मशिदीवरल्या भोंग्यांमुळे माझी झोपमोड होते, अशी जाहीर कुरकुर सोनू निगम नावाच्या पार्श्वगायकाने काही वर्षांपूर्वी केली, तेव्हा ‘चला, सोनू निगमच्या झोपेची काळजी घेऊया’ असा काहीसा मिश्कील, पण वास्तवाचे भान देणारा लेख प्रा. सी. एम. नईम यांनी लिहिला होता. काश्मीरमधील खासगी रुग्णालयांमध्ये दहशतवादाचे सावट नेहमीच कसे असते याचा अभ्यासपूर्ण वेध घेणाऱ्या साइबा वर्मा यांचे २०१३ मधल्या पीएचडी संशोधनावर आधारित पुस्तक २०२० मध्ये प्रकाशित होताच ‘लेखिकेने आपले वडील‘‘रॉ’ या गुप्तचर संस्थेत असल्याची माहिती दडवून अकादमिक शिस्तीचा भंग केला असल्याने या पुस्तकाचे वितरण रोखावे’, अशा मागणीसाठी स्वाक्षरी-मोहीम सुरू झाली, तेव्हा ‘वडिलांच्या पूर्वेतिहासाची शिक्षा मुलांना देण्यापूर्वी पुस्तक तरी वाचा’, अशी भूमिका घेणारा लेखही नईम यांनी लिहिला… मग अशा १३ लेखांचे ‘हिजाब अॅण्ड आय’ हे पुस्तकच प्रकाशित झाले आणि ‘आजच्या मुस्लीम समाजाकडे पाहाण्याचा नईम यांचा दृष्टिकोन ‘ओरिएंटॅलिझम’चे कर्ते एडवर्ड सैद यांची आठवण देणारा आहे’ अशी दाद या पुस्तकाला मिळाली!
नईम हे उर्दू भाषा, साहित्य आणि साहित्येतिहासाचे तज्ज्ञ. अमेरिकेतील शिकागो विद्यापीठात अधिव्याख्याता ते प्राध्यापक असा त्यांचा प्रवास होत असताना, १९७१ ते २००१ या काळात त्यांनी उर्दूचा विविधांगी अभ्यास विद्यापीठीय शिस्त पाळूनही करता येतो, हे दाखवून दिले आणि निव्वळ ललित साहित्याच्या पुढला, भाषा आणि समाजजीवन यांचा एकत्रित अभ्यास करणाऱ्या ‘उर्दू स्टडीज’ या शाखेचे ते जनक ठरले. त्यांचा जन्म उत्तर प्रदेशातल्या (तेव्हाचा संयुक्त प्रांत) बाराबंकीचा, पण मॅट्रिक आणि पुढे एम.ए. पर्यंतचे शिक्षण लखनऊ विद्यापीठात झाले. विद्यार्थिदशेपासूनचे त्यांचे ग्रंथप्रेम केवळ पुस्तकी न राहाता भाषाविज्ञान आणि समाजविज्ञान अशा शाखा त्यास फुटल्या. उर्दूची जडणघडण अभ्यासण्यासाठी केवळ नामवंतच नव्हे, तर कमी प्रसिद्धी पावलेले पण भरपूर रचना करणारे कवी/ लेखकही अभ्यासले पाहिजेत, यासाठी त्यांनी मेहनतपूर्वक काम केले. मीर तकी मीर यांचे प्रा. नईम यांनी अनुवादित- संपादित केलेले चरित्रपुस्तक तुलनेने अधिक लोकांपर्यंत गेले असले तरी, ‘उर्दू क्राइम फिक्शन १८९० – १९५० : अॅन इन्फॉर्मल हिस्टरी’ हा त्यांचा अभ्यासग्रंथही महत्त्वाचा. मुळात, भारतीय भाषांमध्ये जनप्रिय साहित्याचा अभ्यास करण्याची पद्धत रुळली नसताना ते लिहिले गेले, हे तर अधिकच महत्त्वाचे. सआदत हसन मण्टो, कुर्रतुल ऐन हैदर, इस्मत चुगताई अशा तरक़्कीपसंद लेखकांना इंग्रजीत पहिल्यांदा नेणारेही नईमच आणि मोहम्मद इक्बाल यांनी ‘सारे जहाँसे अच्छा…’ देश का सोडला, याचा सखोल अभ्यास करणारेही नईमच.
प्रा. नईम यांच्या निधनाने साहित्यप्रेमी अभ्यासकाने समाजाभिमुख कसे असायला हवे याचा एक वस्तुपाठच आपण गमावला आहे. त्यांच्या उर्दू अभ्यासात गम्य नसलेल्यांनाही, त्यांच्या स्फुटलेखांचे तीन इंग्रजी संग्रह वाचून हा वस्तुपाठ गिरवता येईल.