अभिजातता टिकवायची कशी, जातिभेदांनी बरबटलेल्या समाजात ‘शास्त्रीय नृत्यप्रकार’ म्हणून कशाला मान्यता मिळण्याची शक्यता नव्हती, असा काळ सरल्यावर, आता लोकशाहीच्या आणि मानवी समतेसारख्या संकल्पनांच्या प्रकाशात ‘शास्त्रीय, अभिजात नृत्यशैली’चा पुनर्शोध घ्यायचा कसा आणि त्या नृत्यप्रकाराचे शास्त्रोक्त प्रमाणीकरण करायचे कसे, या प्रश्नांना थेट भिडणाऱ्यांमध्ये मायाधर राऊत यांचाही समावेश होता. ‘ओडिसी असा काही निराळा नृत्यप्रकार नाही- हे सारे भरतनाट्यमचेच उपप्रकार’ असा दावा खुद्द भरतनाट्यमच्या ‘संशोधक’ आणि गुरू रुक्मिणीदेवी अरुंडेल यांनी केलेला असताना, ‘नाही, आमचा ओडिसी हा निराळा नृत्यप्रकारच आहे आणि त्यालासुद्धा शास्त्रीयच आधार आहे’ असे सिद्ध करण्याची धमक दाखवणाऱ्या पाच जणांपैकी मायाधर राऊत हे वयाने सर्वांत धाकटे, पण सर्वाधिक उत्साही आणि योजक. त्यांच्या निधनामुळे, ओडिसी नृत्याचा अभिजात, शास्त्रीय दर्जा स्वप्रयत्नाने खेचून आणणाऱ्यांपैकी अखेरच्या इतिहासपुरुषाचा अस्त झालेला आहे.

केलूचरण महापात्र, देबप्रसाद दास, रघुनाथ दत्ता आणि पंकजचरण दास यांच्यासह मायाधर राऊत यांनी ओडिसी नृत्याचे प्रमाणीकरण १९५९ मध्ये केले. हे सारे जण ओडिसी नृत्यपरंपरेत शिकलेले होते आणि इतरांनाही शिकवत असल्याने ते गुरूसुद्धा होते. पण प्रत्येकाच्या शैलीत काही ना काही फरक दिसे. हा फरक मिटवून ओडिसीने एकसंधपणे उभे राहायला हवे, अशी कळकळ या सर्वांना वाटण्याचे तात्कालिक कारण जरी रुक्मिणीदेवींचा नकार हे असले; तरी पत्रकार आणि खासदार लोकनाथ मिश्रा यांचे संघटनकौशल्यही त्यामागे होते. या सर्व गुरूंना त्यांनी एकत्र आणले. मायाधर यांनी सुचविले – सकाळी ९ ते १२ या वेळात प्रत्येक गुरूने सादरीकरण करायचे, या प्रत्येक सादरीकरणातून ‘अभिनयदर्पण’ आणि ‘नृत्यचंद्रिका’ या ग्रंथांशी काय अधिक मिळतेजुळते आहे, हे ठरवायचे आणि जे ठरेल ते प्रमाण मानायचे. भरतनाट्यमप्रमाणेच ओडिसीलाही ‘नाट्यशास्त्रा’, अभिनयदर्पण आणि नृत्यचंद्रिका या ग्रंथांचा आधार आहे, म्हणून तर ते ‘शास्त्रीय’!

मायाधर राऊत १९३० मध्ये जन्मले, तेव्हा ‘महारी’ स्त्रियांची नृत्यशैली आणि किशोरवयीन मुलग्यांचे ‘गोटिपुआ’ नृत्य यातून ओडिसी नृत्यशैली तगून राहिली होती. ब्रिटिशांच्या आणि बंगाल्यांच्याही वर्चस्वामुळे भडक नाट्यप्रकार येऊ पाहात होते. अशा काळात मायाधर ‘गोटिपुआ’ शिकले, मग खुद्द रुक्मिणीदेवींनी त्यांना मद्रासच्या ‘कलाक्षेत्रा’त नेल्यामुळे ग्रंथांचा अभ्यास त्यांनी केला. परत येऊन केलूचरण महापात्रांचा आदर्श ठेवून तेही ‘ओडिसी नृत्य’ (हे नाव या शैलीला १९४८ मध्ये दिले ते कालीचरण पट्टनाईक यांनी) शिकवू लागले. वास्तविक याच शैलीपासून भारतीय ‘बॅले’कार उदयशंकर आदींनीही प्रेरणा घेतली होती. पुढे १९६७ मध्ये ‘बॅले’चे शिक्षण घेण्यासाठी मायाधर राऊत दिल्लीला आले. तिथे ‘नृत्य निकेतन’ नावाची नवी संस्था सुरू होणार होती, त्यांच्या विनंतीवरून तिथे शिकवण्यासाठी राऊत यांनी कुटुंबासह दिल्लीत बस्तान बसवले. पुढे ‘श्रीराम भारतीय कला केंद्रा’त त्यांनी २५ वर्षे नृत्यविद्यादान केले. संगीत नाटक अकादमी पुरस्कार (१९८५) आणि पद्माश्री (२०१०) यांनी सन्मानित झालेले राऊत, १९८४ पासून ज्या ‘एशियाड व्हिलेज’मध्ये राहात होते, पण २०२० मध्ये नोटिसा बजावून केंद्र सरकारने या भागातील कलावंतांना बेघर करण्याचा सपाटा लावला, त्याला दाद न देणाऱ्या राऊत यांचे सामानसुमान २०२२ मध्ये रस्त्यावर फेकण्यात आले होते. तेव्हापासून ‘सर्वोदय एन्क्लेव्ह’मध्ये कुणाच्या तरी तळघरात ते मुलीसह भाड्याने राहात.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.