‘लस्कर पुरस्कार’ हा जगभरातील वैद्याकीय किंवा आरोग्यविषयक संशोधक आणि सार्वजनिक आरोग्यसेवा किंवा त्यासाठीचे संस्थात्मक कार्य यांतून निवड करणारा पुरस्कार वैद्याकीय क्षेत्रात ‘अमेरिकन नोबेल’ म्हणून ओळखला जातो, तो केवळ मोठ्या रकमेमुळे (दरवर्षी चारपैकी तीन विभागांसाठी प्रत्येकी अडीच लाख डॉलर) नव्हे. सन १९४६ पासून दिल्या जाणाऱ्या या पुरस्काराची प्रतिष्ठा वर्षागणिक वाढतेच आहे. भारतातून फक्त एकदाच – १९५७ साली हा पुरस्कार वैद्याकीय सेवेसाठी मुंबईच्या केईएम रुग्णालयातील डॉ. रुस्तम जे. वकील यांना मिळाला होता. काही आफ्रिकी व आशियाई अपवाद वगळता हे पुरस्कार युरोप व अमेरिकेतच मिळत राहिले; मात्र तेवढ्याने त्याचे महत्त्व कमी होत नाही. यंदा मूलभूत वैद्याकीय संशोधन आणि आरोग्यविषयक संशोधन या दोन विभागांतील पुरस्कार एकंदर पाच जणांना विभागून मिळाले, पण दर एक वर्षाआड दिला जाणारा- सार्वजनिक आरोग्यसेवेतल्या कारकीर्दीचा गौरव करणारा पुरस्कार एकाच व्यक्तीला देण्याचे औचित्य निवडकर्त्यांनी दाखवले. या व्यक्ती म्हणजे डॉ. ल्यूसी शॅपिरो.
आपल्या शरीरातील अतिसूक्ष्म जिवाणू म्हणजेच बॅक्टेरिया प्रथिने विभाजन करतात आणि मग ही प्रथिने निरनिराळ्या संरचनांत साठवली जातात, त्यातून अधिक प्रगत पेशी तयार होतात, हे वैश्विक (यीस्टपासून मानवापर्यंत) सत्य सर्वांनाच माहीत असते, पण ही प्रक्रिया कशी होते- याचा थांग लावण्यासाठी डॉ. ल्यूसी शॅपिरो यांचे संशोधन गेली कैक वर्षे सुरू होते. विशेषत: या बॅक्टेरियांमुळे प्रथिनांची संरचना कशी होते, यापुढला प्रश्न म्हणजे एका रेषेतल्या जनुकीय कोडपासून अख्ख्या शरीरात जैवरासायनिक क्रियांचे त्रिमित जाळे कसे काम करू लागते, यावर त्यांनी संशोधन केले. हे संशोधन रचनांबाबत अधिक होते, आणि ते रसायनशास्त्रीय स्वरूपाचे होते, कारण ल्यूसी शॅपिरो या वैद्याकीय डॉक्टर नसून कार्बनी रसायनशास्त्रातल्या पीएच.डी.धारक आहेत. त्यांनी १९९० च्या दशकाच्या उत्तरार्धात केलेल्या संशोधनातून, अतिसूक्ष्म जिवाणूंना केवळ ‘विकरांचे – अर्थात एन्झाइमचे- वाहक’ एवढेच समजणाऱ्या तोवरच्या कल्पनेला पहिल्यांदा धक्का बसला. पेशीचक्राच्या नियमनात सहभागी असलेली प्रथिने पेशी विभाजनापूर्वी गतिमान, नियंत्रित पद्धतीने पेशीच्या ध्रुवांवर प्रवास करतात हेही त्यांनी सिद्ध दाखवले. यातून पुढे, प्रथिनांच्या रेणवीय रचनेला लक्ष्य करून उपचारपद्धती शोधणे सोपे झाले. प्रतिजैविकांच्या दुष्परिणामांचा अभ्यास यामुळे अधिक चोखपणे करता आलाच, पण अलीकडल्या काळात जगाला वैद्याकीय वरदान ठरलेल्या करोना लशीचा शोध हाही अप्रत्यक्षपणे का होईना, पण ल्यूसी शॅपिरो यांच्या संशोधनावर आधारलेला ठरतो.
ल्यूसी शॅपिरो यांना चित्रकला शिकण्यात फार रस होता. न्यू यॉर्कमध्येच १९४० साली जन्मलेल्या ल्यूसी वयाच्या सतराव्या वर्षापर्यंत चित्रकला शिकल्यासुद्धा. जैवरसायनशास्त्रज्ञ थिओडोर शेडलोव्हस्की यांनी ल्यूसी यांचे चित्र एका समूह-प्रदर्शनात पाहून, तिथेच त्यांना गाठून ‘रचनांचा इतका विचार करणाऱ्या तुमच्यासारख्या हुशार तरुणांनी शास्त्रीय संशोधन केले पाहिजे’ हे पटवून दिले. याच क्षेत्रात पुढे हार्ले मॅकअॅडम्स हे जन्माचे जोडीदारही ल्यूसी यांना भेटले.
आज ल्यूसी शॅपिरो या स्टॅन्फर्ड विद्यापीठातील ‘बेकमॅन सेंटर फॉर मॉलेक्युलर अॅण्ड जेनेटिक मेडिसिन’ च्या प्रमुख आहेत. वय पंचाऐंशी झाले तरी, संशोधक विद्यार्थ्यांना त्यांचे मार्गदर्शन मिळत असते.