माणूस हा पृथ्वीवरील सर्वात शक्तिशाली जीव… कारण? तो स्वतंत्रपणे विचार करू शकतो. राज्यशास्त्राचा इतिहास पहिला तर आढळून येईल की इतिहासाचे सार हे या विचारांना सत्ताधारी गटाकडून मर्यादित ठेवण्यासाठीच्या संघर्षात आहे. त्यातूनच धर्म, जात, उच्च-नीच वगैरे संकल्पनांचा विकास झाला. आतापर्यंतची सर्व तंत्रज्ञाने ही तुमची कृती विवर्धित अथवा मर्यादित करतात. समाज माध्यमी अल्गोरिदम तुम्हाला ठरावीक दिशेने विचार करायला प्रवृत्त करते. कृत्रिम बुद्धिमत्ता एखाद्या गोष्टीबद्दल तुम्हाला हवा तसा विचार तुमच्यासाठी करते.

मात्र कल्पना करा की एखाद्या सॉफ्टवेअर कंपनीमध्ये एक कर्मचारी फ्रेडरिक फोर्सिथची ‘द अफगाण’ ही कादंबरी वाचून गेली आहे. वरिष्ठांबरोबर मीटिंग चालू असताना तुमचे विचार वाचणारी यंत्रणा तिथे कार्यरत आहे. गंभीर चर्चा चालू असताना तिच्या डोक्यात सहज विचार आला की इथे तालिबानने हल्ला केला तर मी कंपनीला कसं वाचवू शकते… आणि हे सर्व कंपनीचे वरिष्ठ पाहत आहेत. आपल्या विचारावर आपलेच नियंत्रण नसते. अशा वेळी केवळ मनात उत्पन्न होणारे विचार तुमच्या संमतीशिवाय कोणी निरीक्षण करून तुमचं व्यक्तिमत्त्व जोखत असेल तर विचारस्वातंत्र्याला चूड लावणारे हे धोकादायक वळण आहे. ‘मन चिंती ते वैरी न चिंती’ हे तत्त्व मान्य करणाऱ्या समाजासाठी काम, क्रोध, लोभ, मोह, मद, मत्सर यांचे थेट परीक्षण हे स्वातंत्र्यासाठी आणि वैयक्तिक जीवनासाठी धोक्याचे ठरू शकते.

चेतातंत्रज्ञान

मनाच्या आत डोकावणारे हे तंत्रज्ञान, म्हणजे न्यूरोटेक्नॉलॉजी हे मेंदू किंवा मज्जासंस्थेच्या क्रियाकलापांबद्दल अधिक माहिती देणारे किंवा त्याच्या कार्यावर परिणाम करणारे कोणतेही तंत्रज्ञान! यामध्ये अशी उपकरणे आणि पद्धतींचा समावेश होतो ज्या व्यक्तींच्या चेतासंस्थेची नोंद घेऊ शकतात, त्यात दखल देऊ शकतात, मूल्यांकन करू शकतात, आणि हस्तक्षेप करून मेंदूला उत्तेजित करू शकतात. आपल्या चेतना, अस्मिता आणि विचार यासाठी जबाबदार असलेल्या अवयवाशी छेडछाड केल्याने त्याचे प्रतिबिंब वर्तणुकीत दिसते. पारंपरिक पद्धतीने चेता तंत्रज्ञानाचा वापर पार्किन्सनसारख्या असाध्य रोगांमध्ये चेतासंस्था उत्तेजित करण्यासाठी अथवा ऐकण्यासारखी शक्ती कमकुवत झाली असेल तर कान आणि मेंदू यांमधील संवाद पुनर्स्थापित करण्यासाठी होतो. मात्र चेतासंस्थेच्या ब्रेन-मशीन इंटरफेस (बीएमआय) या तंत्रज्ञानामुळे मेंदूमधील माहिती वाचणे शक्य होते. हे म्हणजे थोडक्यात तिसऱ्या घटकाकडून मेंदूला नियंत्रित करण्याचा प्रकार! १९२० च्या इलेक्ट्रोइन्सेफॅलोग्राम (ईईजी) च्या शोधामुळे मेंदूच्या क्रिया ‘पाहण्याच्या’ युगाची सुरुवात केली. ब्रेन मशीन इंटरफेस केवळ निरीक्षणापासून पुढे जाऊन आता मेंदूमध्ये सक्रियपणे हस्तक्षेप करत आहे.

