महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळाची निर्मिती हे मराठी भाषा अभिवृद्धीसाठी महाराष्ट्र शासनाने उचललेले महत्त्वाकांक्षी पाऊल होते. या मंडळाने १९६२ ला मराठी विश्वकोश निर्मितीचा संकल्प करून कार्यारंभ केला. हे प्रारंभिक कार्य महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळाच्या अधिपत्याखाली ३० नोव्हेंबर, १९८० पर्यंत चालले. तोवर मराठी विश्वकोशाचे ५० टक्के काम पूर्ण होऊन १० खंड प्रकाशित झाले होते. ३० नोव्हेंबर, १९८० ला महाराष्ट्र राज्य मराठी विश्वकोश निर्मिती मंडळ विधिवत स्थापन करण्यात येऊन त्याचे अध्यक्ष म्हणून तर्कतीर्थ लक्ष्मणशास्त्री जोशी नियुक्त झाले. ते मृत्यूपर्यंत (२७ मे, १९९४) या पदावर कार्यरत होते. त्यांच्या कार्यकाळात एकूण १५ खंड प्रकाशित झाले. आज हा प्रकल्प पूर्णत्वास गेलेला आपण पाहात आहोत.

तर्कतीर्थ लक्ष्मणशास्त्री जोशी यांचे मराठी विश्वकोश मंडळातील एकेकाळचे संपादक (मानव्यशास्त्र) सहकारी व पुढे २००१ ते २००३ या काळात अध्यक्ष म्हणून उत्तराधिकारी राहिलेल्या रा. ग. जाधव यांनी वसंत पळशीकर संपादित ‘तर्कतीर्थ लक्ष्मणशास्त्री जोशी : व्यक्तित्व, कार्य आणि विचार’ या ग्रंथात लिहिलेल्या ‘मराठी कोशकर्ते शास्त्रीजी’ शीर्षक लेखात तर्कतीर्थांचे मराठी विश्वकोशातील योगदान विस्ताराने अधोरेखित करून ठेवले आहे. त्यानुसार ‘सर्व विषयांतील नोंदींच्या मुद्रण प्रतींचे वाचन शास्त्रीजी तासनतास बैठक मारून पूर्ण करीत… नोंदींची वाचन सत्रे होत. अशी वाचनसत्रे म्हणजे संपादक वर्गाचे प्रशिक्षण शिबीर होई. शास्त्रीजी मुद्रण प्रतीतील शब्द, परिभाषा, वाक्यरचना, परिच्छेद, आशय, बाणांकने, संदर्भग्रंथ, चित्रे/ आकृत्या या सर्व घटकांवर मार्मिक अभिप्राय देत… तर्कतीर्थांनी विश्वकोशासाठी आवश्यक काटेकोर विवेकाची भाषिक मराठी शैली नुसती निर्माण केली नाही, तर विश्वकोश रचना करू शकतील, अशा मनुष्यबळाचा विकास केला. संपादक, लेखक, अभ्यागत, संशोधक अशी मोठी फळी तयार करून उभी केली… एकूणच मराठी व्यासंगाचा व विद्वत्तेचा कस आणि शिस्त समाधानकारक नाही, असे शास्त्रीजींचे साररूप मत होते… १९६० ते १९८० ही विश्वकोशाची आरंभिक विशी म्हणजे एक मंतरलेले उद्याोगपर्व होते…’

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

तर्कतीर्थांना युरोपात प्रबोधनकाळानंतर विशेषत: फ्रेंच भाषेत जशी ‘एन्सायक्लोपीडिक चळवळ’ उभी राहिली, तशी ती मराठीत निर्माण करावयाची होती. मराठी विश्वकोश हा सर्व विषयकसंग्राहक ज्ञानकोश होय. मराठी विश्वकोश निर्मिती का आवश्यक होती, ते स्पष्ट करीत तर्कतीर्थांनी पहिल्या खंडाला लिहिलेली प्रस्तावना म्हणजे विश्वकोशसंबंधी त्यांचे प्रकट चिंतनच होते. त्यात त्यांनी मराठी विश्वकोशाचे महत्त्व अधोरेखित करत म्हटले आहे की, ‘ज्या भाषेत फार मोठ्या प्रमाणात विद्यांची शतकानुशतके निर्मिती झालेली असते, तेथेच विश्वकोशासारखे विविध ज्ञानसंग्राहक ग्रंथ निर्माण करण्याची आवश्यकता असते.’ प्राचीन काळापासून अशा प्रकारचे ग्रंथ जगातल्या साक्षर समृद्ध भाषांमध्ये निर्माण झाल्याची पुष्कळ उदाहरणे आहेत. आधुनिक विद्या पश्चिमी देशांत सतराव्या शतकापासून वाढू लागल्या, त्यामुळे अनेक कारणास्तव विश्वकोश निर्मितीची गरज विद्वानांना फार भासू लागली. एक म्हणजे कोणताही एक महत्त्वाचा विषय अन्य अनेक विषयांशी संलग्न असतो. अशा अनेक विषयांची एकत्र माहिती मिळाली, तर तो विषय नीट समजून घेता येतो किंवा त्या विषयाचे संशोधन करण्यात अनुकूल असा व्यापक दृष्टिकोन मिळतो. दुसरे असे की, प्रगत समाजातील अत्यंत बुद्धिमान अशा कोणाही एका माणसात आयुष्यात आपला विषय व संलग्न विषय यांचे ज्ञान पूर्ण संपादन करणे अशक्य ठरते. कारण, विद्यांचा विस्तारच अफाट झालेला असतो. एकच विद्या असली, तरी तिच्यातून अनेक विद्या व शास्त्रे निर्माण होतात. ‘तिसरे कारण असे की, सुसंस्कृत मनुष्याच्या जीवनातील व्यवहारांना त्या संस्कृतीतील विद्यांचे अधिष्ठान असते, त्या विद्या विविध असतात, त्या विद्यांची माहिती एकत्र व थोडक्यात मिळविल्याने त्या त्या व्यवहारांमध्ये चुका टाळणे शक्य होते. विश्वकोशांमुळे अशी आवश्यक माहिती मिळते व त्यामुळे अज्ञानमूलक चुका टाळता येतात. चौथे कारण असे की, शिक्षण संस्थांना सुसंस्कृत समाजात मूलभूत महत्त्व प्राप्त झालेले असते.’