‘मौज’ साप्ताहिक, मुंबईच्या ९ फेब्रुवारी, १९४९ च्या अंकात प्रसिद्ध समाजवादी पुढारी ना. ग. गोरे यांचे महाराष्ट्रातील विचारवंतांस ‘अनावृत पत्र’ प्रसिद्ध झाले होते. त्यात त्यांनी ‘‘आजचा महाराष्ट्र विचाराने गोंधळलेला, निराशेने हतबुद्ध झालेला, चुकीच्या दृष्टिकोनातून तर्कटी बनलेला, मनाने दरिद्री व कर्माने बेफाम आहे,’’ असे निदान केले होते. ‘‘महाराष्ट्रातील अस्पृश्य वर्गापासूनच्या सर्व थरांमध्ये जितकी बुद्धिमान, कर्तृत्ववान, त्यागी, कामसू व जागृत माणसे आढळतात, तितकी इतरत्र नाहीतच.’’ इतके असताना महाराष्ट्र मागे पडला याला ना. ग. गोरे यांचे उत्तर असे होते की, ‘‘ज्ञानाची घमेंड, सहकारी प्रयत्नांचा अभाव, वर्तमानकाळ आणि भविष्यकाळ यांच्याकडे पाहण्याची चुकीची दृष्टी असे आहे.’’

महाराष्ट्रात पांढरपेशा मध्यमवर्ग आणि शेतकरी मध्यमवर्ग, हेच खरे बलशाली गट आहेत. सर्व उद्याोगधंदे सहकारी पद्धतीने चालविण्यास अनुकूल अशीच महाराष्ट्राची आर्थिक व सामाजिक रचना आहे. कारण, येथे जशी अत्यंतिक आर्थिक विषमता नाही, तशीच सामाजिक विषमताही नाही, म्हणून लोकसत्ताक व समाजवादी हिंदुस्तान स्थापण्याच्या कार्यात महाराष्ट्राने अग्रेसर व्हावे आणि आपला भविष्यकाळ उज्ज्वल करावा, असे त्यांचे त्यात विवेचन व मार्गदर्शन होते.

‘मौज’ साप्ताहिकाच्या संपादकांनी महाराष्ट्रातील विचारवंतांना या अनावृत पत्रास उत्तर पाठविण्याविषयी आवाहन केले होते. त्यास प्रतिसाद देत तर्कतीर्थ लक्ष्मणशास्त्री जोशी यांच्यासह सर्वश्री प्रा. न. र. पाठक, आचार्य दादा धर्माधिकारी, अच्युतराव पटवर्धन, पंडित भवानीशंकर नियोगी, वि. न. तथा काकासाहेब बर्वे, प्रो. श्री. व्य. पुणतांबेकर, डॉ. सुमंत मुरंजन, साथी एस. एम. जोशी प्रभृती मान्यवरांनी उत्तरे पाठविली होती. या मालिकेतील तर्कतीर्थांचा प्रथम लेख व्यवच्छेदक म्हणावा लागेल. कारण, तो सर्वांगांनी चिकित्सा नि मीमांसा करताना दिसतो.

तर्कतीर्थ लक्ष्मणशास्त्री जोशी या उत्तरपर लेखात स्पष्ट करतात की, ना. ग. गोरे यांनी आपल्या अनावृत्त पत्रात महाराष्ट्राच्या भवितव्याबद्दल आत्मपरीक्षणास प्रवृत्त करणारे अनेक प्रश्न विचारकांपुढे उपस्थित केले आहेत. यातून दोन गोष्टी पुढे येतात.- (१) महाराष्ट्राची सद्या:स्थिती आणि (२) राज्यातील प्रमुख व्यक्तींच्या मानसिक घडणीचे प्रत्यंतर. अशा व्यक्तींत सर्वश्री वा. म. जोशी, दादासाहेब मावळणकर, महर्षी अण्णासाहेब तथा धों. वि. कर्वे, आचार्य काकासाहेब कालेलकर इत्यादींचा समावेश आहे

तर्कतीर्थांच्या म्हणण्यानुसार, ‘महाराष्ट्राची पीछेहाट होत आहे,’ हे विधान सापेक्ष आहे. कोणाच्या व कशाच्या अपेक्षेने महाराष्ट्र मागे आहे, याचे उत्तर शोधले पाहिजे. प्रगती व परागती (अधोगती) ठरविण्याच्या कसोट्या इतिहासाने निश्चित केलेल्या आहेत. १) राज्यसत्ता, २) भौतिक सुधारणा, ३) मानसिक सांस्कृतिक. राज्यसत्तेच्या बाबतीत महाराष्ट्र दुय्यम स्थानावर आहे. महाराष्ट्राने देशाला नेतृत्व दिले नाही. (पंडित नेहरू, सरदार पटेल यांसारखे) मानसिक संस्कृतीचा विचार करता महाराष्ट्रीय संकुचितपणा, तुसडेपणा विचारास प्रवृत्त करणारा, सुधारणेस वाव असलेला आहे. महाराष्ट्र नजीकच्या काळात भारतास नेतृत्व देईल अशी स्थिती नाही.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

इथल्या व्यक्ती आपल्या कलाने मोठ्या होतात. महाराष्ट्रीय भावना इथे व्यक्तिपूजक आहे, ती राष्ट्रव्यापक नाही. इथले राष्ट्रवाद विसंगत व संकुचित आहेत. महाराष्ट्र, कर्नाटक, आंध्र प्रांत म्हणून संकुचित आहेत. इथे शिक्षण, उद्याोग, व्यापार आणि शेतीचा विकास नाही. मनोवृत्ती नोकरीची आहे. भौतिक समृद्धीचा विचार करता महाराष्ट्राची स्थिती उर्वरित देशासारखीच आहे. इथे सांस्कृतिक समृद्धी (भाषा, कला, साहित्य) आहे; पण आर्थिक नाही. राज्यसत्ताच विकासाचा तरणोपाय, या भ्रमातून बाहेर येऊन स्वविकासाची स्वतंत्र योजना व मानसिकता हाच त्यावरचा तरणोपाय आहे. महाराष्ट्राची गृहसंस्कृती एकात्म नाही. तिला विविध भेदांचे (जात, धर्म, विचारप्रणाली इ.) ग्रहण आहे. इथले पुस्तकी शिक्षण व साक्षरता कुचकामी आहे. उपजीविका शिक्षण हा त्यावरचा उपाय आहे, तरच इथे मूलगामी लोकसत्ताक क्रांती शक्य आहे. समंजस आणि सुसंस्कृत नागरिक लोकसत्ताक व साम्यवादी संस्कृती जन्माच्या बाबतीत ते सामाजिक बनविणे, हे या शैक्षणिक चळवळीचे ध्येय असले पाहिजे.