संदीप देशमुख
नव्या वर्षात करायची सर्वात आनंददायी गोष्ट म्हणजे नवं कोरं कॅलेंडर भिंतीवर टांगणं. कितीही स्मार्टफोन येऊ देत, कितीही कंप्युटर्स येऊ देत, भिंतीवरच्या कॅलेंडरचं स्थान अढळ आहे – अगदी ध्रुवताऱ्यासारखं. पण याचं हे नवंकोरं रूप एक-दोन दिवसच टिकतं. मग त्यावर ‘घरकामाला येणाऱ्या मावशींचा पगार दिला’, ‘दुधाचे १०१३ रुपये दिले’, ‘आज पेपर मिळाला नाही’, ‘इस्त्रीवाला ४ कपडे शिल्लक’ अशा विविध नोंदी होऊ लागतात आणि ते कॅलेंडर मळतं. मळतं आणि अगदी रुळतं. तुमच्या घरातलं कॅलेंडरदेखील एव्हाना असंच रुळलं असेल.

वास्तविक, साधं तारीख आणि वार यांचा एक तक्ता असतं हे कॅलेंडर म्हणजे. पण त्याचं एखादं पान पाहिल्याशिवाय आपलं पान हलत नाही. येता-जाता त्या कॅलेंडरला आपण विविध प्रश्न विचारतो. उदाहरणार्थ, यंदा १५ ऑगस्टला वार कोणता आहे? यंदा पाच शनिवार असलेले महिने कोणते? एखाद्या महिन्यात तरी पाच रविवार आले आहेत का? कोणत्या सुट्ट्या एकमेकांना लागून आल्या आहेत? चतुर माणसं त्यानुसार त्यांच्या रजांचं नियोजन करतात! घरातल्यांचे वाढदिवस (आणि विशेषकरून लग्नाचा वाढदिवस) कोणत्या वारी येतात? मे महिन्यात फिरायला जायचं असेल तर सुट्टी केव्हा सांगावी? वगैरे वगैरे.

हेही वाचा : लोकमानस : त्यापेक्षा प्रशासन सुधारा!

पण हे अगदीच उपयुक्ततावादी प्रश्न झाले. आपण थोडे वेगळे प्रश्न या कॅलेंडरला विचारले तर? म्हणजे, उदाहरणार्थ, १ जानेवारी हाच वर्षारंभाचा दिवस का? १ फेब्रुवारीने किंवा १ जूनने काय घोडं मारलं आहे? किंवा १ जानेवारी १ या दिवशी अशी काय घटना घडली होती की ज्यामुळे त्या दिवसापासून ही कालगणना सुरू झाली? मुळात कॅलेंडरचा पहिला दिवस १ जानेवारी १ होता की १ जानेवारी ०? किंवा अमुक महिन्यात ३० दिवस, तमुक महिन्यात ३१ दिवस आणि बिचाऱ्या फेब्रुवारीत तर २८ ही असमान विभागणी का? किंवा ते लीप वर्ष दर चार वर्षांनीच का?

किंवा थोडे अधिक धाडसी प्रश्न विचारायचे तर आठवड्याचे वार सातच का? वर्षाचे महिने १२ च का? १३ का नाहीत? बरं, १३ नाहीत असं म्हणावं तर कधी कधी अधिक महिना येतोच की! पण अर्थात, तो शालिवाहन शकात.

हो, ते शालिवाहन शक असतं तसं विक्रम संवतही असतं. या दोघांचा परस्परांशी आणि इंग्रजी कॅलेंडरशी काही संबंध आहे का? आणि असलाच, तर नेमका काय? कारण दसरा, दिवाळी असे सगळे सण दरवर्षी वेगवेगळ्या तारखांना आणि प्रसंगी वेगवेगळ्या महिन्यांत येतात. पण मकर संक्रांत मात्र दर वर्षी न चुकता १४/ १५ जानेवारीलाच येते. हे काय गौडबंगाल आहे?

हेही वाचा : बुकबातमी : लेखकाच्या सर्व छटा…

वरवर पाहता साधेसुधे वाटणारे प्रश्न. खरं तर, यांची उत्तरं आपल्याला रोज दिसणाऱ्या घटनांवर आधारलेली आहेत. हो, कारण कालगणनेचा हा संपूर्ण डोलारा पृथ्वी स्वत:भोवती फिरता-फिरता सूर्याभोवती फिरते आणि चंद्र पृथ्वीभोवती फिरतो या एवढ्याच गोष्टींवर तोललेला आहे. पण हे काळाचं गणित समजून घ्यायचं तर सूर्य, चंद्र, तारे नुसते दिसणं पुरेसं नाही. त्यांच्याकडे सजगपणे पाहिलं पाहिजे.

केवळ तेवढंच नाही. थोडी इतिहासाची पानं चाळली पाहिजेत. थोडा भूगोलाचा अभ्यास केला पाहिजे आणि अर्थातच, अर्थशास्त्र, हवामानशास्त्र यांच्याशीही दोस्ती केली पाहिजे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

पुढच्या वर्षभरात आपण नेमकं हेच करणार आहोत. हे ‘काळाचं गणित’ अगदी नीट समजून घेणार आहोत. साध्या, सोप्या शब्दांत. किचकटपणा आणि क्लिष्टता टाळून. हसत-खेळत. हा सगळा प्रकार भन्नाट आहे. कमालीचा रंजक. तेव्हा, व्हा तयार या धम्माल सफरीसाठी.