या चित्राबद्दल सुरुवातीलाच स्पष्ट करावी लागेल अशी बाब म्हणजे लंडनमधल्या उच्च न्यायालयाच्या बाहेरच्या भिंतीवर ते रातोरात रंगवले गेले, त्यामुळे ८ सप्टेंबरच्या सकाळी लोकांना ते पाहता आले, पत्रकारांना वा कुणालाही या चित्राची छायाचित्रे टिपता आली; पण पुढल्या काही तासांतच हे चित्र असलेल्या भिंतीचा भाग पत्रा लावून झाकण्याचा निर्णय झाला व तो अमलातही आला. पत्र्याचा अडसर कायम राखण्यासाठी तिथे आता सुरक्षारक्षक आहेत. पण काही तासांत या चित्राने द्यायचा तो संदेश दिलेलाच आहे. समाजमाध्यमांतूनच नव्हे तर वृत्तमाध्यमांतूनही या चित्राची छायाचित्रे जगभर पोहोचलेली आहेत.
न्यायाधीशाच्या पूर्ण पेहरावातली, डोक्यावर ‘विग’ घातलेली व्यक्ती हातातल्या हातोड्याने खाली पडलेल्या इसमावर घाव घालण्याच्या तयारीत आहे- त्या इसमाने जणू बचावासाठी हात उंचावलेल्या हातामध्ये एक पांढरा, कोरा फलक आहे… फलकावरचे रक्तासारखे डाग लक्ष वेधून घेत आहेत. तो इसम कशासाठी निदर्शने करू पाहात होता, हे महत्त्वाचे नाही. अन्यायाचे शिंतोडे त्याच्यापर्यंत भिडले, म्हणून तो रस्त्यावर उतरला. पण हातोडा न्यायाधीशासारखा पेहराव केलेल्या व्यक्तीच्या हातात आहे… या हातोड्याचा वापर असासुद्धा होऊ शकतो आणि ‘सामाजिक शांतता व सुव्यवस्थेसाठी’ हा घाव घालणे आवश्यकच होते, वगैरे समर्थनसुद्धा होऊ शकते.
पण सामाजिक/ राजकीय भाष्य करणारी अशी भिंतचित्रे रातोरात रंगवणाऱ्या ‘बॅन्स्की’ टोपणनावाच्या अज्ञात चित्रकाराने हे चित्र लंडन उच्च न्यायालयाच्याच भिंतीवर रंगवल्याने या नेहमीच्या समर्थनातली हवा गेली. गाझा आणि इस्रायललगतच्या अन्य भागांतील निरपराध पॅलेस्टिनी रहिवाशांचे जीव जाऊ नयेत, या मागणीसाठी कुणी रस्त्यावर उतरायचेच नाही काय, हा प्रश्नही ऐरणीवर आला. याचे कारण या निरपराध जिवांसाठी दोनच दिवसांपूर्वी लंडनमध्ये निघालेल्या मोर्चातील ८९० सहभागींवर ‘अतिरेकी कारवायांना समर्थन’ दिल्याचे गुन्हे याच उच्च न्यायालयाच्या आदेशाने दाखल झाले आहेत. लंडनमध्ये यापूर्वीही असे मोर्चे निघाले, पण हे मोर्चे काढणाऱ्या ‘पॅलेस्टाइन अॅक्शन’ या संघटनेने हिंसक कारवाया केल्याबद्दल गेल्या जुलैमध्ये तिच्यावर बंदी घालण्यात आली. ताजा मोर्चा या संघटनेच्या हाकेनंतर निघाला, म्हणून सगळेच सहभागी ‘बंदी घातलेल्या संघटनेचे समर्थक’- त्यामुळे सर्वांवर गुन्हे दाखल! इतका साधासोप्पा, कागदोपत्री चोख न्याय हा प्रत्यक्षात किती खुनशी ठरतो, याचे चित्र बॅन्क्सीने रंगवले.
मुद्दा फक्त गाझा, इस्रायल, लंडनमधली निदर्शने यांच्यापुरता नाही. आधीच खाली पडलेल्या, असहाय दिसणाऱ्या इसमावर कायद्याचा घाव घालणाऱ्या ‘न्याय’-मूर्तींचे हे चित्र पाहणाऱ्यांना आपापल्या देश-काळानुसार त्याचे अर्थ जाणवतील. कायद्याचा कोता अर्थ लावणारा हा ‘न्याय’ रस्त्यावर उतरलेल्या निदर्शकांसाठीच असतो, असेही नाही… अमक्या उद्याोगसमूहाबाबत काहीही लिहू नका अशी बंदी पत्रकारांवर घातली जाते, अमेरिकेसारख्या देशात डझनभर राज्यांची न्यायालये संपूर्ण गर्भपातबंदीला समर्थन देतात, ‘संशयितां’ना चार-पाच वर्षे आरोपाविनाच कच्च्या कैदेत ठेवले जाते. अशा वेळी दिसणारे ‘न्यायाचे चित्र’ कितीही कलमांखाली झाकले तरी त्यातून जे उघड व्हायचे ते होतच असते.