महिला सक्षमीकरण चळवळ पुढे नेण्यासाठीची कृतिशीलता ज्या अनेकांनी सातत्याने दाखवून दिली, त्यांत कोल्हापूरच्या कांचनताई परुळेकर या अग्रस्थानी. २० हजारावर महिलांना त्यांनी उद्यामशीलतेचे धडे दिले, स्वावलंबनाची पुंजी मिळवून दिली.
कधीकाळी कांचन बाळकृष्ण परुळेकर या चुणचुणीत मुलीचे प्रभावी वक्तृत्व ऐकून खासदार डॉ. व्ही. टी . ऊर्फ काकासाहेब पाटील प्रभावित झाले. पालकांशी बोलून त्यांनी तिला आपल्या घरी आणले. तेव्हापासून शाळकरी कांचनचे जीवनच बदलले. या मुलीचे वडील काँग्रेसचे पदाधिकारी, हरिजन सेवक संघाचे कार्यकर्ते. पुढे ताराराणी विद्यापीठाचे संस्थापक डॉ. व्ही. टी. पाटील व सरोजनीदेवी या उभयतांच्या त्यागातून उभ्या असलेल्या सरोजनीदेवी विश्वनाथ विश्वस्त मंडळाचा प्रकल्प १९९२ मध्ये ‘स्वयंसिद्धा’तून साकारला.
एनसीसी अधिकारी, नंतर बँकेतील व्यवस्थापक अशा जबाबदाऱ्या नेटकेपणाने पार पडल्यानंतर, कांचनताईंचे जीवन अखेरपर्यंत ‘स्वयंसिद्धा’मय होऊन गेले. अर्थकारणातून महिला सबलीकरणाची वाट ‘स्वयंसिद्धा’ने चोखाळली. आई उद्याोजिका बनली तर पुढली पिढीही उद्याोजक बनेल, या विश्वासाने स्त्रियांमध्ये व्यावसायिक कौशल्य व वर्तणूक-कौशल्य पेरण्यास त्यांनी प्रारंभ केला. कांचनताईंच्या कुशल संघटनामुळे निराधार, गरीब महिला, ग्रामीण स्त्रियांपर्यंत हे प्रशिक्षण पोहोचू लागले. कुष्ठरोगबाधित महिलांनाही प्रशिक्षण मिळाले. कांचनताई उत्तम प्रशासक होत्या. अभिनव कल्पना राबवण्यात आणि पुढच्यांच्या हाती सोपवण्यातही त्या वाकबगार असल्याने कार्य वाढू लागले. त्यांच्याकडे प्रशिक्षण घेऊन बाहेर पडणाऱ्या सामान्य महिलांमध्ये आत्मविश्वास निर्माण होऊन त्या समर्थ उद्याोजिका बनल्या. सुरुवातीच्या १३६ स्त्रियांची संख्या वाढत जाऊन आजघडीला हजारावर शहरी तसेच ३० हजार ग्रामीण महिला व शेकडो उत्तम कार्यकर्त्या यांचा कोश विणला गेला आहे. कांचनताईंनी १९९४ मध्ये ‘स्वयंप्रेरिका महिला सहकारी औद्याोगिक संस्था’ची स्थापना केली, तर ग्रामीण जनतेला पत, प्रतिष्ठा आणि पैसा प्राप्त करून देण्यासाठी ‘व्ही. टी. पाटील फाऊंडेशन’ची स्थापन केले. गेली तीन दशके ‘स्वयंसिद्धा’ संचालिका म्हणून या तिन्ही संस्थांतील संघटना, बचत गट यांचे बळकटीकरण, त्यांचे आर्थिक स्वावलंबन, त्यांच्या आरोग्याची काळजी, सातत्याने अनौपचारिक पद्धतीने शिक्षण देत राहून त्यांच्यात सामाजिक भान जागृत करणे यासाठी त्या नानाविध उपक्रम राबवत राहिल्या. ‘स्वयंप्रेरिका’ने १५ टक्के लाभांश आणि साडेतीन टक्के रिबेट देऊन आर्थिक प्रगतीचा आलेख उंचावत ठेवला. वारणा भगिनी मंडळ, भागिरथी महिला संस्था अशा काही अन्य संस्थांनाही त्यांनी भरीव मदत केली. वारणा भगिनी मंडळाच्या प्रकल्प उभारणीचे संशोधनपर काम पाहून नाबार्ड, वर्ल्ड बँकही प्रभावित झाली.
नातेसंबंध, त्यातील लागेबांधे यापासून कटाक्षाने दूर राहून कांचनताईंनी संस्थात्मक काम करताना जात, धर्म, पंथ, आर्थिक परिस्थिती, पक्ष- संघटना निरपेक्ष कार्य केले. विधायक कामांवर भर दिला. या व्रतस्थ समाजसेवेची दखल राज्यातील अनेक सेवाभावी संस्थांनी घेऊन त्यांना पुरस्काराने सन्मानित केले. महिला सशक्तीकरणाचा दुवा कांचनताईंच्या निधनाने कायमचा पडद्याआड गेला असला, तरी त्यांचे कार्य चिरंतन प्रेरणादायी राहील.