‘कवी, लेखक, राजकीय तत्त्वचिंतनाचे अभ्यासक आणि माजी नक्षलवादी नेते’ ही अझीझुल हक यांची ओळख धक्कादायक वाटेल, पण ती (याच क्रमाने) खरी होती, म्हणून तर त्यांच्या निधनानंतर इंग्रजी दैनिकांनी ‘एक पर्व संपले’ असे मथळे दिले आणि पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनीही जाहीरपणे- समाजमाध्यमावर- आदरांजलीपर संदेश प्रसृत केला.
वास्तविक ममता बॅनर्जी यांच्या राजकीय उदयाला कारणीभूत ठरलेल्या ‘सिंगूरविरोधी आंदोलना’ला हक यांनी विरोध केला होता. त्या वेळी हक यांनी, ‘शेतकऱ्याच्या मुलाने शेतकरीच राहावे असे काही नाही’ हे तत्कालीन मुख्यमंत्री बुद्धदेव भट्टाचारजी यांचे म्हणणे आपल्याला पूर्णत: मान्य असल्याचे सांगून पश्चिम बंगालच्या तत्कालीन सरकारची बाजू उचलून धरली होती. तरीही ममता बॅनर्जी त्यांना आदरांजली वाहतात याची कारणे दोन : पहिले अर्थातच बंगाली अस्मिता आणि दुसरे कारण म्हणजे, हक यांचा सच्चेपणा.
हा सच्चेपणा लहानपणापासूनचाच असावा. अझीझुल हक यांचे घराणे रानमहाल येथील जमीनदारांचे. सन १९४२ चा त्यांचा जन्म. पण कळत्या वयात आधी कवितांमधून त्यांनी शोषितांची दु:खे मांडली आणि पुढे तर स्वत:च्या वाट्याची सर्व जमीन गरिबांसाठी दान करून ते चळवळीत उतरले. ही चळवळ मुळात साम्यवादी. तरुणपणी अझीझुल हेही भारतीय कम्युनिस्ट पक्षातच होते. त्या वेळी ‘सशस्त्र क्रांती’ वगैरे स्वप्नाळू विचार या पक्षात होते आणि वयाच्या १७ व्या वर्षी या विचारांचे आकर्षण वाटल्यामुळे ‘बंदुकीच्या नळीतून क्रांती करण्यासाठी’च अझीझुल हक भारतीय कम्युनिस्ट पक्षात आले होते.
या पक्षातून मार्क्सवादी १९६४ मध्ये वेगळे झाले, त्या पहिल्या फुटीनंतर चारू मजुमदार यांनी भारतीय शोषणाचे स्वरूप निराळे असल्याने आधी गावागावांतून व्यवस्थेविरुद्ध बंड पुकारले पाहिजे, असा आग्रह धरल्याने पुन्हा फूट पडली. मजुमदार यांनी केलेल्या ‘आजही भारतात अर्धसामंती- अर्धवसाहती शोषणच सुरू आहे’ या विश्लेषणाची भुरळ त्या वेळी पंचविशीच्या आसपासच्या वयातल्या अझीझुल यांना पडली आणि मजुमदार यांनाच साथ देण्याचे त्यांनी ठरवले. जागोजागी नक्षलवादी उठावातून गावे ‘मुक्त’ करण्याचे प्रकार सुरू झाल्यावर राज्य सरकारने कडक धोरण अवलंबून या चळवळीचा बीमोड करू पाहिला. तेव्हा गंडांतर आले ते अझीझुल यांच्यासारख्या तरुणांवरच.
पुढली एकंदर सुमारे १८ वर्षे त्यांना कोठडीतच काढावी लागली. तरीही मधल्या काळात, ‘भारतीय कम्युनिस्ट पक्ष- मार्क्सवादी लेनिनवादी’ या नक्षलवाद्यांच्या पक्षाचे पुनरुज्जीवन करण्याचा विडाच त्यांनी उचलला. या पक्षाच्या मध्यवर्ती समितीची पुन्हा त्यांनी स्थापना केली आणि यातून नक्षलवादाला पुन्हा उभारी देण्याचे प्रयत्न केले. यानंतरच्या पोलीस कोठडीत त्यांचा छळ झाला. सुटून आल्यानंतरही ते या विचारांचा पाठपुरावा करत राहिले. त्यासाठी लेखणी हेच शस्त्र वापरत राहिले.
‘कारागारे अठोरा बोषोर’ हे कोठडी व कैदेची शिक्षा यांमधल्या अनुभवांचे पुस्तक, तर ‘नक्सलबाडी – त्रिश बोषोर आगे एबं पोरे’ हे मजुमदार यांच्या उठावाला तीन दशके झाल्यानंतरचे पुस्तक ही त्यांची पुस्तके प्रकाशित झाली आहेत. अतिरेकी वा दहशतवादी हिंसेचे आवाहन त्यांनी कधीही केले नाही. परंतु शोषणाची नवनवी रूपे आपण ओळखलीच पाहिजेत, असा पाठपुरावा ते करत राहिले. त्यासाठी अन्य राजकीय विचारांची तात्त्विक चिकित्साही त्यांनी केली. त्यामुळेच त्यांच्या स्तंभलेखनाला प्रमुख बंगाली वृत्तपत्रांनी स्थान दिले.