नुकत्याच वयाच्या ९० व्या वर्षी अखेरचा श्वास घेतलेल्या पद्माश्री पुरस्कारप्राप्त हिंदी लेखिका मालती जोशी यांना एका मुलाखतीत विचारले गेले होते, तुम्हाला तुमच्या काळातील इतरांच्या लिखाणाबद्दल काय वाटते? मालतीबाईंचे उत्तर अस्सल लेखकाचे उत्तर होते. त्या म्हणाल्या होत्या, …हर युग का अपना एक धर्म होता है, लेखक उसी युग धर्म को निभाता है.

आपला हा लेखकाचा धर्म त्यांनी सर्व प्रकारचे लेखन करून कसोशीने पाळला. कथा तर त्यांनी लिहिल्याच शिवाय रेडिओसाठी लेखन, विनोदी लेखन असे त्यांचे लेखन होते. सर्व प्रकारच्या साहित्यप्रकारात मुशाफिरी करणाऱ्या साहित्यिकाकडे काहीशी तुच्छतेने बघण्याची परंपरा आहे. पण लेखकधर्म पाळणाऱ्या मालतीबाईंच्या बाबतीत असे होऊ शकले नाही, कारण त्यांची सुरुवातच दमदार झाली होती. १९७९ च्या नोव्हेंबर महिन्याच्या ‘धर्मयुग’मध्ये त्यांची एक कथा प्रसिद्ध झाली आणि तिथून त्यांची राष्ट्रीय पातळीवर दखल घेतली गेली. अगदी तरुणपणी त्यांनी लिहिलेली गीतं इतकी लोकप्रिय झाली होती की त्यांना ‘माळव्याची मीरा’ असे म्हटले जात असे. पण हा गीतलेखनाचा नाद त्यांनी अचानक सोडून दिला, पण लोकप्रियतेने त्यांची साथ अजिबातच सोडली नाही. त्यांचे पन्नासहून अधिक कथासंग्रह याची साक्ष देतात. महत्त्वाच्या हिंदी कथा लेखक म्हणून ओळखल्या जाणाऱ्या, मालती जोशींची लेखनशैली त्यांच्या वैशिष्ट्यपूर्ण होती. अतिशय सहजसोप्या, ओघवत्या भाषेने वाचक त्यांच्या लिखाणाकडे ओढले जात आणि त्यातल्या आशयामुळे त्या लिखाणात रमत. पाषाण युग, मध्यांतर, समर्पण का सुख, मन न हुए दस बीस, मालती जोशी की कथन, एक घर हो सपनों का, विश्वास गाथा, शेवटी शर्त, मोरी रंगदी चुनरिया, अंतिम संक्षेप, सार्थक, शापित शैशव, महकते संबंध, पिया पीर न जानी, बाबुल का घर, एक रात है हे त्यांचे कथासंग्रह लोकप्रिय आहेत. देशभरामधल्या वेगवेगळ्या विद्यापीठांमध्ये त्यांच्या साहित्याचा अभ्यास करण्यात आला आहे. त्यांच्या कथांवर लेखक, दिग्दर्शक गुलजार यांनी ‘किरदार’ आणि जया बच्चन यांनी ‘सात फेरे’ या मालिका केल्या आहेत. मालती जोशी यांनी अनेक बालकथा संग्रहदेखील लिहिले. त्यांच्या कथा मराठी, उर्दू, बंगाली, तमिळ, तेलुगु, पंजाबी, मल्याळम, कन्नड, इंग्रजी, रशियन आणि जपानी यासह अनेक भाषांमध्ये अनुवादित केल्या गेल्या आहेत.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

माहेरी आणि सासरी दोन्हीकडे असलेले एकत्र कुटुंब, त्यामुळे सतत पाहायला मिळणारी विविध प्रकारची माणसं हा त्यांचा लिखाणाचा स्राोत होता. मनाच्या गुहेत वावरणारी ही माणसं कधी एखाद्या कथानकात आपोआप फिट्ट होऊ जात ते मलाही कळत नाही असं त्या सांगत. पण आपल्या आसपास घडणारं कथानक, माणसं यांची त्यांनी कधीही ‘सामाजिक दस्तावेजीकरण’ होऊ दिलं नाही. म्हणजे असं की घटना, व्यक्तिरेखा यांचं एकत्रीकरण, त्यांची रचना इतकी बेमालूम होऊन जात असे की त्यांनी आपल्या आसपासच्या परिघातूनच या गोष्टी घेतल्या असल्या तरी ही व्यक्तिरेखा म्हणजे अमुक व्यक्ती असं कुणालाही कधीही ओळखता येत नसे. त्यांच्या या रचनाकौशल्यावर वाचकांनी बेहद्द प्रेम केले.