रोजच्या वापरात

वैद्याकीय क्षेत्रापलीकडे विचार करताना ईईजी आणि चेतापेशी उत्तेजित करणारे तंत्रज्ञान आपल्या रोजच्या वापराच्या वस्तू जसे की हेडफोन्स, चष्मे, रिस्टबँड्स वगैरेंमध्ये वापरलेले दिसेल. ही उपकरणे दैनंदिन आरोग्य, जीवनशैलीला सुखकारक बनविण्यासाठी मनोरंजनासाठी वापरली जातात. यात मेंदूसाठी फिटबिटसारखे आरोग्य ट्रॅकर्स, तुमच्या मूडनुसार संगीत निवड आणि झोपेचे चक्र संतुलित राखण्यात मदत करतात. न्युरालिंक आणि सिंक्रोनसारख्या कंपन्या स्मार्टफोन आणि संगणकाच्या माध्यमातून थेट मनावर नियंत्रण करण्यासाठी परिधान करता येण्याजोगी उपकरणे विकसित करत आहेत.

चेताविपणन (न्यूरो-मार्केटिंग) हा या तंत्रज्ञानाचा आणखी एक महत्त्वाचा उपयोग आहे, ज्यामध्ये ईईजीसारख्या पद्धती वापरून विशिष्ट मार्केटिंग पद्धतींना प्रतिसाद देणाऱ्या मेंदू प्रोफाइल्सची ओळख केली जाते आणि ग्राहकांच्या प्राधान्यांचा अंदाज घेतला जातो. न्यूरोमार्केटिंगच्या उदयामुळे विचार, भावना आणि पसंतीक्रम ही व्यावसायिक शोषणासाठी मौल्यवान साधने बनत आहेत. सर्व्हिलन्स कॅपिटलिझम म्हणजेच चेतासंस्थेशी संबंधित माहितीचा ज्याच्याकडे साठा असेल तो उद्याची बाजारपेठ काबीज करेल ही शक्यता नाकारता येत नाही.

युद्ध मनांचे

न्यूरोटेक्नॉलॉजीचा वापर सैनिकांच्या कार्यक्षमतेत मोठ्या प्रमाणात सुधारणा करण्यासाठीही केला जात आहे. यामध्ये नियंत्रितपणे मेंदूच्या सिग्नल्सना उत्तेजन देऊन थकवा दूर करणे, शारीरिक क्षमता वाढवणे आणि शिकण्याची क्षमता सुधारणे या गोष्टी केल्या जाऊ शकतात. हे तंत्रज्ञान सैनिकांच्या भावनिक प्रतिसाद आणि मानसिक प्रतिक्रियांवर सतत नजर ठेवून त्यांच्या वर्तनाचा अंदाज लावू शकते. नुकत्याच अहमदाबाद येथे एअर इंडियाच्या विमानाला अपघात झाल्यानंतर वैमानिकाच्या वर्तणुकीवर शंका घेतली गेली. एअर ट्रॅफिक कंट्रोलसारख्या करडी नजर ठेवण्याच्या कामांचा थकवा मोजण्यासाठी हे तंत्रज्ञान उपयुक्त ठरेल. प्रगत कमांड आणि कंट्रोल सिस्टमसाठी, अमेरिकेच्या नेक्स्ट-जनरेशन नॉनसर्जिकल न्युरोटेक्नॉलॉजी ( N3) सारख्या कार्यक्रमांद्वारे सैनिकांना मानवरहित हवाई वाहनांचे नियंत्रण, किंवा गुंतागुंतीच्या सैनिकी कारवाईदरम्यान बहुविध कामे करणे शक्य होईल.

मनाने नियंत्रित केलेल्या ड्रोन्स आणि रोबॉट्सची संकल्पना भौतिक आदेशांची गरज न ठेवता तात्काळ प्रतिसाद देण्यास सक्षम असेल. याशिवाय, जखमी सैनिकांच्या पुनर्वसनासाठी न्युरोप्रोस्थेसिस आणि चेतासंस्थेचे उत्तेजन प्रगत टप्प्यात आहे. यामुळे त्यांना स्नायूंवरील मेंदूचे नियंत्रण परत मिळविण्यास किंवा पोस्ट-ट्रॉमॅटिक स्ट्रेस डिसऑर्डर (PTSD) व्यवस्थापित करण्यास मदत होते. हे दुहेरी वापराचे स्वरूप म्हणजे आरोग्यसेवेतील प्रगती थेट लष्करी क्षमतांमध्ये रूपांतरित होऊ शकते. हे दुहेरी वापर स्वरूप न्युरोटेक्नॉलॉजीवर नियमन करण्याच्या प्रयत्नांना क्लिष्ट बनवते, कारण लष्करी उपयोगांवर निर्बंध घालणे हानिकारक नागरी संशोधनास बाधा आणू शकते, तर मुक्त विकासाला परवानगी देणे हे शस्त्रास्त्रांच्या स्पर्धेला गती देऊ शकते.

