पाकिस्तानी सरकारातील किंवा प्रशासनातील व्यक्ती बऱ्याचदा तेथील क्रिकेटच्या प्रशासकही असतात. शहरयार खान अशांपैकीच एक. भारतीयांना त्यांची दुहेरी ओळख. पाकिस्तानचे परराष्ट्र सचिव म्हणून आणि पाकिस्तान क्रिकेट बोर्डाचे दोन वेळचे अध्यक्ष म्हणून. रूढार्थाने ते ‘महाजिर’. भारतात जन्मलेले. परंतु परवेझ मुशर्रफ यांच्यासारखे ते कडवे महाजिर नव्हते. प्रसन्न, ऋजू आणि समजूतदार असे हे व्यक्तिमत्त्व. पेशाने आणि कर्मानेही मुत्सद्दी. भारत आणि पाकिस्तान यांच्यातील संबंधांच्या काटेरी प्रवासात गुलाब पेरणाऱ्या मोजक्यांपैकी एक. पाकिस्तान क्रिकेट नामे गोंधळकल्लोळात शहाणपण शाबूत ठेवून पाकिस्तानी गुणवत्तेला योग्य वळण देणारे बहुधा एकमेव. 

मध्य प्रदेशातील कुरवाई या छोटय़ाशा संस्थानाचे नवाब सरवार अली खान यांच्या घरात शहरयार फाळणीपूर्व काळात जन्माला आले. शहरयार यांची आई अबिदा सुल्तान या भोपाळचे नवाब हमिदुल्ला खान यांच्या कन्या. त्यांची थोरली बहीण साजिदा सुल्तान या शहरयार यांच्या मावशी. साजिदा यांचे पती इफ्तिकार अली खान पतौडी. साजिदा-इफ्तिकार यांचे चिरंजीव मन्सूर अली खान पतौडी हे शहरयार यांचे मावसभाऊ. क्रिकेट आणि नवाबी नजाकत यांचा वारसा असा कुटुंबातच मिळालेला. अबिदा या शहरयार यांना घेऊन १९५०मध्येच पाकिस्तानात गेल्या. तत्पूर्वी भारतात शहरयार यांनी शालेय आणि महाविद्यालयीन शिक्षण पूर्ण केले होते. डेहराडून मिलिटरी अ‍ॅकॅडमी स्कूल आणि इंदूरचे डॅली कॉलेज येथे ते शिकले.

मराठीतील सर्व स्तंभ बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Loksatta vyaktivedh shahryar khan in the government or administration of pakistan amy
First published on: 05-04-2024 at 00:09 IST