलया संचार, २०० हून अधिक चित्रपटांत अभिनय, पद्माश्री-पद्माभूषणने सन्मान अशी परिपूर्ण कारकीर्द असलेल्या आणि ‘अभिनय सरस्वती’ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या बी. सरोजा देवी यांचे नुकतेच निधन झाले. पुरुष अभिनेत्यांभोवती संपूर्ण चित्रपट बेतला जाण्याच्या काळातही सरोजा देवी कन्नड सिनेमातील ‘पहिली महिला सुपरस्टार’ म्हणून ओळखल्या गेल्या, यापरता त्यांच्या अभिनयक्षमतेचा आणि लोकप्रियतेचा दाखला कोणता असू शकतो?
सरोजा देवींचा जन्म स्वातंत्र्यपूर्व काळातला- १९३८ सालचा. वडील- भैरप्पा हे मैसूरमध्ये पोलीस अधिकारी होती. कुटुंबातील चौथी मुलगी असलेल्या सरोजा यांचे शिक्षण बेंगळूरुतील ‘सेंट तेरेसा गर्ल्स हायस्कूल’मध्ये झाले. बहुतांश दाक्षिणात्य कुटुंबांत मुलींना लहानपणीच शास्त्रीय नृत्याचे प्रशिक्षण देण्याची प्रथा असे. सरोजा देवींना त्यांच्या वडिलांनी नृत्याभ्यासासाठी प्रोत्साहन दिले. नृत्याचा कोणताही कार्यक्रम असो, भैरप्पा नेहमी छोट्या सरोजाबरोबर असत. तिचे घुंगरू बांधून देण्यापासून सततच्या सरावामुळे सुजलेल्या पायांना मालीश करण्यापर्यंत सारे काही ते करत. सरोजा यांना चित्रपटाची पहिली ऑफर वयाच्या तेराव्या वर्षी बी. आर. कृष्णमूर्ती यांनी दिली. मात्र त्या वेळी त्यांनी नकार दिला. पुढे वयाच्या सतराव्या वर्षी १९५५ मध्ये ‘महाकवी कालिदास’ या कन्नड चित्रपटातून त्यांनी चित्रपट क्षेत्रात पदार्पण केले. यात त्यांनी साहाय्यक कलाकाराची भूमिका केली. पहिल्याच चित्रपटातून त्यांनी स्वत:ची स्वतंत्र ओळख निर्माण केली.
त्यांचे अभिनय कौशल्य हेरून एम. जी. रामचंद्रन (एमजीआर) यांनी त्यांना ‘नदोदी मन्नान’ या चित्रपटात मुख्य भूमिका दिली. या चित्रपटाने त्यांना तमिळनाडूत प्रचंड लोकप्रियता मिळवून दिली. त्यातूनच पुढे त्यांना हिंदी चित्रपटांत संधी मिळाली. ‘पैगाम’ हा त्यांचा पहिला चित्रपट ठरला. त्यात दिलीप कुमार मुख्य भूमिकेत होते. पुढे त्यांनी राजेंद्र कुमार, सुनील दत्त, शम्मी कपूर या अभिनेत्यांसह हिंदी चित्रपटांत भूमिका केल्या. तमिळ चित्रपटांत काम करताना त्यांनी मंदोदरी, सुभद्रा, शकुंतला अशी पौराणिक पात्रेही साकारली. त्यांनी अभिनय केलेली अनेक गीते त्या काळी लोकप्रिय ठरली. १९५८ ते १९६६ या काळात एमजीआर आणि सरोजा यांच्या मुख्य भूमिका असलेले तब्बल २६ चित्रपट हिट ठरले.
पुढे १९६८च्या सुमारास के. आर. विजया, जयललिता यांसारख्या नव्या अभिनेत्रींचा तमिळ चित्रपटसृष्टीत प्रवेश झाला आणि एमजीआर व सरोजा यांचे एकत्रित चित्रपट येणे बंद झाले. पेशाने अभियंता असलेल्या श्री हर्षा यांच्याशी त्या १९६७मध्ये विवाहबद्ध झाल्या. विवाहानंतर अभिनेत्रीची कारकीर्द संपुष्टात येते, असे मानले जाण्याच्या त्या काळात सरोजा यांनी विवाहानंतरही अभिनयातील कारकीर्द सुरू ठेवली. १९६० आणि ७०च्या दशकांत त्या दक्षिणेतील फॅशन आयकॉन ठरल्या. त्यांच्या साड्या, केशरचना, दागिने एवढेच नव्हे, तर त्यांच्या लकबींचेही अनुकरण केले जात असे. २०१९मध्ये प्रदर्शित झालेला ‘नटसार्वभौम’ हा त्यांचा अखेरचा चित्रपट ठरला. त्यात त्यांनी पाहुण्या कलाकाराची भूमिका केली होती.
सरोजा यांचा पडद्यावरील सहज वावर आणि पात्राच्या बारकाव्यांचा अभ्यास करून ते भूमिकेत उतरविण्याचे कौशल्य यामुळे त्यांचा अभिनय प्रेक्षक आणि समीक्षकांनाही भावला. त्यांच्या पुरस्कारांची यादी लांबलचक आहे. त्यात केंद्र सरकारचा जीवनगौरव पुरस्कार, पद्माश्री, पद्माभूषण यासह राज्य सरकारच्याही अनेक पुरस्कारांचा समावेश आहे. बी. सरोजा देवी यांच्या निधनाने विविध भाषांत प्रदीर्घ कारकीर्द घडविलेल्या अभिनेत्रीच्या प्रवासाला पूर्णविराम मिळाला.