रील्स, यूटय़ूब, टिकटॉकवर अहोरात्र हलती चित्रे पाहूनसुद्धा आजच्या तरुणांना ‘रामसे बंधूंचे चित्रपट’ म्हणजे काय, हे माहीतच नसू शकते.. याउलट, आदल्या पिढीतल्या सर्वाकडे (‘पिक्चर’ पाहिले नसतील तरीही) या रामसेपटांबद्दलचे मतप्रदर्शन तयार असते! सैतानी, हैवानी शक्तीचे दानव किंवा आत्मे, साध्यासुध्या माणसांना त्यांचा होणारा त्रास, मग सुष्टांचा दुष्टांवर विजय असे कथानक असले आणि ओघाने अंगप्रदर्शन वगैरे मसाला असला तरी हे चित्रपट लक्षात राहात ते त्यामधील दृश्यांमुळे! प्रेक्षकांच्या (किमान तेव्हाच्या प्रेक्षकांच्या तरी) अंगावर येणारी, थरकाप उडवणारी मोजकी दृश्ये या चित्रपटांत असत. उदाहरणार्थ, ‘बन्द दरवाजा’ नावाच्या चित्रपटातले ‘नेवला’ हे आडदांड सैतानी पात्र हवेत उंच उडी मारून तीरासारखे खाली येते आणि रस्त्याशी समांतर अवस्थेत, धावत्या मोटारगाडीच्या पुढल्या काचेवर ठोसा देऊन काच फोडते, असे एक दृश्य आणि दुसरे – एका माणसाची (नायकाची) मानगुट ‘नेवला’ने पकडली आहे, नेवला कधीही त्याच्या नरडीचा घोट घेऊ शकतो, पण त्याआधी हात हलवत तो त्याच्या भक्ष्याला खेळवतो आहे!

ही दोन्ही- किंवा अशी अनेक (उदा.- ‘दो गज जमीन के नीचे’मधील सपकन जमिनीखालून बाहेर येणारा सैतान) दृश्ये रामसे बंधूंपैकी ज्यांनी घडवली, ते गंगू रामसे ७ एप्रिलच्या रविवारी वारले. काळाच्या पडद्याआड आधी (२०१० मध्ये)  निर्माते केशू रामसे गेले, मग दिग्दर्शक तुलसी रामसे (२०१८), सहनिर्माते व दिग्दर्शक श्याम रामसे (२०१९), लेखक व सर्वात थोरले बंधू कुमार (२०२१) असा क्रम लागला आणि आता घरच्या चित्रपटांचे छायालेखन करणारे गंगू रामसेही गेले. फतेहचंद यू. रामसे (मूळचे आडनाव रामसिंघानी) यांच्या सात पुत्रांपैकी या पाचजणांखेरीज, अर्जुन आणि किरण रामसे हयात आहेत, पण ‘रामसेपटां’चा जमाना मात्र आता सरला आहे. हे सातही भाऊ अक्षरश: घरचे कार्य असल्यासारखे चित्रपटासाठी राबत. नवनव्या कल्पना कुठूनकुठून आणत, पडद्यावरही साकार करत. अलिबाग, मुरुड-जंजिरा, इगतपुरी अशा ठिकाणी महिनाभर पडाव टाकून चित्रीकरण होई.

मराठीतील सर्व स्तंभ बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Loksatta vyaktivedh gangu ramsay ramsay brothers film gangu ramsay passed away amy
First published on: 10-04-2024 at 00:12 IST