सीतास्वयंवराच्या प्रसंगात कथानायक वाकून शिवधनुष्य हाती घेतो आणि ते धनुष्य मोडते, यासारखा प्रसंग बाहुल्यांच्या खेळात- त्यातही ज्या खेळामध्ये बाहुल्यांच्या हालचाली खालून- काठय़ा अथवा तारांद्वारे केल्या जातात अशा ‘काठी कंधेई नाच’ या प्रकारात घडवून आणताना मागुनिचरण कुंअर किती उत्तुंग दर्जा गाठत आणि मागुनिचरण यांच्या प्रतिभेमुळेच त्या लाकडी बाहुलीचे कंबरेपासूनचे पाय, गुडघे, धड आणि हात यांच्या हालचाली कशा ‘साक्षात प्रभु रामासारख्या’ होत आणि ते धनुष्यही कसे मोडे याच्या आठवणीच आता ओदिशातल्या दोन पिढय़ांकडे उरतील. ‘पद्मश्री’ आणि केंद्रीय संगीत नाटक अकादमी पुरस्कार मिळालेले  कुंअर शनिवारी, वयाच्या ८७ व्या वर्षी निवर्तले. ओदिशातली तरुण पिढी ‘रील्स’च्या आहारी जाण्यापूर्वीच्या दोन पिढय़ांना त्यांची प्रतिभा माहीत आहे. कधीकाळी केवळ स्थानिक पातळीवर होणाऱ्या ‘काठी कंधेई’च्या लोककलेला कलाप्रकाराचा दर्जा दिला तो मागुनिचरण यांनीच. बाहुल्यांच्या या खेळासाठी त्यांनी जे पथक स्थापले त्याचा पसारा ३०० निरनिराळय़ा बाहुल्या, त्या हाताळण्यासाठी ५० माणसे आणि २० विविध आख्यान-नाटके असा वाढला होता. ओदिशाच्या कानाकोपऱ्यांत आणि शेजारच्या बिहार, झारखंड राज्यांतही त्यांचे ग्रामीण चाहते होते.

हे असे काम करण्यासाठी निष्ठा तर लागतेच पण त्यात पुढे जाण्यासाठी कौशल्यही आवश्यक होते. बाहुल्या स्वत:च घडवल्याखेरीज आपण मनासारखा खेळ करू शकत नाही, हे जाणून ओदिशातील पारंपरिक शिल्पकार भगवान जेना यांच्याकडे मागुनिचरण शिकले. हे शिक्षण मातीतून शिल्पे घडवण्याचे, लाकूड तसेच दगडातून प्रतिमा कातून काढण्याचे होते. बाहुल्यांसाठी केवळ मऊ/ हलक्या लाकडाचाच वापर त्यांनी केला, तरी दगडी मूर्तिकलेवरही हात बसल्यामुळे त्यांच्या आख्यान-नाटकांमधल्या बाहुल्यांच्या प्रतिमा ठोकळेबाज लाकडी न दिसता ‘देवांसारख्याच’ दिसत!

लोककलांमध्ये प्रतिभा-प्रचीती घडवणाऱ्या अनेक कलाकारांचे दस्तावेजीकरण पुरेसे होत नाही, याचेही मागुनिचरण कुंअर हे एक खेदजनक उदाहरण ठरतात. त्यामुळेच, ‘त्यांना बाहुल्यांच्या खेळाची प्राथमिक दीक्षा वैष्णवचरण कुंअर यांच्याकडूनच मिळाली’ असे २००४ सालच्या संगीत नाटक अकादमीच्या मानपत्रात नमूद असूनसुद्धा ‘पद्मश्री’च्या वेळी (२०२३) मात्र ‘ही कला खरी दलितांची, पण तरीसुद्धा घरच्यांचा आणि समाजाचा विरोध पत्करून मागुनिचरण ती शिकले’ अशा भलत्याच कारणासाठी त्यांचे कौतुक करण्यात आले. ते ‘वरच्या जातीचे’ असल्याचा उल्लेख प्रसारमाध्यमांनी केला. अर्थात, बाहुल्यांच्या खेळासाठी अख्ख्या गावाला एकत्र आणून हसवणारे/ रडवणारे/ अचंबित करणारे हीच मागुनिचरण यांची खरी सामाजिक ओळख!

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.