न्युरोवॉरफेअर (चेता-युद्ध) हे मानवी मेंदूचे सक्षमीकरण आणि शस्त्रीकरण करून प्रतिस्पर्ध्यांना आणि देशांतर्गत लोकसंख्येला रक्ताचा थेंबही न सांडता कल्पक मार्गांनी हाताळण्यावर आणि नियंत्रण करण्यावर भर देते. पारंपरिक युद्ध भौतिक पायाभूत सुविधा किंवा लष्करी संसाधनांना लक्ष्य करते. तर न्युरोवॉरफेअर थेट मानवी मनाला लक्ष्य करते. हे मानसिक प्रक्रियांवरील हस्तक्षेप राष्ट्रीय आणि वैयक्तिक सार्वभौमत्वाबाबत गंभीर प्रश्न निर्माण करतात, ज्यामुळे संघर्षाचे नवे स्वरूप उदयास येत आहे, जिथे मानवी मनच रणांगण बनले आहे.

विचारांची कोंडी

न्युरोटेक्नॉलॉजीच्या आपल्या विचारांना, भावनांना आणि मेंदूच्या कार्यपद्धतीला हात घालण्याच्या प्रवृत्तीमुळे पारंपरिक विचारस्वातंत्र्यापेक्षा स्वातंत्र्याचा वेगळा विचार करण्याची गरज निर्माण झाली आहे. विचार हे दृक् अथवा श्राव्य माध्यमातून आपल्याला दिसतात. मात्र चेता उत्तेजना त्याच्या आधीची मूलभूत अवस्था आहे. याची तुलना करायची असेलच तर शरीर आणि भ्रूण यांच्याशी करता येईल. शरीरासंबंधी कायदेशीर नियंत्रणे आपल्याला दिसतील, मात्र भ्रूण किंवा स्टेम सेल्ससारख्या त्या आधीच्या अवस्थांमध्ये फेरफार करण्याचा मानवी प्रयत्न सध्याची कायदेशीर व्यवस्था कुचकामी ठरवतो. यामुळे ‘चेता स्वातंत्र्य’ या नव्या संकल्पनेचा जन्म झाला आहे – म्हणजे आपल्या मनावर पूर्ण नियंत्रण ठेवण्याचा आणि कोणत्याही बाह्य हस्तक्षेपापासून मुक्त राहण्याचा हक्क! या चेता अधिकारांचा संवैधानिक अधिकार चिली या देशाने नागरिकांना प्रदान केला आहे. भविष्यात आणखी देश ही वाट अनुसरतील.

न्युरोटेक्नॉलॉजीचा वेगवान विकास होत आहे, पण कायदे आणि नैतिकता मागे पडत आहेत. हे तंत्रज्ञान इतके गुंतागुंतीचे आहे की त्याचे धोके समजावून सांगणे कठीण! ते व्यक्तिमत्त्व बदलू शकते किंवा मनाची स्थितीदेखील बदलू शकते. मेंदूच्या कार्यप्रणालीत बदल केला, तर त्या व्यक्तीच्या कृतींची जबाबदारी कोण घेणार? हे प्रश्न कायदा आणि तत्त्वज्ञान यांना आव्हान देत आहेत. न्युरोटेक्नॉलॉजीमुळे भविष्यात सायबर हल्ले केवळ संगणकावरच नव्हे तर थेट मेंदूवरही होऊ शकतात. ‘ब्रेनजॅकिंग’ म्हणजे मेंदूतील इम्प्लान्ट्सवर अनधिकृत नियंत्रण मिळवणे! यामुळे शरीराची हालचाल, भावना किंवा विचार प्रक्रिया बदलली जाऊ शकते. मेंदूचा संवेदनशील डेटा चोरला गेल्यास ब्लॅकमेलिंग किंवा मानसिक युद्धासाठी वापरला जाऊ शकतो.

जिवंत माणसाचे तंत्रज्ञानाच्या साहाय्याने झपाटणे किंवा झोंबी बनविणे हे कदाचित वास्तव बनू शकते. परकीय घटकाकडून मनुष्यावर मिळविलेले नियंत्रण हे मनुष्यत्वावर मिळविलेल्या नियंत्रणासारखे आहे. माणसाच्या वर्चस्वाची पोहोच अवकाशात उड्डाण घेत असतानाच ती शरीराच्या आत मनाचा ठाव घेण्याचा प्रयत्न करीत आहे. समर्थ रामदास म्हणतात, ‘मना सज्जना भक्ती पंथेची जावे!’ मन सज्जन नसेल तर ‘भक्ती’पंथ कोणत्या दिशेला जातो याचा ट्रेलर आपण समाजमाध्यमांमुळे पाहिला आहे. चेतातंत्रज्ञानाचा शेला मनाभोवती गुंफल्यानंतर जो अवतरेल तो संपूर्ण चित्रपट आहे!

तंत्रज्ञान आणि राजकारण यांच्या अंत: संबंधाचे विद्यापीठीय संशोधक.

पंकज फणसे / phanasepankaj@gmail.com